Wednesday, July 3, 2024

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील कलाकारांनी घेतली ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांची भेट

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजही त्यांचा चार्म यत्किंचितही कमी झालेला दिसत नाही. ते नेहमीच त्यांच्या साधेपणामुळे आणि नम्रतेमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अमिताभ हे फक्त विशिष्ट पिढीपुरतेच मर्यादित नाही, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच वंदनीय, आदर्श आणि लोकप्रिय आहे. चित्रपटांचे फॅन असणारे किंवा फॅन नसणारे सर्वांनाच आयुष्यात एकदातरी त्यांना भेटण्याची, त्यांना जवळून बघण्याची इच्छा असते. या इच्छेला सेलिब्रिटी देखील अपवाद नाही. जर अचानक तुमची भेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत झाली तर तुमची त्यावर काय प्रतिक्रिया असेल? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे राव. आधी मी अमिताभ यांना भेटलो ही गोष्टच पचनी पडायला हवी त्यानंतर पुढे सर्व विचार येतील. अगदी बरोबर अशीच काहीशी अवस्था झाली आहे, महाराष्ट्राची हास्यजत्रा या सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या शोमधील कलाकारांची.

नुकतेच या हास्यजत्रेतील कलाकारांनी बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथे अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान अमिताभ यांनी या सर्व कलाकारांचे आणि हास्यजत्रेचे भरभरून कौतुक केले आहे. यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले, “तुम्ही सर्व कलाकार लोकांना हसवण्याचे सर्वात अवघड काम करत आहात. ते नेहमी असेच करत राहा’, अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, ते स्वतःही हास्यजत्रा पाहतात आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असतात. या भेटीचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

या भेटीबद्दल या हास्यजत्रेच्या कलाकारांनी त्यांच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत, अभिनेता गौरव मोरेने एका लांबलचक पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. तो लहानपणापासूनच अमितजींचा मोठा चाहता आहे. त्याला अमिताभ बच्चन यांना भेटण्याची कित्येक वर्षांपासून इच्छा होती अखेर ती इच्छा पूर्ण झाली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ““आणि ३० वर्षानी ही भेट झाली….चाचा जो २५ बरस में नही हुआ वोह अब होगा।
अगले हफ़्ते एक और क़ूली इन मवालियोंको पैसे देने से इनकार करनेवाला हैं…।ख्तावरऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ टा ना ना ना ना…जब तक बैठने को ना कहा जाय, शराफ़त से खड़े रहो ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं।
हे सगळ शाळेत असताना ऐकल होत.मग हे सगळे सिनेमे बघीतले आणि मग काय आपल्यात पण एक बच्चन आहे अस वाटायला लागल…. मग नाच असेल,गोळी मारण असेल,कॉमेडी असेल आणि सगळयात भारी मरणाचा सीन असेल तर मग विषयच नाही. त्रिशूल मध्ये बारूद मधुन अशी जी एंट्री घेतलेली आहे ओहहहह सगळच कमाल आहे… आणि शोले मधेय शेवटचा गोळी लागल्याचा सीन ..
हे सगळ बघुन अस वाटायच एकदा तरी आपल्याला हयाना बघायच आहे..पण कस..? असही वाटायच.
खुप प्रयत्न केले पण होप नाही सोडले…एकदा तरी डोळे भरुन बघणार अस डोक्यात होत..बघायच तर आहे फ़ोटो पण काढायचा आहे,मग बच्चन साहेबांच्या फ़ोटोसोबत फ़ोटो काढायचा आणि ख़ुश व्हायच. एकदा अस समजल की साहेबांना आपली
(महाराष्ट्राची हास्य जत्रा)
खुप आवड़ते..मग काय वाटल आत्ता आपण भेटु शकतो पण कधी हे माहित नाहीं….
पण होप नाही सोडले…आणि फायनली १८ सप्टेंबर २०२१ रोजी
ही भेट झाली. माझ्या लेखी सूर्य पाहिलेला माणुस आणि मी फ़्क्त बघत राहिलो..सदी के महानायक आपल्या समोर उभे आहेत,आपल्या समोर ते आपल्या शो बद्दल बोलतायत की (मैं आपका शो देखता हूँ, और मैं टिके रेहता हूँ आप कैसे कर लेते हो ..? आप सब अदभुत हो) संपूर्ण टीम च कौतुक करत होते आणि आम्ही फ़्क्त ऐकत आणि बघत होतो…त्यांची हिंदी ऐक़ण,त्यांची उभी राहणयाची पद्धत
मला तर सगळ डोळयासमोरुन जात होत की मी जे स्वप्न बघत आहे ते खर झाल…आणि हे सगळ झाल ते फ़्क्त आणि फ़्क्त हास्यजत्रे मुळे आणि ही ग्रेट भेट घड़वून आणली ते आमचे sony मराठी चे हेड अजय भालवणकर सर आणि अमित फाळके सर मी आपल्याला काय बोलु माझ्यासारख्या मुलाला त्याच स्वप्न पूर्णकरुण दिल..त्याबद्दल Thank u so much ”

