Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड विद्या बालनचा ‘जलसा’ बिग बींच्या बंगल्याचा आहे बायोपिक? अभिनेत्रीने केला ‘हा’ खुलासा

विद्या बालनचा ‘जलसा’ बिग बींच्या बंगल्याचा आहे बायोपिक? अभिनेत्रीने केला ‘हा’ खुलासा

अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सध्या तिच्या आगामी ‘जलसा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) झळकणार आहे. ‘जलसा’ हा चित्रपट एका मुलीचा खून आणि त्याचा तपास अशा कथेवर आधारित आहे. चित्रपट अत्यंत थरारक अनुभव देणारा आणि गुन्हेगारीवर आधारित असल्याने चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. तत्पुर्वी चित्रपटाच्या ‘जलसा’ नावावरून अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांच्या बंगल्याचा संबंध अनेकांनी जोडला होता, यावर चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनने खुलासा केला आहे.

हिंदी चित्रपट जगतातील दिग्गज अभिनेते आणि त्यांच्या आलीशान निवासस्थानांची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. महानायक अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, शाहरुख खानच्या मन्नतची झलक तसेच सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटची नेहमी चर्चा सुरू असते. आता विद्या बालनचा आगामी चित्रपट जलसा आणि अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगल्यावर आधारित असल्याची चर्चा सगळीकडे चर्चा सुरू आहे. एका मुलाखतीत विद्या बालनला याबद्दल विचारण्यातही आले, त्यावेळी विद्या बालनने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रेक्षकांच्या या चर्चांना उत्तर देताना ती म्हणाली, “हो, हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाच्या कथेवर आधारित आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार आहात का?” त्याचबरोबर या प्रश्नाचा एक मजेशीर किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणाली, “मला एका व्यक्तीने विचारले की, तुमचा जलसा चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला याचा काही संबंध आहे का? यावर मी त्याला ‘जलसा’ची कथा समजून घेण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. यामध्ये गंमतीची गोष्ट म्हणजे ‘जलसा’ आणि ‘प्रतिक्षा’ ही दोन्हीही अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची नावे आहेत.

दरम्यान विद्या बालन आणि शेफाली शाह यांंचा हा चित्रपट एका मुलीच्या खुनावर आधारित आहे. चित्रपटात विद्या बालन एका पत्रकाराच्या तर शेफाली शाह मृत मुलीच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. हा बहुचर्चित चित्रपट १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा