बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (alia Bhatt) हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ट्युनिशियातील अभिनेत्री हेंड साबरी हिच्यासोबत एका समारंभात आलियाचा सन्मान करण्यात आला, तिला ओमर शरीफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची पाचवी आवृत्ती सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयोजित करण्यात आली आहे.
गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्कार जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त करताना आलिया म्हणाली, “गोल्डन ग्लोब्सने सन्मानित होणे हा एक सन्मान आहे. जगभरातील चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या नवीन पिढीतील इच्छुक कलाकार आणि महिलांच्या वतीने बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. अशा वेळी जेव्हा लोक जागतिक स्तरावर प्रभावी कथा सांगण्यासाठी एकत्र येत आहेत, तेव्हा हा सन्मान खरोखरच महत्त्वपूर्ण ठरतो.”
या प्रसंगी, गोल्डन ग्लोब्सच्या अध्यक्षा हेलेन होहन म्हणाल्या, “आम्हाला आलिया भट्टला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करताना आनंद होत आहे. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील तिच्या असाधारण योगदानाची दखल घेतो आणि जागतिक स्तरावर चित्रपट आणि टेलिव्हिजनसाठी एक गतिमान आणि प्रभावशाली केंद्र म्हणून मध्य पूर्वेच्या सततच्या वाढीचा उत्सव साजरा करतो.”
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, आलिया भट्ट लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी स्पाय युनिव्हर्स चित्रपट “अल्फा” मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ आणि बॉबी देओल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. आलिया शेवटची “जिग्रा” चित्रपटात दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










