Thursday, July 18, 2024

खऱ्या आयुष्यातील विदारक परिस्थिती रुपेरी पडद्यावर; दिग्दर्शक आदित्य ओम खोलणार अनिष्ठ प्रथेची पोल

चित्रपट हा समाजाचा आरसा म्हणून काम करत असतो. हिंदी चित्रपटांमध्ये अनेक अनिष्ठ प्रथा, चालीरिती आणि परंपरा यावर आधारित असलेल्या कथा तयार केल्या जातात. या चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे काम हे दिग्दर्शक करत असतात. याच प्राश्नभूमीवर चित्रपट निर्माते आणि लेखक आदित्य ओम अशाच एका अनिष्ठ प्रथा आणि परंपरेची पोलखोल करणारा चित्रपट घेऊन येत आहेत, ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.

आदित्य ओम (Aditya Om) हे हिंदी चित्रपटक्षेत्रातील एक आघाडीचे लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेची भीषणता सांगणाऱ्या ‘मास्साब’ चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा ते अशाच एका अनिष्ठ प्रथेविरुद्ध भाष्य करणारा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट डोक्यावर घाण वाहून नेणाऱ्या मजुरांवर आधारित आहे. जी प्रथा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही देशातील अनेक भागात आजही सुरू आहे.

‘मैला’ असे या चर्चित चित्रपटाचे नाव असून एनएफडीसी चित्रपट बाजारने या चित्रपटाची निवड केली आहे. या चित्रपटाबद्दल आदित्यने सांगितले की, “डोक्यावर घाण वाहून नेणे ही परंपरा अमानवीय असून या अनिष्ठ प्रथेविरोधात १९८३ मध्ये एक कायदाही तयार करण्यात आला होता. मात्र, तरीही देशातील अनेक ग्रामीण आणि शहरीभागात सर्रासपणे ही प्रथा सुरू आहे.”

याबद्दल पुढे बोलताना आदित्य ओम म्हणाला की, “शहरी भागात गटारे साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चित्रपट बनवण्याची माझी इच्छा होती. याचवेळी मला बुंदेलखंड अधिकार मंचाचे काही लोक भेटले त्यांनी सांगितले की त्यांच्या भागामध्ये आजही डोक्यावर घाण वाहण्याची प्रथा सुरू आहे. या अनिष्ठ प्रथेविरुद्ध चित्रपट बनवण्याची इच्छाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यांनी मला शहरी भागापेक्षा ग्रामीण भागावर चित्रपट करण्याचा सल्ला ही दिला.”

हे पाहिलं का? प्रेक्षकांवर अभिनयाची जादू करणारे ‘आशिकी’मधील कलाकार कुठे आहेत?

“त्यानंतर मी मैनपूरी तसेच जालौनच्या भागात गेलो. तिथे घाण उचलणाऱ्या मजुरांच्या वस्तीत, त्यांच्या घरात गेलो. त्यांना भेटलो त्यांच्या दाहक आणि विरादक परिस्थितीची माहिती करून घेतली,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांंच्या या भीषण परिस्थितीवर बोलताना आदित्य ओम म्हणाला की, “या लोकांची अवस्था खूपच दयनीय आहे. मी त्यांना सांगितले की, मला यावर एक चित्रपट बनवायचा आहे, जो तुमच्या मदतीशिवाय तयार होऊ शकत नाही. त्यावेळी त्यांनी मला त्यांची कथा सांगितली. ती सगळी भीषणता ऐकून मला चित्रपट बनवण्याची इच्छा झाली. अशा परिस्थितीत सामान्य माणूस एक क्षणभरही थांबू शकत नाही.”

दरम्यान २०२२ मध्ये आरक्षणावर आधारित ‘कोटा’ आणि जलवायूवर आधारित असलेल्या ‘बंदी’ चित्रपटात आदित्य ओम झळकणार आहे. हा असा चित्रपट आहे, ज्यामध्ये तो एकटाच काम करताना दिसणार आहे. सोबतच तो ‘अमरम’ आणि ‘दहनम’ या तेलूगु चित्रपटातही भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा