Wednesday, June 26, 2024

‘ती’ गेल्याचे वृत्त कळताच दिलीप कुमारांनी चेन्नईवरुन थेट मुंबई गाठलं, पण…

आज बॉलीवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांनी नुकताच आपला ९८वा वाढदिवस साजरा केला. दिलीप कुमार यांनी आपल्या दमदार अभिनयाने जगाच्या पाठीवर हिंदी सिनेमाचा चेहरा मोहराच बदलवून टाकला. दिलीप कुमार हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या आणि मधुबाला यांच्या नात्याबद्दल ओळखले जातात. जगजाहीर असणारे त्यांचे नाते कधीच लग्नापर्यंत पोहचू शकले नाही. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलीप कुमार आणि मधुबाला या सुंदर जोडीच्या प्रेमाचा दुःखद अंत कसा झाला ते या लेखातून पाहू.

हिंदी सिनेमातील सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मधुबाला. आपल्या जबरदस्त अभिनयाने मोठ्या पडद्यावर अनेक दशक अधिराज्य गाजवणारे दिलीप कुमार. मधुबाला आणि दिलीप साहेब यांचे नाते दिवसेंदिवस आधिक घट्ट होत होते. जवळपास नऊ वर्ष दिलीप कुमार आणि मधुबाला नात्यात होते. मात्र तरीही त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहचू शकले नाही. दिलीप कुमार आणि मधुबाला एकमेकांच्या अखंड प्रेमात होते. दोघेही एकमेकांसोबत लग्न करायला तयारही होते. पण त्यांच्या नात्याला मधुबाला यांच्या वडिलांचा विरोध होता. अनेक सदस्य असलेल्या मधुबालाच्या घराचा संपूर्ण खर्च त्यांच्या कमाईवर चालत होता. कदाचित म्हणून मधुबाला यांच्या वडिलांची इच्छा नव्हती की त्यांनी प्रेमात पडावे आणि करियरकडे दुर्लक्ष करावे. तरीही ती दोघे वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करत होते.

बी.आर.चोप्रा यांच्या ‘नया दौर’ या सिनेमात दिलीप आणि मधुबाला एकत्र काम करत होते. चित्रपटाचे काही शूटिंग आउटडोअर होणार होते. मात्र मधुबाला यांच्या वडिलांना चित्रपटाचे शूटिंग बाहेर करणे मान्य नव्हते, म्हणूनच त्यांनी शूटिंगला बाहेर जायला नकार दिला. बी.आर.चोप्रा यांनी वैजयंतीमाला यांना चित्रपटासाठी साइन केले. मात्र प्रकरण इतके चिघळे की हा वाद कोर्टापर्यंत गेला. त्यावेळी दिलीप कुमार यांनी बी.आर.चोप्रा यांच्या बाजूने साक्ष दिली आणि दिलीप कुमार, मधुबाला यांच्या नात्याला उतरती कळा लागली. या प्रकरणानंतर दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना लग्नासाठी विचारले तेव्हा मधुबाला यांनी त्यांच्या वडिलांची माफी मागायला लावली मात्र दिलीप यांनी साफ नकार दिला. तेव्हापासूनच हे नाते हळू हळू संपुष्टात आले.

जेव्हा मधुबाला खूप आजरी होत्या तेव्हा दिलीप कुमार त्यांना बघायला गेले होते. मधुबाला यांना बघून दिलीप कुमारांना खूप वाईट वाटले. त्या खूप अशक्त झाल्या होत्या. मधुबाला यांना दिलीप कुमार म्हणाले, “लवकर बारी हो आपल्याला सोबत चित्रपट करायचा आहे.” मात्र त्या आजारातून कधीच उठल्या नाही आणि २३ फेब्रुवारी १९६९ ला त्यांचे निधन झाले. मधुबाला यांचे निधन झाले तेव्हा दिलीप कुमार चेन्नई मध्ये ‘गोपी’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. दिलीप कुमार यांना जेव्हा मधुबाला गेल्याचे समजले तेव्हा ते लगेच मुंबई आले पण तोपर्यंत मधुबाला यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते.

हे देखील वाचा