Saturday, June 21, 2025
Home मराठी ‘चंद्रा’ गाण्याला मिळतोय भन्नाट प्रतिसाद, आजीबाईंना देखील आवरला नाही थिरकण्याचा मोह

‘चंद्रा’ गाण्याला मिळतोय भन्नाट प्रतिसाद, आजीबाईंना देखील आवरला नाही थिरकण्याचा मोह

सध्या मराठी चित्रपट जगतात एकापेक्षा एक नाविण्यपूर्ण चित्रपट बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. अनेक नवनविन विषयांवरील मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पावनखिंड, फत्तेशिकस्त सारखे अनेक ऐतिहासिक चित्रपटांनी सिनेमागृहे गजबलेली असतानाच आता अभिनेत्री अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar) चंद्रा चित्रपटाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटातील गाण्यांनी सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला असून दिपाली विचारे (Deepali Vichare) यांच्या कोरिओग्राफीचे कौतुक होत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही अशीच एक पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन केली आहे. ज्यामध्ये कोरिओग्राफर दिपाली विचारे डान्स करताना दिसत आहेत. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटात अमृताने एका ठसकेबाज लावणीसम्राज्ञीची भूमिका साकारली आहे. यामधील तिचा लूक आणि तडफदार नृत्याची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाच्या डान्सची कोरिओग्राफी दिपाली विचारे यांनी केली आहे. त्यांच्या या कोरिओग्राफीनेच या चित्रपटाचे सध्या जोरदार कौतुक होताना दिसत आहे. अमृता खानविलकरनेही या बद्दलतची एक पोस्ट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन केली आहे.

सध्या या चित्रपटातील तडफदार लावणींनी चाहत्यांना वेड लावले आहे. यामधील प्रत्येक गाण्यावर सोशल मीडियावर रिल्स बनत आहेत. अगदी तरुणांपासून ८० वर्षाच्या आजीबाईंपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अशाच एका आजीबाईंचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चंद्रमुखीमधील गाण्यावर त्या आजीबाईंनाही नाचण्याचा मोह आवरला नाही असेच दिसत आहे. व्हिडिओमधील आजीबाईंचा डान्स आणि उत्साह विशीतील पोरींना लाजवेल असाच आहे. आजींच्या या डान्सवर अमृता सुद्धा फिदा झाली आहे

दरम्यान प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे दौलत देशमाने या प्रतिष्ठित राजकारण्याची भूमिका साकारली आहे. तमाशात नाचणारी चंद्रा आणि दौलत देशमाने यांची जुळलेली मने, त्याचा समाजाने केलेला विरोध अशी रंजक कहाणी या चित्रपटात दाखवली आहे. चित्रपट २९ एप्रिलला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

  हेही वाचा –

हे देखील वाचा