Saturday, July 6, 2024

एक दिवस ‘त्या’ दिग्दर्शकाने कंगनाला एका कॅफेमध्ये पाहिले, अन् स्ट्रगलर कंगनाला पहिला रोल मिळाला

बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणून कंगना राणावत ओळखली जाते. तिचा स्पष्टवक्ता आणि बिनधास्त स्वभाव, तिची निर्भयवृत्ती, चुकीच्या गोष्टी सहन न करण्याची सवय आदी अनेक गोष्टी कंगनाला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळे बनवतात. चित्रपटांच्या दुनियेत स्वबळावर येऊन केवळ प्रतिभेच्या जोरावर स्वतःचे मोठे प्रस्त निर्माण करणारी कंगना अनेकदा तिच्या विधानांमुळे अडचणीत देखील येते. मात्र असे असूनही ती कधीच डगमगत नाही आणि घाबरत नाही, म्हणूनच आज संपूर्ण जगामध्ये कंगनाने तिची ओळख निर्माण केली आहे. अशा या निडर कंगनाचा आज वाढदिवस. २२ मार्च १९८७ साली हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात कंगनाचा जन्म झाला.

कंगना अतिशय साध्या मध्यमवर्गीय परिवारातून या क्षेत्रात आली. कंगनाची आई शिक्षिका तर वडील उद्योगपती होते. कंगनाने एकदा सांगितले होते की, तिचा ज्यावेळी जन्म झाला तेव्हा दुसरी मुलगी झाली म्हणून सर्व नाराज झाले होते. पण लवकरच त्यांना जाणवले की, ही सुंदर आहे, त्यामुळे हिचे लग्न लवकर होईल. तीचे संपूर्ण शिक्षण हिमाचलमध्येच झाले. कंगना विज्ञान विषयात शिक्षण घेत असल्याने तिच्या आई वडिलांची इच्छा होती की, तिने डॉक्टर व्हावे.

Photo Courtesy : Instagram/kanganaranaut

मात्र सुरुवातीपासूनच कंगनाचा ओढा अभिनायकडे होता. तिला अभिनेत्री व्हायचे होते. यातच ती १२ वीला नापास झाली. त्यामुळे तिला खूप ओरडा खावा लागला. मात्र कंगनाने घरच्यांना सांगितले की, तिला अभिनेत्री व्हायचे आहे, पण घरच्यांनी ऐकले नाही, तेव्हा तिने व्हायच्या १६ व्या वर्षी घर सोडले आणि ती दिल्लीला आली. दिल्लीला आल्यावर सुद्धा तिच्या डोक्यात खूप गोंधळ होता की आपल्याला नक्की काय करायचे. यातच ती एका मॉडेलिंग एजेन्सीमध्ये पोहचली. तिला पाहून तिथे तिला तात्पुरते काम मिळाले, मात्र ती यात खुश नव्हती. तेव्हा तिने अभिनयात येण्यासाठी दिल्लीमध्ये अस्मिता थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश केला आणि अरविंद गौर यांच्याकडे अभिनय शिकण्यास सुरुवात केली.

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

यांसोबत तिने अनेक नाटकांमध्ये देखील कामे केली. तिने अनेक मोठ्या नाटकांमध्ये चांगल्या भूमिका साकारल्या. तिथेच तिला कोणीतरी मुंबईला जाऊन चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ती मुंबईला आली आणि तिने आशा चंद्रा यांच्याकडे अभिनयाचा एक कोर्स केला. यावेळी तिने खूपच संघर्षमयी जीवन व्यतीत केली. अनेक दिवस ती फक्त ब्रेड, चपाती आणि लोणचे खाऊनच दिवस घालवायची. तिच्या वडिलांनी तिला या सर्व काळात कोणतीही आर्थिक मदत केली नाही.

