Saturday, July 6, 2024

सुरुवातीला कमवायचा फक्त ३५ रुपये, आज आहे १०० कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या सिनेमांचा दिग्दर्शक, वाचा संघर्षमय प्रवास

‘रोहित शेट्टी’ हे नाव उच्चारले की, डोळ्यासमोर येतात ते ‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘सिंबा’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ आदी अनेक सिनेमे. आजच्या काळातील बॉलिवूडमध्ये दमदार ऍक्शन आणि कॉमेडी सिनेमे देणाऱ्या या दिग्दर्शकाचा आज (१४ मार्च) वाढदिवस. रोहितने शून्यातून त्याचे एवढे मोठे विश्व साकार केले आहे. आजच्या पिढीच्या किंबहुना सर्वच पिढयांना रोहित शेट्टी हे नाव काही नवीन नाही. चला तर मग जाणून घेऊया बॉलिवूडमध्ये १०० कोटींपेेक्षा अधिक कमाई करणारे सिनेमे देणाऱ्या रोहितचा स्पॉटबॉय ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास.

दिनांक १४ मार्च १९७३ रोजी रोहितचा मुंबईत जन्म झाला. रोहितचे वडील एमबी शेट्टी हे ७०/८० च्या दशकातील प्रसिद्ध खलनायक आणि स्टंटमॅन होते, तर रोहितची आईसुद्धा जुनियर आर्टिस्ट म्हणून काम करायची. जरी त्याला चित्रपटांचा वारसा घरातूनच मिळाला असला, तरी त्याला स्वत: सिद्ध व्हायला प्रचंड संघर्ष करावा लागला. लहान वयातच त्याने चित्रपटांचे दिग्दर्शन करण्याचे ठरवले होते. मात्र, रोहित आणि त्याच्या भाऊबहिणींच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र खूपच लवकर हरपले, त्यामुळे त्याने घराला आर्थिक मदत करण्यासाठी काम करायला सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात रोहितने चित्रपटाच्या सेटवर स्पॉटबॉय म्हणून काम सुरु केले. तब्बू, काजोल अशा मोठ्या अभिनेत्रींसाठी त्याने स्पॉटबॉय म्हणून काम करत त्यांच्या कपड्यांची इस्त्री देखील केली. त्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी त्याने अजय देवगनच्या ‘फुल और कांटे’ या सिनेमासाठी दिग्दर्शक कुकु कोहली यांचा सहाय्यक म्हणून काम केले. सुरुवातीच्या काळात रोहितला दिवसाला ३५ रुपये मिळायचे.

पुढे त्याने अनिस बजमी यांच्या ‘प्यार तो होना ही था’, ‘हिंदुस्थान की कसम’, ‘राजू चाचा’ आदी सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्याने जवळपास १३ वर्ष सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. २००३ साली त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवत अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांना घेऊन ‘जमीन’ सिनेमा बनवला. हा सिनेमा सरासरी चालला. त्यानंतर ३ वर्षांनी २००६ साली त्याने मल्टीस्टारर ‘गोलमाल’ हा कॉमेडी सिनेमा तयार केला, आणि या सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यासिनेमाने रोहितला नाव, प्रसिद्धी, लोकप्रियता आणि दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. रोहित आणि अजय ही जोडी मोठ्या पडद्यावर सोबत आली की, सिनेमा सुपरहिट होणारच हे सर्वांनाच माहित आहे.

रोहितला प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याने त्याच्या संघर्षाविषयी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “सुरुवातीला सर्व नीट होते. मात्र, माझ्या वडिलांचे निधन झाले आणि आम्हाला आर्थिक अडचणी यायला सुरुवात झाली. वडील गेले तेव्हा मी बराच लहान होतो. माझे आणि माझ्या भावंडांचे शिक्षण सुरू होते. पण घरची आर्थिक परिस्थिती बघता मला जाणवले की, पुस्तक आणि वह्या घेण्यासाठी तसेच फी भरायला आपल्याकडे पैसे नाहीयेत, तेव्हा मी शिक्षण सोडून काम करायला सुरुवात केली. अनेक वर्ष सहाय्यक दिग्दर्शक, स्पॉटबॉय म्हणून काम केले. त्यानंतर मी अजयसोबत ‘जमीन’ या सिनेमाने माझ्या करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. माझे वडील आणि अजय देवगणचे वडील स्टंटमॅन असल्याने त्यांची खूप चांगली मैत्री होती. ओघाने मी आणि अजय सुद्धा चांगले मित्र झालो.”

‘गोलमाल’ सीरिज, ‘ऑल द बेस्ट’, ‘सं’डे आदी विनोदी सिनेमांनंतर रोहितने ‘सिंघम’ हा ऍक्शनपट तयार केला. या सिनेमाने अजय आणि रोहित या दोघांच्याही करियरला एका वेगळीच झळाळी मिळवून दिली. या चित्रपटानंतर रोहितने पुन्हा ‘बोल बच्चन’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ हे विनोदी सिनेमे केले. पुन्हा तो ‘सिंघम रिटर्न’ आणि ‘सिंबा’ या सिनेमांच्या निमित्ताने ऍक्शनकडे वळला.

रोहितने त्याच्या करियरमध्ये १३ सिनेमे केले. यातील ८ सिनेमांनी १०० करोड क्लबमध्ये एंट्री मिळवत रेकॉर्ड केले. रोहितच्या सिनेमांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या सिनेमात तो चारचाकी गाड्यांचे स्टंट दाखवणारच. गाड्या उडवायला रोहितला खूप आवडते, म्हणून तो गाड्यांचे सीन्स सिनेमात ठेवतोच ठेवतो. रोहितने मोठ्या पडद्यासोबतच लहान पडदा देखील भरपूर गाजवला आहे.

कॉमेडी सर्कसच्या परीक्षकापासून ते ‘खतरों के खिलाडी’च्या अनेक पर्वांच्या सूत्रसंचालकापर्यंत त्याने टीव्हीवर त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली. खतरो के खिलाडी या शो च्या सूत्रसंचालनामुळे त्याला तुफान लोकप्रियता मिळाली. हा शो हिट होण्याचे हे देखील एक कारण आहे.

आज रोहितने त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्याचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘सूर्यवंशी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या ३० एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत असून, यात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. शिवाय या सिनेमात अजय आणि रणवीर सिंग देखील पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा ३०० कोटींचा चित्रपट देणारा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट!’ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उभारले ‘पानी फाउंडेशन’

-खऱ्या आयुष्यात अविवाहित असलेल्या ‘भाईजान’ने चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीसोबत केलंय सर्वाधिक वेळा लग्न, पाहा फिल्मी वेडिंग लिस्ट

-फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीपासून ते डिंपल गर्ल प्रीती झिंटापर्यत; ‘ही’ आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींची खरी नावे

हे देखील वाचा