सध्या मराठी सिनेसृष्टीमधे अतिशय वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण असे प्रयोग केले जात आहे. चित्रपटांमध्ये हाताळण्यात येणारे विषय देखील अतिशय वेगळे आणि लक्षवेधी असल्याने मराठी चित्रपटांचा प्रेक्षकही वाढला आहे. मागील अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजनविश्वात ‘चंद्रमुखी’बदल खूपच उत्सुकता दिसून येत होती. चंद्रमुखी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमात ‘चंद्रमुखी’ ही भूमिका नक्की कोण साकारत आहे याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. अनेक मोठमोठ्या नायिकांबद्दल सोशल मीडियावर अंदाज लावण्यात आले मात्र अखेर या प्रश्नाचे उत्तर सर्वांसमोर आले. मराठीसोबतच आता हिंदी मनोरंजनविश्व गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ‘चंद्रमुखी’ची भूमिका साकारणार आहे.
अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकचा चित्रपट असलेल्या ‘चंद्रमुखी’बद्दल खूपच बज होता. पोस्ट प्रदर्शित झाल्यानंतर नक्की कोणती अभिनेत्री ही भूमिका साकारणार याच्या चर्चा होत्या. नुकताच या सिनेमातील ‘चंद्रा’चा अर्थात चंद्रमुखीचा चेहरा समोर आला आहे. ‘वाजले की बारा’ या लावणीवर संपूर्ण महाराष्ट्राला थिरकवणारी अमृता ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.
अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून, ज्यात तिने चंद्रमुखी चित्रपटातील नवे पोस्टर शेअर केले आहे. यात ती स्वत: एका नृत्यांगनेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या कॅप्शन देताना अमृता खानविलकर म्हणाली, “चंद्रा नक्की कोण? ती दिसते कशी? ती हसते कशी? जिच्या दिलखेचक अदांसाठी तुम्ही आतुर होता, ती चंद्रा आता तुमच्या समोर अवतरली आहे. ढोलकीच्या तालात, घुंगरांची साथ घेऊन, तुम्हा रसिकांच्या टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात मी चंद्रा तुमच्या समोर आले आहे. मी आले आहे तुमचं मनोरंजन करायला, तुम्हाला प्रेमाची नवी व्याख्या सांगायला आणि लावणीच्या ठेक्यात मनमुराद नाचवायला…तर मग तयार आहात ना?” असा प्रश्नही अमृताने विचारला आहे.
‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर आणि संगीत अजय अतुल यांचे आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या ‘चंद्रा’ची ही प्रेमकहाणी आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा