आपल्या सर्वांना कुली चित्रपटातील अपघाताचा किस्सा ठाऊक असेलच. जेव्हा केव्हा हा सिनेमा टीव्हीवर लागतो तेव्हा त्या सिनवेळी अजूनही चित्रपट पॉज केला जातो आणि त्या अपघाताची माहीती दिली जाते. या अपघातातून अमिताभ बरे झाले हे आपल्याला ठाऊक आहेत. परंतु, त्यानंतर काय घडलं हे फार कमी जणांना ठाऊक आहे.
बिग बींनी त्या आठवणींना एका निमित्ताने उजाळा दिला. काय होत हे निमित्त आणि काय होती ती आठवण, पाहुयात या लेखात.
महानायक अमिताभ बच्चन यांच्या म्हणण्यानुसार, ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर अपघातातून सावरल्यानंतर जेव्हा ते रुग्णालयातून घरी परत आले तेव्हा त्यांनी प्रथमच त्यांच्या वडिलांना रडताना पाहिले होते. बिग बींनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.

याला निमित्त होतं ट्विटरवर अमिताभ बच्चन यांचे ४५ दशलक्ष फॉलोअर्स झाल्याचं. त्यांच्या एका चाहत्याने या आनंदापोटी त्यांचा, बाबूजी हरिवंश राय बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांचा फोटो शेअर केला. त्या फोटोवर असं लिहिलं आहे की, “पूज्य आई आणि बाबूजींच्या आशीर्वादाने ४५ दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण.”
अमिताभ यांनी त्या फॅनच्या पोस्टला पुन्हा रिपोस्ट केले, असे उत्तर दिले की, “या कॅप्शनमुळे ट्विटरवर ४५ दशलक्ष फॉलोअर्स समोर आले आहेत. धन्यवाद जास्मिन! पण हा फोटो अजूनही काही सांगू पाहतोय. हा तो क्षण आहे जेव्हा मी कुलीच्या अपघातानंतर मृत्यूशी लढा जिंकुन घरी आलो होतो. तेव्हा माझ्या वडिलांना रडताना मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. चिंताग्रस्त अभिषेक माझ्याकडे पहात होता.”
T 3777 – The caption informs of 45 million on Twitter .. thank you Jasmine, but the picture says a lot more ..
Its the moment I came home surviving death after the 'Coolie' accident ..
Its the first time ever I saw my Father breaking down !
A concerned little Abhishek looks on ! pic.twitter.com/vFC98UQCDE— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 9, 2021
या फोटोत असं दिसून येतं की हरिवंश राय बच्चन यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि अमिताभ बच्चन त्यांच्या पायाला स्पर्श करत आहेत. अभिषेक आजोबांच्या शेजारी उभा आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.
दिनांक २४ जुलै १९८२ रोजी ‘कुली’ चित्रपटाचे शूटिंग बंगळूरुमध्ये होतं. स्क्रिप्टनुसार चित्रपटाच्या फाईट सीनमध्ये पुनीत इस्सरचा पंच अमिताभच्या यांच्या तोंडावर लागणार होता, ज्यामुळे ते एका टेबलावर पडतात.
सीन प्लॅननुसार चित्रित झाला आणि सारं काही पूर्णपणे खरं दिसत होतं. पण टेबलचा एक कोपरा अमिताभ यांच्या पोटात घुसला होता. त्यांच्या पोटातील पडदा (ज्यामुळे उदरपोकळीतील अवयव एकमेकांशी जोडलेले असतात आणि रसायनांपासून त्याचे संरक्षण होते) आणि लहान आतड फाटलं होतं. बंगळुरू येथे त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया झाली.
अपघाताच्या ४ दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली होती असं म्हणतात, परंतु दुसर्याच दिवशी पुन्हा प्रकृती बिघडल्यावर त्याला मुंबईत आणण्यात आलं आणि त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं गेलं. अमिताभ जवळजवळ मृत्यूच्या दारात उभे होते. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनांचा परिणाम झाला आणि २४ सप्टेंबर १९८२ रोजी ते बरे झाले व घरी परत आले.