‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे प्रमुख संभाजी भिडे हे नेहमीच त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे गाजताना दिसतात. भिडे गुरुजी आणि त्यांचे व्यक्तव्ये सतत त्यांना वादात अडकवत असतात. असे असूनही ते बोलणे काही थांबवत नाही. नुकतेच संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत एक विवादित वक्तव्य केले आहे.
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे मोठे विधान केले आहे. यावरून आता एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या तर्कहीन विधानामुळे भिडे यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय पक्षांसोबतच काही सामाजिक संघटनांनी संभाजी भिडे यांचा निषेध केला आहे. भिडे यांच्या त्या वक्तव्यावर चतुरस्त्र अभिनेता असलेल्या अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
— atul kulkarni (@atul_kulkarni) July 29, 2023
अतुल कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची एक पोस्ट शेअर केली आहे. रोहित पवार यांच्या या पोस्टमध्ये महात्मा गांधींवर एक छोटीशी कविता अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या आवाजात वाचली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “एक संवेदनशील अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सध्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर रचलेल्या या ओळी मनाला खूप भावल्या… मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या अशा अनेक पिढ्या मेल्या पण ‘तो’ मेला नाही आणि मरणारही नाही.. ‘तो’ आहे #गांधीविचार आणि #महात्मागांधी!”
या कवितेमध्ये अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,
“तू मर बुवा एकदाचा असं नसतं करायचं! मारलं की मरायचं !!
गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात.
तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू….
असं नसतं करायचं, मारलं की मरायचं !
एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस
बदनाम करुनही बधत नाहीस, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं.
मारलं की निमुट मरायचं असतं !!
तू ना… एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ
ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो
जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं
मारलं की निमूट मरायचं असतं…पुढच्या वर्षी नक्की मरं !!!”
View this post on Instagram
दरम्यान अतुल कुलकर्णी यांनी ही पोस्ट इंस्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केली आहे.