विक्रम गोखलेंवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अवधूत गुप्तेची भलीमोठी पोस्ट, म्हणाला, ‘माझ्यावर विश्वास ठेवून…’


मागील काही दिवसापासून कंगना रणौत ही चांगलीच चर्चेत आहे. ‘१९४७ रोजी भारताला भीक मिळाली, खरे स्वतंत्र तर २०१४ मध्ये मिळाले,’ या वक्तव्यानंतर तिच्यावर खूप टीका करण्यात आली. यानंतर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी विरोध दर्शवला होता. याबाबत जेव्हा गायक अवधूत गुप्ते याला जेव्हा त्याचे मत विचारले, तेव्हा त्याने सांगितले होते की, “त्यांनी जे काही वक्त्यव्य केले, तेव्हा ते विचार करूनच बोलले असतील.” यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे.

त्याने लिहिले आहे की, “नमस्कार! आधी दुर्लक्षित करावे असे वाटले होते. पण, काही मित्र अजूनही नाराज आहेत असे वाटते, म्हणून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. सर्वप्रथम मी ह्यावर बोलू इच्छित नाही, कारण ते वडिलांच्या ठिकाणी आहेत असे सांगितले असता अधोरेखित शब्दांची जागा हेतूपुरस्सर बरोबर उलटी करून, माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढणाऱ्या सर्व वृत्तसंस्थांना मानाचा मुजरा. एवढेच सांगेन की, लोकांच्या प्रेमाचा हा ताजमहाल मी अतिशय कष्टाने कण-कण जमवून बांधला आहे. माझ्यासाठी त्यांचे प्रेम हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. काही हजार व्ह्यूजच्या क्षुल्लक स्वार्थासाठी प्लीज त्यावर दगड मारू नका!” (Avdhut gupte share a post to supporting Vikram Gokhale in kangana Ranaut speech about independence)

त्याने पुढे लिहिले की, “ही मराठी चित्रपटसृष्टी हे आमचे एक कुटुंबच आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही अशोक ‘मामा‘, विक्रम ‘काका‘ अशाच नावांनी हाका मारतो. आणि ते काहीही बोलले तरी सुद्धा मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे. याचा अर्थ ते जे काही बोलतात ते सर्व आम्हास पटते असा अजिबात होत नाही. परंतु, पटले नाही म्हणून तोंड वर करून सांगणे बरोबर ठरेल काय? त्यांच्या काळात त्यांनी नाटकापासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या कलेने मराठी रसिकवर्ग घडवला आणि वाढवला, ज्या झाडाची फळे आज आम्ही चाखत आहोत. त्यांचे उपकार आम्ही आणि मराठी रसिकवर्ग ठरवूनही फेडू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी उतारवयात केलेले एखादे वक्तव्य हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची मेहनत आणि कमवलेला सन्मान केराच्या टोपलीत टाकू शकत नाही.”

“राहता राहिला हा संपूर्ण वाद, ज्यामध्ये पडायची माझी अजिबात इच्छा नाही. याचा अर्थ माझ्याकडे सजगता नाही, असा अजिबात होत नाही. पण, माझ्याकडे माझी स्वतःची संगीत आणि चित्रपट अशी चिरंतन टिकणारी माध्यमे असताना या क्षणभंगुर समाज माध्यमांतून आणि वृत्तसंस्थाना काहीतरी विधाने देऊन मी का व्यक्त होऊ? आणि आजवर मी त्याच माध्यमातून व्यक्त होत आलेलो आहे. चित्रपट ‘झेंडा’पासून ‘जात’ गाण्यापर्यंत सर्व उदाहरणं तुमच्या समोर आहेत. बाकी, माझ्यावर आरोप करणाऱ्या मित्रांनी सांगावे की, या बातमीवर जितक्या तत्परतेने प्रतिक्रिया दिलीत किंवा शेअर केलीत तितक्याच तत्परतेने माझे ‘जात’ हे गाणे शेअर केले होते का?”

“माझी खात्री आहे की, माझ्या या मित्रपरिवारातील ९९ टक्के माणसे ही अतिशय समजूतदार, माझ्यावर विश्वास ठेवून प्रेम करणारी, माणुसकीला जपणारी अशीच सुसंस्कारी आहेत. बाकीच्या मित्रांना एवढीच विनंती की, तिरस्काराचे हे विष असे पसरवू नका. यामुळे होणाऱ्या त्रासाचे चटके शेवटी तुम्हाला देखील लागतीलच. काळजी घ्या! तुमचा अवधूत,” असे पुढे लिहिताना अवधूत गुप्ते म्हणाला.

त्याने लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच अनेकजण त्याच्या या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना त्याचे म्हणणे पटले आहे, तर काहीजण मात्र त्याच्या या वक्तव्याला विरोध दर्शवत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!

-अर्रर्र! कार्यादरम्यान गायत्रीला झाली दुखापत, ‘बिग बॉस’ने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण आदेश


Latest Post

error: Content is protected !!