Tuesday, February 17, 2026
Home बॉलीवूड बिग बींच्या घरी झाले होते ‘या’ चित्रपटांचे शूटिंग; फोटो शेअर करत बिग बींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

बिग बींच्या घरी झाले होते ‘या’ चित्रपटांचे शूटिंग; फोटो शेअर करत बिग बींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन काही न काही कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात. ते जितके चर्चेत राहतात, तितके ते या वयात सक्रियही असतात. बिग बी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या चाहत्यांना अपडेट देत राहतात. अलीकडेच जया बच्चन यांच्या वाढदिवशीसुद्धा, बच्चन यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ते बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मनोरंजक गोष्टींबद्दलही बोलत असतात. आता त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध चित्रपट ‘चुपके चुपके’च्या रिलीझला 46 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

बिग बींनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, जो ‘चुपके चुपके’च्या सेटवरचा होता. त्यांनी लिहिले की, “हृषिकेश मुखर्जींनी बनवलेल्या आमच्या या चित्रपटाला 46 वर्षे पूर्ण झाली आहेत…!! फोटोत दिसणारे घर म्हणजे निर्माते एन.सी. सिप्पी यांचे घर आहे. ते मी नंतर विकत घेतले होते आणि विकले, आणि  पुन्हा विकत घेतले आणि त्याला नव्याने बांधले. आता हे आमचे घर ‘जलसा’ आहे! इथे बर्‍याच चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. ‘आनंद’, ‘नमक हराम’, ‘चुपके चुपके’, ‘सत्ते पे सत्ता’, आणि आणखी बरेच काही.”

 

‘चुपके चुपके’ या चित्रपटाला आता बरीच वर्षे झाली आहेत. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित हा विनोदी चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला होता. धर्मेंद्र, शर्मिला टागोर, अमिताभ बच्चन, जया बच्चन, असरानी, ​​ओम प्रकाश, डेव्हिड या कलाकारांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम निर्माण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 2.22 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्या कॉमिक टाइमिंगने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते.

अमिताभ-जया या जोडीने ‘झंजीर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘मिली’, ‘शोले’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये अभिषेक बच्चनच्या ‘बिग बुल’ चित्रपटाचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “काहीही असो, मुले नेहमी मऊच असतात आणि जेव्हा ते काहीतरी चांगले करतात तेव्हा आपला अभिमान वाढतो. एका वडिलांसाठी आपल्या ‘प्रगती अहवाल’ची नेहमीच भरभराट होताना पाहणे अभिमानास्पद असते.”

यावर्षी बिग बी ‘झुंड’ आणि ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहेत. ‘चेहरे’ची काही पोस्टर्सही रिलीझ करण्यात आली आहेत. त्याचबरोबर दोन्ही चित्रपटांच्या रिलीझ डेटचीही घोषणा करण्यात आली आहे. ‘झुंड’ 18 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, तर ‘चेहरे’ 30 एप्रिलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. याशिवाय अमिताभ यांच्याकडेही ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटही आहे. अयान मुखर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हे देखील वाचा