तर हास्यजत्रेचा स्टार कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समीर चौगुलेने त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “तो क्षण…आयुष्यभर काळजाच्या कुपीत साठवून ठेवण्याचा….मेंदूत त्या क्षणाची पर्मनंट “एफडी” करून ठेवण्याचा…खूप वेळ भारावून जाण्याचा..तो क्षण आपल्या आयुष्यात एकदा तरी येतोच हे काल सिद्ध झालं…….काल सोनी मराठीचे हेड अजय जी भालवणकर आणि आमचे मित्र आणि सोनी मराठीचे नॉन फिक्शन हेड अमित फाळके यांच्या सहयोगामुळे आम्हा कलाकारांचे स्वप्न पूर्ण झालं.. महानायक श्री अमिताभ बच्चन यांची प्रत्यक्ष भेट झाली…आणि हि भेट आमच्या “महाराष्ट्राची हास्यजत्रे”मुळे झाली याचं आम्हाला सर्वांनाच अत्यंतिक समाधान आहे….बच्चनसर हास्यजत्रा नियमित बघतात आणि खूप एन्जोय करतात हे त्यांच्याकडून ऐकण हे केवळ स्वप्नवत होतं…बच्चनसर समोर असून हि दिसत नव्हते..कारण डोळ्यात साचलेल्या आसवांनी दृष्टीला थिजवल होतं..आसव हि वेडी ‘वाहणं’ हा गुणधर्म विसरून साचून बघत राहिली होती…पण इवलेसे कान मात्र नदीच पात्र होऊन ऐकत होते……बच्चनसर…२५ मिनिटे बोलले फक्त हास्यजत्रेबद्धल….”आप सब ये कैसे कर पाते हो?….एक मिनिटमे इतका बडा लाफ्टर क्रियेट करना,,..बहोत बढीया …आप सब कमाल हो ” हे असले संवाद बच्चन सरांकडून ऐकण हे अविश्वसनीय नाहीय का हो?…हे सगळ यश आहे आमच्या “हास्यजत्रा कुटुंबा”चं…आमचे दोन खांदे पिलर्स सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, आमचे सर्व तंत्रज्ञ, backstage कलाकार, स्पॉट बोईजदादा, मेकअप, costume, आर्ट डिपार्टमेंट, सर्व क्रियेटिव्ह आणि लेखक, आणि आम्ही कलाकार यांच्या एकत्रित कष्टायचे हे फळ आहे..आणि अर्थात सोनी मराठीच्या संपूर्ण टीमचा खंबीर पाठिंबा यावर हि जत्रा लोकांची टेन्शन दूर करण्याची खरी मात्रा ठरतेय याचं खूप समाधान आहे. मनःपूर्वक आभार सोनी मराठीचे अजय भालवणकरसर, अमित फाळके, गणेश सागडे, अमित दीक्षित, सिद्ध्गुरू जुवेकर यांचे …निखळ मनोरंजन करण्याच्या एकमेव हेतू मनात ठेऊन भरलेली आमची महाराष्ट्राची हास्यजत्रा आता सोमवार ते गुरुवार रात्री ९ ते १० सोनी मराठीवर भरणार आहे……यायला विसरू नका.. मी “जंजीर” या चित्रपटाला माझा जुळा भाऊ मानतो कारण त्याचा हि जन्म १९७३चा आणि माझा हि १९७३चा …आम्ही अनेक वर्षे एकत्र सुखाने एकाच शरीरात जगतोय…पण आम्हा दोघांमध्ये एक फरक आहे…मी स्वभावाने खूप मिळमिळीत आणि बोथट आहे..आणि हा भाऊ मात्र खूप टोकदार आहे..हा एवढ्या वर्षात इतका आत रुतलाय कि तो आता बाहेर काढणं अशक्य आहे…पण आम्हा भावंडांच्या जोडीला कालपासून हि “बच्चनसरांशी भेट” नावाची एक बहिण हि आयुष्यभरासाठी रुतलीय….आम्ही सुखात आहोत…”

सर्वांसाठी अभिनयातील खऱ्या अर्थाने दैवत असणाऱ्या सर्वांच्याच लाडक्या अमिताभ बच्चन यांना भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

 

हे देखील वाचा