Sunday, October 6, 2024
Home बॉलीवूड दुसऱ्या संधीचे सोने करत आनंद बक्षी यांनी निर्माण केली गीतकार म्हणून ओळख आणि सावरले अनेकांचे करिअर

दुसऱ्या संधीचे सोने करत आनंद बक्षी यांनी निर्माण केली गीतकार म्हणून ओळख आणि सावरले अनेकांचे करिअर

बॉलिवूडमध्ये आपल्या मनाचा ठाव घेणाऱ्या गाण्यांमुळे मोठी ओळख मिळवणारे गीतकार आनंद बक्षी म्हणजे हिंदी सिनेमातील सोनेरी पानच जणू. प्रत्येक भावनेला अतिशय मार्मिक आणि समर्पक शब्दात मांडण्याची कला त्यांना अवगत होती. आनंद बक्षी यांना सामान्य परिस्थितीतून देखील गाणी शोधून काढत ती लिहण्याची कला अवगत होती. आनंद बक्षी यांनी जवळपास चार दशकं आपल्या गाण्यांची जादू त्यांनी रसिकांच्या मनावर फिरवली आणि राज्य केले. २१ जुलै १९३० रोजी रावळपिंडी, पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म झाला, तर ३० मार्च २००२ ला वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आज (३० मार्च ) आनंद बक्षी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचे काही किस्से.

आनंद बक्षी यांचे वडील रावळपिंडीमध्ये बँकेत मॅनेजर होते आणि सोबतच सेनेत टेलिफोन ऑपरेटरची नोकरी देखील करायचे. जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा ते त्यांच्या परिवाराला घेऊन भारतात आले. त्यानंतर पुढे आनंद बक्षी हे गीतकार होण्याच्या स्वप्नाने मुंबईत आले मात्र त्यांना या मायानगरीमध्ये यश मिळाले नाही. अपयश मिळाल्यांनतर ते पुन्हा सेनेत भरती झाले मात्र काही काळाने आनंद बक्षी त्यांची नोकरी सोडून मुंबईत आले यावेळेस मात्र ते त=गीतकार झाले आणि अमाप यश देखील मिळवले.

आनंद बक्षी यांना १९५८ साली आलेल्या ‘भला आदमी’ सिनेमात गीतकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र हा सिनेमा काही जास्त जादू पसरवू शकला नाही. त्यानंतर १९६३ साली त्यांना राज कपूर यांनी आपल्या ‘मेहंदी लगे मेरे हाथ’ या सिनेमात संधी दिली आणि या चित्रपटातील गाणी गाजली आणि आनंद बक्षी यांना लोकप्रियता मिळाली.

आनंद बक्षी यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती १९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ सिनेमातून. या चित्रपटात त्यांनी ‘परदेसियों से न अंखियां मिलाना’, ‘ये समां.. समां है ये प्यार का’, ‘ एक था गुल’, ‘एक थी बुलबुल’ आदी गाणी लिहून त्यानी स्वतःसोबतच शशी कपूर यांचे डुबणारे करिअर देखील सांभाळले. याशिवाय त्यांनी ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘कटी पतंग’ आदी चित्रपटांसाठी देखील गाणी लिहीत राजेश खन्ना यांना सुपरस्टार होण्यासाठी हातभार लावला.

आनंद बक्षी यांना लोकांचे अमाप प्रेम मिळाले. त्यांना तब्ब्ल ४१ वेळा फिल्मफेयरसाठी नामांकन देण्यात आले, चारच वेळा त्यांना पुरस्कार मिळाला. त्यानी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या पिढींसोबत काम केले. ते काळानुसार आणि पिढीनुसार त्यांच्या लिखाणाच्या शैलीत बदल करायचे त्यामुळेच त्यांचे मोठे नाव होते. आनंद बक्षी यांनी नेहमीच बॉलीवूडला एकापेक्षा एक अशी सरस गाणी बहाल केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा