Wednesday, July 3, 2024

बॉलिवूडच्या बबली गर्लने खूपच कमी वयात कमावली कोट्यवधींची संपत्ती, जाणून घ्या आलियाच्या सिनेप्रवास

आलिया भट्ट बॉलिवूडची सर्वात प्रतिभावान आणि बबली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आलियाने खूपच कमी वयात ‘सुपरस्टार’ ही पदवी मिळवत तिच्यातील सशक्त अभिनेत्रीची जगाला ओळख करून दिली. सुरुवातील स्टार कीड असल्यामुळे आलियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली मात्र तिने याकडे सपशेल दुर्लक्ष करत स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केले. आज आलिया बॉलिवूडमधील सरावात यशस्वी, प्रसिद्ध आणि महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांमध्ये केवळ शोभेची बाहुली बनून न राहता तिने विविध चित्रपटांमधून तिच्यातल्या दमदार अभिनेत्रीला प्रेक्षकांसमोर आणले. आज म्हणजेच बुधवारी (15 मार्च)ला आलिया भट्टचा वाढदिवस आहे. बॉलिवूडची क्युट, बबली गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया भट्टचा 29 वा वाढदिवस आहे. चला तर मग यानिमत्त जाणून घेऊया तिचा सिनेप्रवास…

https://www.instagram.com/p/Ca7PAeZv-87/?utm_source=ig_web_copy_link

आलियाने खूपच कमी कालावधीत तिच्या सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत तिचे नाव अढळ केले. आलियाचे वडील महेश भट्ट हे प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक तर आई सोनी राजदान प्रसिद्ध अभिनेत्री. अशा सिनेमांच्या पार्श्वभूमी असलेल्या घरात १५ मार्च १९९३ साली मुंबईत आलियाचा जन्म झाला. स्टार कीड असल्यामुळे अनेकदा तिच्यावर खूप टीका देखील झाली. मात्र तिने तिच्या प्रतिभासंपन्न अभिनयाने सर्व टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले.

आलियाने १९९९ साली आलेल्या ‘संघर्ष’ सिनेमातून बालकलाकाराची भूमिका साकारली. त्यानंतर तिने २०१२ साली आलेल्या करण जोहरच्या स्टूडंट ऑफ इयर या सिनेमातून मोठ्या पडद्यावर यशस्वी एन्ट्री केली. या सिनेमातून आलियासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ म्हलोत्रा यांनी देखील पदार्पण केले. आलियाने फक्त एक ग्लॅमरस अभिनेत्री न राहता अनेकविध भूमिकांमधून स्वतःला प्रेक्षकांसमोर आणले. तिने तिच्या अभिनयाच्या कौशल्याला हरप्रकारे आव्हान केले.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१४ साली आलेला इम्तियाज अलीचा ‘हायवे’ सिनेमा. यात तिने साकारलेली वीरा आजही लोकांच्या लक्षात आहे. करियरच्या दुसऱ्याच सिनेमात आलियाने एक वेगळीच भूमिका साकारत समीक्षकांसह प्रेक्षकानांही चक्रावून सोडले. या सिनेमासाठी तिला फिल्मफेयर पुरस्कारने देखील गौरवण्यात आले.

यानंतर तिने २ स्टेट्स, हमटी शर्मा की दुल्हनिया, शानदार, कपूर अँड सन्स असे काही हलके फुलके रोमँटिक सिनेमे देखील केले. हे सिनेमे सुद्धा हिट झाले आणि आलियाच्या अभिनयाचे कौतुक देखील झाले. २०१६ साली आलियासाठी खूपच महत्वाचे आणि चांगले होते. याचवर्षी अभिषेक चौबे यांच्या ‘उडता पंजाब’ हा सिनेमात तिने काम केले. या सिनेमात ड्रुग्स हा संवेदनशील विषय हाताळण्यात आला होता. आलियाने या चित्रपटात एका गरीब बिहारी मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमात तिने तिच्या लूक्ससोबतच तिच्या भाषेवरही काम केले होते. या सिनेमातील तिच्या अभिनयाने तिने सर्वानाच भुरळ घातली. यावेळी देखील तिला फिल्मफेयर पुरस्कार देण्यात आला.

२०१६ साली आलियाने किंग खान शाहरुख खानसोबत डिअर जिंदगी या सिनेमात काम केले. हा सिनेमा अतिशय साधा आणि आजच्या काळातील प्रत्येक मुलीला जोडणारा असा सिनेमा होता. या सिनेमाने देखील आलियाला खूप कौतुक मिळवून दिले. शिवाय ती बद्रीनाथ की दुल्हनिया सिनेमात देखील दिसली.

मेघना गुलजार यांच्या २०१८ साली आलेल्या ‘राजी’ सिनेमाने आलियाला तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी दिली. या चित्रपटात आलियाने एका गुप्तचर मुलीची भूमिका निभावली, जी भारतासाठी एका पाकिस्तानी मुलाशी लग्न करून तिथून सर्व माहिती भारतात पोहचवते. या सिनेमासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०१९ साली झोया अख्तरच्या गल्ली बॉय सिनेमातील तिने साकारलेली सफिना खूप भाव खाऊन गेली.

आलियाने तिच्या तिच्या ९ वर्षाच्या करियरमध्ये अनेक पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले. अनेक सिनेमे तिने स्व बळावर यशस्वी देखील करून दाखवले. आई वडिलांकडून मिळालेला अभिनयाचा वारसा तिने तिच्या अभिनयाच्या बळावर सार्थक करून दाखवला. अभिनयासोबतच आलिया अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावर देखील झळकली आहे. शिवाय ती उत्तम अभिनेत्रीसोबतच एक उत्तम गायिका आणि उत्तम डान्सर देखील आहे.

आलिया अनेक मोठं मोठ्या ब्रॅंड्ससाठी जाहिराती देखील करते. भराभर सिनेमे करण्यापेक्षा दर्जेदार सिनेमांना जास्त महत्व देणारी आलिया नेहमी तिच्या अभिनयाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अजमावून बघत असते. चित्रपटांमध्ये शोभेची बाहुली न राहता कसदार अभिनयासाठी ती ओळखली जाते.

आलिया तिच्या अफेर्समुळे देखील अनेकदा चर्चांमध्ये आली आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिचे नाव खूपदा जोडण्यात आले. मात्र सध्या ती आणि रणबीर कपूर नात्यात आहे, याबद्दल अजून या दोघांपैकी कोणीजरी काही सांगितले नसले तरी त्यांच्या अनेक गोष्टींमधून एकमेकांबद्दल असलेले प्रेम व्यक्त होत असते.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यनंतर आलियाला नेपोटीझमवरून खूप ट्रोल करण्यात आले. त्यादरम्यान OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला सडक २ हा सिनेमा देखील यामुळे फ्लॉप गेला. मात्र ती यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि काम करत राहते.

आलिया सध्याच्या घडीला हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. एका रिपोर्टनुसार तिच्याकडे ७४ कोटींची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. शिवाय तिच्याकडे  ऑडी A6, ऑडी Q5 , रेंज रोवर इवोक, बीएमडब्ल्यू 7 सीरीज अशा महागड्या गाड्या देखील आहे. आलिया आगामी काळात अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहे.

            दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा