गेल्या सहा महिन्यांपासून एकाच आवाजात कोरोनाची कॉलर ट्यून ऐकून आपणही वैतागले असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आजपासून आपल्या मोबाइलची डीफॉल्ट कॉलर ट्यून बदलली गेली आहे.
आता कोरोनाच्या कॉलर ट्यूनमध्ये आपल्याला अमिताभ बच्चन यांच्याऐवजी जसलीन भाल्ला यांचा आवाज ऐकू येईल. शुक्रवारपासून जेव्हा आपण एखाद्याला कॉल कराल तेव्हा कोरोना लसीशी संबंधित कॉलर ट्यून आपल्याला ऐकू येईल. ही नवी कॉलर ट्यून हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

जसलीन भल्ला यांनी आपल्या करिअरची सुरुवात क्रीडा पत्रकार म्हणून केली होती. गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कोरोना विषाणूमुळे लादलेल्या लॉकडाऊन दरम्यान अचानक त्या चर्चेत आल्या.
त्यावेळी अचानक संपूर्ण देशात डीफॉल्ट कॉलरट्यून म्हणून जसलीन यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेला हा संदेश ऐकू येत होता, ‘कोरोना वायरस या कोविड-१९ से आज पूरा देश लड़ रहा है। मगर, याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं। उनसे भेदभाव न करें…’
जसलीन भल्ला या एक सुप्रसिद्ध व्हॉईस ओव्हर कलाकार आहेत. त्यांनी यापूर्वी कोरोनाशी संबंधित कॉलर ट्यूनवर आवाज दिला होता. गेल्या दशकभरापासून त्या व्हॉईस-ओव्हर कलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम करत आहेत, ज्यांचा आवाज आपल्याला दिल्ली मेट्रो, स्पाइस जेट आणि इंडिगो फ्लाईट्समध्येही ऐकायला मिळतो.
आपल्याला ठाऊक असेलच की, बिग बींच्या आवाजातील कॉलर ट्यून काढून टाकण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली गेली होती. या याचिकेत म्हटले आहे की, कॉलर ट्यूनमध्ये वास्तविक कोरोना योध्याचा आवाज असावा. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांचा आवाज कोरोना कॉलर ट्यूनमधून काढून टाकला पाहिजे.
कॉलर ट्यूनमध्ये आपल्याला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात हा संदेश ऐकायला मिळत होता, ‘नमस्कार, हमारा देश और पूरा विश्व आज कोविड-१९ की चुनौती का सामना कर रहा है। कोविड-१९ अभी खत्म नहीं हुआ है, ऐसे में हमारा फर्ज है कि हम सतर्क रहें। इसलिए जब तक दवाई नहीं, तब तक कोई ढिलाई नहीं। कोरोना से बचाव के लिए जरूरी है, नियमित रूप से हाथ धोना, मास्क पहनना और आपस में उचित दूरी बनाए रखना। याद रखिए दो गज दूरी, मास्क है जरूरी। खांसी, बुखार या सांस लेने में कठिनाई होने पर हेल्पलाइन नंबर १०७५ पर संपर्क करें।’










