Monday, July 1, 2024

पाकिस्तानात जन्मूनही भारताचे नागरिकत्व घेणारा अदनान सामी, चार लग्नांमुळे आलेला चर्चेत

काही कलाकार हे खूप भाग्यवान असतात. याचे कारण असे की, त्यांचा जन्म अशा दिवशी होतो, ज्या दिवसाचे महत्त्व आख्ख्या देशाला असते. असेच काहीसे आहे अदनान सामी याच्याबद्दल. अदनान हा देखील १५ ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस साजरा करतो. एकीकडे भारत सोमवारी (दि. १५ ऑगस्ट) देश ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, तर दुसरीकडे अदनान त्याचा ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याचा सुरेल प्रवास…

अदनानचा जन्म १५ ऑगस्ट, १९७१ साली इंग्लंडमधील लंडनमध्ये झाला होता. त्याचे वडील हे पाकिस्तानी सैन्यामध्ये होते. १९६५ साली झालेल्या भारत- पाक युद्धात त्यांचा समावेश होता. अदनान लंडनमध्येच लहानाचा मोठा झाला. वयाच्या पाचव्या वर्षांपासून अदनानने पियानो वाजवायला सुरुवात केली. अदनानचे नाव जगातील सर्वात फास्ट पियानो वाजवणाऱ्यांमध्ये घेतले जाते. अदनान जवळपास २५ पेक्षा अधिक वाद्य वाजवतो. अदनानने १९८६ साली वयाच्या १५ व्या वर्षी त्याच्या गाण्याच्या करिअरला सुरुवात केली. (Adnan sami birthday special know about his journey his controversies)

अदनानने सुरुवातीला त्याचे वैयक्तिक अल्बम काढायला सुरुवात केली. त्याला जसजसे यश मिळत गेले, तसतसे त्याने चित्रपटांमध्ये गाणी गायला आणि संगीत द्यायला सुरुवात केली. १९९५ साली त्यांनी पहिल्यांदा ‘सरगम’ या पाकिस्तानी चित्रपटाला संगीत दिले आणि यात आशा भोसले, यांनी गाणे गायले होते. हा सिनेमा आणि या चित्रपटाचे संगीत तुफान गाजले. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक गाणी आणि संगीत तयार करत लोकांची वाहवा मिळवली.

अदनानने २००० साली भारतात आशा भोसले यांच्यासोबत ‘कभी तो नजर मिलाओ’ हा अल्बम काढला, आणि तो तुफान गाजला. त्यानंतर त्याने ‘लिफ्ट करा दे’, ‘तेरा चेहरा’, आदी अल्बम काढले जे खूपच लोकप्रिय झाले. २००१ साली अदनानने पहिल्यांदा ‘अजनबी’ चित्रपटासाठी ‘तू सिर्फ मेरा मेहबूब’ हे गाणे गायले, जे खूप गाजले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. संगीतकार, गायक म्हणून तो यशाच्या पायऱ्या चढतच गेला.

अदनानने त्याच्या अल्बमच्या माध्यमातून गोविंदा, अमिताभ बच्चन यांच्यापासून ते राणी मुखर्जी, दिया मिर्झा, महिमा चौधरी यांच्यापर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केले. त्याने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना देखील संगीत दिले. त्या चित्रपटांमध्ये गाणी देखील गायली.

वजनामुळे चर्चेत
अदनान त्याच्या गाण्यासोबतच अजून एका गोष्टीसाठी ओळखला जायचा, ते म्हणजे त्याचे वजन. अदनानची दुसरी ओळखच त्याचे वजन ठरली होती. त्यामुळे त्याचे नाव आले की, डोळ्यासमोर २३० किलोचा अतिशय जाड अदनान डोळ्यासमोर यायचा. मात्र, मध्यंतरी काही काळ इंडस्ट्रीमधून गायब झालेल्या अदनानने २००७ साली अतिशय वेगळे आणि आकर्षक रूप लोकांसमोर आले. अदनानने केवळ ११ महिन्यांमध्ये चक्क त्याचे १५८ किलो वजन कमी केले, आणि तो ७५ किलो वजनाच्या नव्या रूपात तो सर्वांसमोर आला. त्याचे हे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

भारताचे नागरिकत्व
व्हिजिटर्स व्हिसाच्या माध्यमातून भारतात राहणाऱ्या अदनानने २०१४ साली भारतीय नागरिकत्वासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. सुरुवातीला त्याचा हा अर्ज फेटाळण्यात आला. मात्र, दुसऱ्यांदा डिसेंबर २०१५ ला त्याला भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार त्याला १ जानेवारी, २०१६ पासून भारतीय नागरिक म्हणून मान्यता मिळाली. नागरिकत्व कायद्यातील कलम ६ अन्वये, विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. या अंतर्गतच अदनान सामीची नागरिकत्वाची विनंती मान्य करण्यात आली होती. मात्र, त्याच्या या नागरिकत्वावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी त्याच्या या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते.

चार लग्न
अदनान त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत राहिला. अदनानने त्याच्या जीवनात चार लग्न केले. १९९३ साली त्याने पहिले लग्न पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियारसोबत केले. जेबाने ‘हिना’ या चित्रपटात काम केले होते. या दोघांना एक मुलगा देखील झाला, त्याचे नाव अजान सामी खान ठेवले. मात्र, त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही.

पुढे अदनानने दुसरे लग्न दुबईची उद्योजिका असणाऱ्या अरब सबा गलादरीसोबत केले. मात्र, त्याने त्याचे दुसरे लग्न लपवून ठेवले. त्यानंतर २००४ साली जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हा या लग्नाबद्दल माहिती सर्वांसमोर आली. २००८ साली सबा भारतात आली आणि तिने पुन्हा अदनानसोबत लग्न केले. मात्र, एक वर्ष देखील हे लग्न टिकले नाही. सबाने अदनानवर घरगुती हिंसेचे आरोप देखील लावले होते. त्यांनतर २००९ साली त्यांनी घटस्फोट घेतला. पुढे २०१० साली त्याने रोया सामी खानसोबत चौथे लग्न केले. या दोघांना एक मुलगी आहे.

पद्मश्री पुरस्करामुळे वाद
अदनानला सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्याला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खूप मोठा वाद निर्माण झाला होता. अदनानला अनेक मोठ्या राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवणारी ही गाणी ऐकताच तुम्हीही बोलाल, ‘भारत माता की…जय!’
हे माहितीये का? इतिहास रचणाऱ्या ‘या’ १७ व्यक्तींचा जन्म पाकिस्तानचा, पण त्यांनी भारतालाच मानले आपले घर
खान कुटुंबाचा ‘हा’ फोटो पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुगेल, तिरंग्याला सलाम करताना दिसला ‘पठाण’

हे देखील वाचा