बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा ३०० कोटींचा चित्रपट देणारा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट!’ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उभारले ‘पानी फाउंडेशन’


बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार होऊन गेले आणि आहेत, ज्यांनी आपल्या भन्नाट अभिनयाने आपल्या भूमिकेला जिवंत ठेवले. प्रेक्षकांना कधी हसवले, कधी रडवले, त्यांना आपलेसे केले. असाच एक अभिनेता बॉलिवूडला लाभला तो म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका ‘आमिर खान’, ज्याला आपण ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ या नावानेही ओळखतो. आमिर आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ३० वर्षांपेक्षा अधिक काळ आमिरने बॉलिवूडमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कारकीर्दीवर टाकलेली एक नजर…

आमिरचा जन्म १४ मार्च, १९६५ रोजी मुंबईत झाला होता. त्याने बालपणापासूनच अभिनयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्याने सन १९७३ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी ‘यादों की बारात’ चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तेव्हापासून सुरू झालेला त्याच्या प्रवास आजही अविरत चालू आहे. आमिर हा सर्वात जास्त फॅन फॉलोविंग असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आमिरचे वडील ताहीर हुसैन हे प्रसिद्ध निर्माते आणि काका नासिर हुसैन हे अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यामुळे त्याला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला. वर्षातून एकच चित्रपट करणाऱ्या आमिरच्या सिनेमांची प्रेक्षक अगदी चातकासारखी वाट पाहत असतात. आमिरचा सिनेमा म्हटल्यावर सिनेमातून काही हटकेच पाहायला मिळणार हे सर्वाना माहित असते.

आमिर खानने सन १९८८ साली ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारत हिंदी सिनेसृष्टींमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा, कथा, गाणी आणि दमदार अभिनय यांमुळे सुपर- डुपर हिट झाला. या सिनेमानंतर आमिरने ‘राख’, ‘लव लव लव’, ‘अव्वल नंबर’, ‘तुम मेरे हो’ असे एकपाठोपाठ एक फ्लॉप सिनेमे दिले. मात्र, १९९० साली आलेल्या ‘दिल’ सिनेमाने आमिरला पुन्हा यशाची पायरी चढण्यास मदत केली. आमिरला जरी घरातच अभिनयाचे बाळकडू मिळाले असले आणि चित्रपटाची पार्श्वभूमी असणाऱ्या सिनेमातूनच आला असला, तरी त्यालासुद्धा या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.

मात्र, तरीही त्याने हार न मानता त्याचे प्रयत्न आणि मेहनत चालू ठेवली आणि हळू हळू त्याच्या या प्रयत्नांना यश मिळाले आणि आमिरने एक सुपरस्टार हे बिरुद कमावले. आपल्या सिनेमांसाठी अगदी छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींची बारकाईने चौकशी करणाऱ्या आणि कामात अतिशय परफेक्ट असणाऱ्या आमिरला ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ हे नाव मिळाले.

‘कयामत से कयामत तक’, ‘दिल’, ‘दिल हैं कि मानता नहीं’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘अंदाज अपना अपना’, ‘रंगीला’, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘इश्क’, ‘गुलाम’, ‘सरफरोश’, ‘मन’, ‘अर्थ’, ‘मेला’, ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘मंगल पांडे: द रायजिंग’, ‘रंग दे बसंती’, ‘फना’, ‘तारे जमीन पर’, ‘गजनी’, ‘३ इडियट्स’, ‘धोबीघाट’, ‘तलाश’, ‘धूम 3’, ‘पीके’, ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमातून आमिरने त्याच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर आणत त्याच्या अभिनयाची ताकद सर्वांना दाखवली.

आमिर वर्षाला एक सिनेमा करतो पण तो 100 टक्के सुपरहिट होण्याची शक्यता असते. ते बॉक्स ऑफिसचे ट्रेंड सेटर आहेत. 300 कोटी क्लबची सुरुवात आमिरच्या सिनेमानेच झाली.

मात्र, याव्यतिरिक्त खूप कमी लोकांना माहित असेल की, आमिर खान हा उत्तम टेनिस खेळाडू आहे. तो महाराष्ट्रासाठी राज्य स्तरीय टेनिस स्पर्धा देखील खेळाला असून, रॉजर फेडरर त्याचा आवडता टेनिस खेळाडू आहे.

आमिरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्याने दोन लग्नं केली आहेत. त्याने पहिले लग्न रीना दत्तासोबत केले. रीना त्याची बालपणीची मैत्रीण होती. त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. मात्र, दोघांचा धर्म वेगळा असल्याने या लग्नासाठी त्यांना परवानगी मिळायला खूप त्रास झाला. पण अखेर २१ वर्षाच्या आमिरने २० वर्षाच्या रीनासोबत लग्न केले.

जेव्हा यांचे लग्न झाले, तेव्हा आमिरचे करियर नुकतेच सुरु झाले होते. त्यामुळे त्यांनी सर्वांपासून लग्न झाल्याची बातमी लपवून ठेवली. मात्र, काही काळाने त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यांनी जगासमोर लग्न केल्याचे मान्य केले. या दोघांना दोन मुलं झाली आणि लग्नाच्या १६ वर्षांनी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

घटस्फोटाच्या दु:खी झालेला आमिर सिनेमांची शूटिंग करतच होता, तेव्हा त्याची किरण रावसोबत ओळख झाली. किरण राव ही आमिरच्या ‘लगान’ सिनेमाची सहाय्यक दिग्दर्शक होती. त्यांची मैत्री झाली आणि काही काळाने ते प्रेमात पडले. त्यांनी २००५ साली लग्न केले. या दोघांना एक मुलगा आहे. मात्र, आजही आमिर आणि किरणचे रीना दत्तासोबत अतिशय चांगले आणि मैत्रीचे नाते आहे.

आमिर एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच एक संवेदनशील व्यक्तीसुद्धा असल्याचे वेळोवेळी सर्वांच्या निदर्शनास आले आहे. आमिर बरोबरीच्या अनेक अभिनेत्यांनी चित्रपटांसोबतच टेलिव्हिजन क्षेत्रातही पदार्पण केले. मात्र, आमिरने टीव्हीवर येण्याची घाई न करता वेळ घेत तो एका हटके आणि सामाजिकदृष्टया महत्त्वाच्या असणाऱ्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून टीव्हीवर एन्ट्री केली. या कार्यक्रमातून त्याने देशासमोरील सामाजिकदृष्टया अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली. अतिशय अभ्यासपूर्व त्याने आणि त्याच्या टीमने हा शो तयार केला होता. अनेक प्रश्न मांडत असताना त्याने त्या प्रश्नांना अनेक उत्तरे देखील दिली. या शोचे आमिरने दोन पर्व केले, आणि दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

यासोबतच आमिरने भविष्यात निर्माण होणाऱ्या पाण्याची भीषण समस्या ओळखली आणि ती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्याने ‘पानी फाउंडेशन’ची स्थापना केली. या फाउंडेशनअंतर्गत आमिर महाराष्ट्रातील अगदी लहान मोठ्या गावांपर्यंत पोहोचून गावकऱ्यांना पानी फाउंडेशनकडून पाणी वाचवण्यासाठी आणि पावसाचे पाणी साचवून त्याच्या वापरासाठी प्रशिक्षण देऊन पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो.

आमिरला त्याच्या या अभिनयाच्या प्रवासात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात फिल्म फेअरसोबतच पदमश्री आणि पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्कारांचा देखील समावेश आहे.

आमिर लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २०२० मधेच प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे या सिनेमाचे प्रदर्शन लांबले. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ३ इडियट्सनंतर ही जोडी दुसऱ्यांदा प्रेक्षकांना मोठ्यापडद्यावर दिसणार आहे.

बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टला दैनिक बोंबाबोंबकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आमिर खान आहे खऱ्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण; ‘लगान’मधील मित्राची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

-भारतीय माजी क्रिकेटर रवी शास्त्रींसोबत अफेयरच्या चर्चा, नऊ वर्षांच्या करियरमध्ये तीस सिनेमांना नकार, तरीही अभिनेत्रीने घातली यशाला गवसणी

-वयाच्या २६ व्या वर्षी ‘राष्ट्रीय पुरस्कार’ पटकावणारी पहिली महिला सिंगर, अमेरिकेत साजरा केला जातो ‘श्रेया घोषाल डे’, वाचा सुरमयी प्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.