Saturday, September 21, 2024
Home बॉलीवूड ‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

कॉमेडियन राजपाल यादव तब्बल 20 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्यावेळी हा अभिनेता चित्रपटातील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडायचा. मग ते ‘भूल भुलैय्या’, ‘चूप चूप के’ चित्रपटामधील पात्र असो किंवा इतर कोणतेही पात्र असो. एकूणच राजपालने त्याच्या विनोदी स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज राजपाल आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 16 मार्च, 1971 साली उत्तरप्रदेशमध्ये झाला होता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यात आलेल्या वाईट काळाबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा अभिनेता एकेकाळी त्याच्या आयुष्यातील वाईट काळालाही सामोरा गेला आहे. आम्ही त्या घटनेबद्दल बोलत आहोत, जेव्हा राजपालला तुरूंगात जावे लागले होते. तो तुरूंगात गेल्याच्या बातमीने सर्व चाहते आश्चर्यचकित झाले होते. पण त्याने आपला वेळ तुरूंगात अशा प्रकारे घालवला की लोकही आनंदी झाले.

राजपाल यादव याला दिल्ली हायकोर्टाने 5 कोटींचा चेक बाऊन्स झाल्यामुळे 3 महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. तसेच त्याला तिहार तुरूंगात त्याची शिक्षा भोगावी लागली. राजपाल तुरूंगात शिक्षा भोगत असताना, त्या वेळेतही तो आपल्या कॉमेडीने लोकांना हसवायचा. राजपाल सर्व लोकांशी चांगलं बोलत असे आणि मनमोकळे पणाने विनोद करून सर्वांचे मनोरंजन करत असे.

तुरूंगाततून बाहेर आल्यानंतर राजपालने एका मुलाखतीत सांगितले की, ”मी तुरूंगातील उपस्थित लोकांशी संवाद साधायचो. त्यांच्यासोबत उपक्रमांमध्ये भाग घ्यायचो. जेव्हा मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गावाला जायचो, तेव्हाही मी तेथील लोकांशी गप्पा मारायचो. या सर्व गोष्टी आपल्याला आयुष्यात नवीन गोष्टी शिकवतात. मी तुरूंगात ‘राजूची शाळा’ बनवली होती. जिथे मी लोकांना अभिनय शिकवायचो. मला ही योजना इतर शहरांमध्ये देखील न्यायची आहे.”

सन 2010मध्ये राजपाल यादवने दिग्दर्शकाच्या रूपात त्याच्या ‘अता-पता लापता’ या चित्रपटासाठी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. अभिनेत्याने ही कर्जाची रक्कम त्या व्यक्तीला परत न केल्यामुळे, कर्ज देणाऱ्या व्यक्तीने कोर्टाची मदत घेतली. राजपाल 10 कोटी 40 लाखांची रक्कम त्याला परत करेल असा कोर्टामध्ये करार झाला. परंतु जेव्हा त्याने ही रक्कम दिली नाही, तेव्हा कोर्टाने त्याला तुरूंगात पाठविण्याचे आदेश दिले. यानंतर जेव्हा राजपालने त्या व्यक्तीला हे पैसे परत करण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेचा चेक दिला, जो बँकेत जमा झाल्यावर बाऊन्सही झाला. यानंतरच त्या व्यक्तीने राजपालला वकिलामार्फत नोटीस पाठविली.

अभिनेता राजपाल यादवच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने दूरदर्शनच्या ‘मुंगेरी के भाई नौरंगीलाल’ या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. यात राजपाल नकारात्मक भूमिका करण्यात यशस्वी झाला. पण नंतर त्याने विनोदी भूमिकांवर अधिक लक्ष दिले. ‘प्यार तूने क्या किया’ मध्ये त्याने विनोदी भूमिका साकारली आणि यानंतर तो हिंदी चित्रपटांचा मुख्य कॉमेडियन झाला. त्याने ‘हंगामा’, ‘वक्त: रेस अगेन्स्ट टाईम’, ‘चूप चूप के’, ‘गरम मसाला’, ‘फिर हेरा फेरी’, ‘ढोल’, ‘भूल भुलैय्या’, अशा चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आणि प्रेक्षकांना पोटधरून हसवले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-“ही माझी शेवटची पोस्ट…” म्हणत आमिर खानने ठोकला सोशल मीडियाला ‘राम राम!’

-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा

-‘आम्ही जवळपास अर्धा तास एकमेकांशी…’, आमिर खानने केला किरणबद्दल असलेल्या आपल्या प्रेमाचा खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा