Wednesday, July 3, 2024

कला सादर करताना काळाने घातली झडप, परफॉर्मन्स दरम्यान ‘या’ कलाकारांचा झाला मृत्यू

‘हम रहें या ना रहें कल, कल याद आएंगे वो पल’ हे बोल ज्याच्या आवाजाने अजरामर झाले तो लोकप्रिय गायक केकेने जगाचा निरोप घेतला. म्हणतात ना खेळ कुणाला दैवाचा कळला, तसंच काहीसं झालं केकेबरोबर. कृष्णकुमार कुन्नथ (krushnakumar kunnath) हे त्याचे पूर्ण नाव असले, तरी तो केके या नावानेच लोकप्रिय झाला. अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत संगीतावर प्रेम करणाऱ्या केकेने हम रहें या ना रहें गाणं शेवटचं म्हणत आपल्या जाण्याचे संकेत दिले. कोलकातामधील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान अस्वस्थ वाटल्यानंतर काही वेळातच केकेने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आलेल्या वृत्तांमधून समजलं की त्याला हृदयविकाराचा झटका आला. पण मंडळी केके हा काही पहिला कलाकार नाही, ज्याने असा स्टेजवर परफॉर्म करताना अखेरचा श्वास घेतला. यापूर्वी काही कलाकारांना असाच आपली कला सादर करताना मृत्यूने जवळ केले, अशाच काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकारांबद्दल जाणून घेऊ.

केकेच्या मृत्यूच्या दोन दिवस आधीच मल्याळम गायक एडवा बशीर यांचेही लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असतानाच निधन झालं. बशीर हे लोकप्रिय मल्याळम गायक होते. त्यांनी अनेक मल्याळम चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेलं. त्याचबरोबर त्यांच्या स्टेज परफॉर्मन्समुळेही लोकांमध्ये त्यांच्याप्रती प्रेम होतं. त्यांच अन्नपूर्णेश्वरी हे गाणे विशेष गाजलं. पण केरळमधील अलप्पुझा शहरातील एका कार्यक्रमात गाणं गात असतानाच ते अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं, पण त्यांनी तोपर्यंत जगाचा निरोप घेतला होता. ते ७८ वर्षांचे होते.

पोवाडा, भारूड, लावणी, धनगरी गीतं असे अनेक संगीताचे प्रकार ज्यांच्यामुळे घराघरात पोहचले आणि त्यांना लोकप्रियता मिळाली, ते म्हणजे शाहीर विठ्ठल उमप.(viththal umap)  शाहीर पासून लोकशाहीर झालेल्या विठ्ठल दादा उमप यांनाही मृत्यू आला तो स्टेजवर. २७ नोव्हेंबर २०१० रोजी. नागपूरच्या दिक्षाभूमीजवळ मोठ्या जनसमुहासमोर एका दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमादरम्यान जय भीम असा नारा दिल्यानंतर स्टेजवरच ते अचानक कोसळले आणि काही क्षणातच त्यांची प्राणजोत मालवली. त्यांचे भारतीय संगीतातील योगदान नक्कीच मोलाचे राहिले, पण त्याचबरोबर त्यांनी केवळ लोकगीतांनीच सर्वांना वेड लावलं असं नाही, तर त्यांनी काही नाटकंही लिहिली आणि चित्रपटांत कामही केली. अशा वयाच्या ८० व्या वर्षीही उत्साह भरलेल्या या लोकशाहीराला अखेरचा श्वासही स्टेजवर घेण्याचे भाग्य लाभले.

आपली कला सादर करताना मृत्यू आलेल्या कलाकारांमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नृत्यांगना अश्विनी एकबोटे (ashwini ekbote) या देखील आहे. वयाच्या केवळ ४४ व्या वर्षी अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले होते. पुण्यातच लहानाची मोठी झालेल्या अश्विनी यांना अभियनाबरोबर नृत्याचीही मोठी आवड होती. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांबरोबरच मालिकांमध्ये नाटकांमध्येही काम केले. पण त्याचबरोबर त्यांचे मन नृत्यकलेतही रमले. पण २२ ऑक्टोबर २०१६ रोजी पुण्यातील भरत नाट्य मंदीर येथे नाट्यत्रिवीदा या कार्यक्रमादरम्यान अखेरचे नृत्य सादर करताना त्या अचानक स्टेजवर कोसळल्या. त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाल्याचे घोषित करण्यात आले.

अश्विनी एकबोटे प्रमाणेच आणखी महान एक कथकली डान्सर मदावूर वासुदेवन नायर यांनी आपली कला सादर करत असतानाच अखेरचा श्वास घेतला. पद्मभूषण पुरस्काराने गौरवलेल्या मदावूर वासुदेवन नायर यांनी कथकली या नृत्याविष्काराला लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी कंबडीकाली आणि कुथीयोत्तम या नृत्यप्रकारात प्रभुत्व मिळवलेले होते. त्यांनी वय वाढलेले असतानाही आपल्यातील कलाकार जागा ठेवला होता. अगदी वयाच्या ८८ व्या वर्षापर्यंत ते कला सादर करत राहिले. त्यांची कला सादर करत असतानाच ते ६ फेब्रुवारी २०१८ रोजी केरळमधील आंचल येथील अगस्त्यकोड महादेव मंदीरात कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे समजले.

कलाकराला आपली कला सादर करत मृत्यू येणे, हे खरंतर भाग्याचेच. पण तरीही अशा कलाकारांचे जाणे नक्कीच चटका लावून जाणारे असते आणि म्हणूनच त्यांचे अखेरचे सादरीकरणही नेहमीच सर्वांच्या लक्षात राहाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा