राजेश खन्ना हे भारतीय हिंदी सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार. ७०/८० चे दशक गाजवणाऱ्या ह्या अभिनेत्याने जे यश आणि स्टारडम पाहिले ते अजूनही कोणाला लाभले नाही. सलग १५ चित्रपट हिट देऊन त्यांनी सुपरस्टार हे बिरुद मिळवले. अभूतपूर्व यश,लोकप्रियता आणि झपाटलेला प्रेक्षक वर्ग त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही कलाकाराला लाभले नाही. अनेक लोकं त्यांच्या पायाची माती कपाळाला लावायचे. तर तरूणी स्वतःच्या रक्ताने त्यांना पत्र लिहायच्या. राजेश खन्ना यांच्या फोटोसोबत असंख्य तरूणींनी लग्न लावले होते. राजेश खन्ना यांची कार तरूणींच्या लिपस्टिकच्या खुणांनी भरून जायची.

राजेश खन्ना यांच्या स्टारडम बद्दल त्यांच्या अभिनेत्री असलेल्या आशा पारेख आणि सायरा बानो यांनी काही किस्से सांगितले आहेत. आशा पारेख यांनी सांगितले की, “हजारो तरुणी या देव आनंद किंवा राजेश खन्ना यांच्यावर जीव ओवाळून टाकत. मी फॅन्सचे असे प्रेम या दोघांव्यतिरिक्त कोणाबाबतच पाहिले नाही. मी जेव्हा त्यांच्यासोबत ‘जब हम’, ‘आन मिलो सजना’ आणि ‘कटी पतंग’ या सिनेमात काम करत होती तेव्हा शूटिंगच्या ठिकाणी हजारो लोकं बहुतकरून मुली त्यांना भेटायला यायच्या. इतकी गार्गी व्हायची की त्यामुळे कधी कधी तर शूटिंग रद्द केली जायची. मी राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांचा दुसरा चित्रपट ‘बहारों के सपने’ मध्ये काम केले होते. त्यावेळी ते खूप लाजाळू आणि शांत स्वभावाचे होते. त्यानंतर आम्ही दोन वर्षांनी पुन्हा सोबत काम केले, तोपर्यंत सर्वच बदलून गेले होते. राजेश खन्ना या दोन वर्षात स्टार झाले होते.”
आशा पारेख पुढे म्हणतात, ” मी देव आनंद यांच्या सोबत ‘महल’ सिनेमात काम केले होते. तेव्हा त्यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांना हात लावायला अनेक लोकं ताटकळत असायचे. असेच प्रेम मी राजेश खन्ना यांच्याबाबतही पाहिले. लोकांना राजेश खन्ना यांच्याबाबत वेड लागले होते.”
तर सायरा बानो म्हणतात, ” मला आज विचार करून खूप वाईट वाटते की, मला त्यांच्यासोबत दोन चित्रपट करायची संधी मिळाली होती मात्र काही कारणांनी मला त्यांच्यासोबत काम करता आले नाही. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘छोटी बहू’. हा सिनेमा मला ऑफर झाला तेव्हा मला माझ्या उपचारांसाठी लंडनला जायचे होते म्हणून मी या चित्रपटाला नकार दिला. नंतर शर्मिला टागोर यांनी त्या सिनेमात काम केले. मी ‘छोटी बहू’ सिनेमाच्या मुहूर्ताला गेली होती. तेव्हा माझा आणि राजेश खन्ना यांचा एकत्र चहा पितानाचा एक फोटो खूपच गाजला होता. त्यानंतर मला त्यांच्यासोबत ‘रेशीम की डोर’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली मात्र माझ्या दुर्दैवाने त्यांनी तो चित्रपट सोडला. त्यांना वाटले की हा सिनेमा करू शकेल की नाही मात्र तोपर्यंत मी माझे उपचार संपवून भारतात परतली होती. मग मी सुद्धा हा सिनेमा सोडला.”
“राजेश आणि मी जरी सोबत काम केले नसले तरी आम्ही दोघं एकमेकांचा खूप मान राखायचो. ते जेव्हा आजारी पडले तेव्हा सुद्धा मी कायम त्यांच्या संपर्कात होती. राजेश खन्ना यांनी जे स्टारडम पाहिले आणि उपभोगले ते आजपर्यंत कोणालाच प्राप्त झाले नाही. ते फक्त राजेश खन्ना यांनाच लाभले,” असेही त्या पुढे म्हणाल्या.
राजेश खन्ना यांनी १८ जुलै २०१२ साली या जगाचा निरोप घेतला होता.










