Friday, July 5, 2024

रेमोसाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी केली प्रार्थना, पहा काय केले ट्विट

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझाला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रेमोची प्रकृती आता स्थिर असून तो उपचाराला प्रतिसाद देत आहे. रेमो सध्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असून त्याचे फॅन्स त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. सोबतच अनेक कलाकार देखील सोशल मीडियावर त्याला उत्तम प्रकृतीच्या शुभेच्छा देत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील रेमोसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी रेमोच्या एका फॅनचे ट्विट रिट्विट करत एक व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ एका रियालिटी शो चा असून यात रेमो स्पर्धकांना काही टिप्स देताना आणि त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना अमिताभ बच्चन लिहितात ,”लवकर बरा हो रेमो, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.”

नृत्यदिग्दर्शिका गीता कपूरने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रेमोसाठी एक संदेश लिहला आहे, ती म्हणते, ” खूप प्रेम, लवकर बरा हो मित्रा, छोट्या लवकर बरा हो आणि मला पुन्हा त्रास देण्याची संधी दे, जे तुझ्यापर्यंत पोहचू शकतात त्यांची आणि जे पोहचू शकत नाही त्यांची सर्वांची एकच इच्छा आहे की तू लवकर बरे व्हावे.” तर टेरेन्स लुईस म्हणतो, ” माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, आपल्या प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती असते की ती एका निर्जीव पर्वताला सुद्धा चालवू शकेल, म्हणून तुम्ही सर्व माझ्या मित्रासाठी प्रार्थना करा. सध्या त्याला प्रेम, प्रार्थना, इच्छा आणि विश्वास यांची अधिक गरज आहे.” या संदेशसोबत टेरेन्सने रेमोचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

रेमो हा बॉलीवूडमधला प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक असून त्याने आतापर्यँत ‘बत्तमीज दिल, बलम पिचकारी, दिवानी मस्तानी, घर मोरे परदेसीया, सून साथिया यांसारख्या अनेक पुरस्कार विजेत्या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. रेमोने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले असून त्याच्या ए.बी.सी.डी हा सिनेमा आणि या सिनेमाच्या फ्रॅन्चायझी विशेष गाजल्या आहेत. शिवाय रेमो अनेक डान्स रियालिटी शो मध्ये जज म्हणून देखील काम करतो.

हे देखील वाचा