मधल्या काही काळात ती कामाच्या शोधात असताना एका कॅफेमध्ये बसली होती. तेव्हा तिच्यावर दिग्दर्शक अनुराग बासू यांची नजर गेली आणि त्यांना ती आवडली. पुढे त्यांनी तिची माहिती काढून तिला त्यांच्या चित्रपटासाठी विचारणा केली. त्यावेळी अनुराग हे गँगस्टर हा सिनेमा तयार करत होते. त्यांनी कंगनाला सिमरन
ह्या मुख्य भूमिकेची ऑफर दिली. त्यावेळी कंगना फक्त १७ वर्षांची होती. तिने ही भूमिका स्वीकारली. दारूच्या आधीन झालेल्या सिमरनची भूमिका कंगनाने सुंदर पद्धतीने पडद्यावर साकारली. तिला या भूमिकेसाठी फिल्मफेयरचा पदार्पणाच्या पुरस्कार देखील मिळाला. हा सिनेमा खूप गाजला, त्यानंतर कंगनाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

Kangana Familly DB
Kangana Familly DB

दरम्यानच्या काळात कंगनाने अनेक सिनेमे केले, जे काही अपवाद सोडले तर सर्वच फ्लॉप झाले. यातच २००८ साली मधुर भांडारकर यांनी कंगनाला फॅशन सिनेमासाठी सहायक अभिनेत्रींच्या भूमिकेसाठी निवडले आणि हा सिनेमा कंगनाच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या सिनेमातील तिच्या प्रभावी अभिनयासाठी तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सिनेमानंतर तिने तिच्या अभिनयाची ताकद सर्वाना दाखवून दिली.

यानंतर तिने तनु वेड्स मनू, काइट्स, क्रिश ३, कट्टी बट्टी, सिमरन, रज्जो, डबल धमाल, उंगली, तेज, क्वीन आदी अनेक चित्रपट केले. यात तिला क्वीन, तनु वेड्स मनू आणि तनु वेड्स मनू २ या तीन सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कंगनाने तिच्या एकटीच्या हिमतीवर अभिनेत्याशिवाय चित्रपटांना १०० कोटी कमवून दिले आहे.

Photo Courtesy : Instagram/kanganaranaut

कंगनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर कंगना अनेकदा तिच्या अफेयरसाठी चर्चेत आली आहे. कंगना आणि आदित्य पांचोली यांच्या अफेयरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. आदित्य विवाहित असूनही ही दोघे नात्यात होते. मात्र हे नाते जास्त काळ टिकले नाही. कंगना आणि अध्ययन सुमन रोज ३ च्या सेटवर यांची भेट झाली आणि ते नात्यात आले, मात्र हे नाते देखील जास्त टिकले नाही. कंगना राणावत आणि ह्रितिक रोशन यांचे नाते तर जग जाहीर आहे. प्रेमात बुडालेल्या या दोघांनी लग्न करण्याचे देखील ठरवले होते, मात्र मधेच माशी शिंकली आणि त्यांचे नाते तुटले. हे नाते अगदी कोर्टापर्यंत देखील गेले होते.

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

कंगना तिच्या अफेयर इतकीच वादांमुळे देखील ओळखली जाते. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडवर नेपोटीझमचे गंभीर आरोप कंगनाने केले होते. शिवाय कंगना करण जोहर, कंगना जावेद अख्तर, कंगना हृतिक रोशन, कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत, कंगना आणि उद्धव ठाकरे यांचे वाद मागील काही महिन्यात प्रचंड गाजले.

कंगनाची तिच्या आजचा वाढदिवस खूपच खास आहे, कारण नुकताच तिला मणिकर्णिका आणि पंगा या चित्रपटनसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली आहे. शिवाय तिच्या बहुप्रतीक्षित सिनेमा ‘थलाइवी’चा ट्रेलर देखील आज प्रदर्शित होणार आहे. सोबतच कंगना ह्यावर्षी धाकडं, तेजस या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडच्या या पंगा क्वीनला दैनिक बोंबाबोंबकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

हे देखील वाचा