भारत हा विविध धर्मियांचे वास्तव्य असलेला देश आहे. यातही हिंदू धर्मियांची संख्या सर्वाधिक आहे. हिंदू धर्मात सण, उत्सव, अध्यात्म, देव-देवता यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातही शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मियांसाठी पवित्र काळ मानला जातो. संपूर्ण देशात 7 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. सर्व भाविक शक्तीची आराधना, उपासना करण्यास सज्ज झालेत.
महाराष्ट्रात नवरात्र उत्सव काळात मंदिरात घटस्थापना केली जाते. एकूण शक्तीपीठांपैकी महाराष्ट्राला साडेतीन शक्तीपीठे लाभली आहेत. देवीदेवतांच्या आणि संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीतील ही साडेतीन शक्तीपीठे नेमकी कोणती आहेत, याबाबत जाणून घेऊयात.
महालक्ष्मी- कोल्हापूर
महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी कोल्हापुरातील महालक्ष्मी हे प्रथम शक्तीपीठ आहे. हे मंदिर साधारणता इसवी सन सहाशे ते सातशेमध्ये बांधलेले असल्याचे सांगितले जाते. कोल्हापूरची अंबाबाई अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून देखील ओळखली जाते. ही देवी पार्वती असल्याचे अनेक जणांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे इथे सापडलेली अनेक पुराण, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे, देवीच्या मूर्ती जवळ असलेले सिंह, शिरावर असलेले शिवलिंग यामुळे ही देवी पार्वती असल्याच्या खुणा आहेत असे अनेक जन मानतात. तसेच चाळीस किलो एवढे वजन असलेल्या या मूर्तीच्या मागे दगडांमध्ये सिंहाची प्रतिकृती कोरण्यात आली आहे.
महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये विष्णुवाहन गुरुडाची देखील प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. या मंदिरात गरुड असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी असल्याने आणि गरुड हे विष्णूचे वाहन असल्याने या मंदिरात आपल्याला गरुडाची प्रतिकृती पाहायला मिळते.
तुळजाभवानी- तुळजापूर
स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची कुलदेवता असलेली तुळजाभवानी देवी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजाभवानीचे मंदिर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. देवीने प्रत्येक युगामध्ये असुरांचा आणि दैत्यांचा वध करुन विश्वात शांतता आणि धर्माचरण प्रस्थापित करण्याचे मोठे कार्य केले. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामधील काही भागांची बांधणी ही हेमाडपंथी असल्याचे दिसते. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने मंदिराच्या कितीही जवळ गेले, तरी मंदिराचा कळस अजिबात दिसत नाही.
रेणुका देवी- माहूर
श्री परशुरामाची माता म्हणून रेणुकामातेला ओळखले जाते. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव कालीन राजाने रेणुका मातेचे मंदिर बांधले होते. माहूर हे साडेतीन पीठांपैकी तिसरे पीठ आहे. इथे रेणुकामातासह परशुराम आणि दत्तात्रेय यांची देखील प्राचीन मंदिरे आहेत. मंदिरासमोर एक सुंदरअसा किल्ला देखील आहे. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला होता अशी अनेकांची श्रद्धा आहे.
सप्तशृंगी देवी- नाशिक
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी नाशिकमधील सप्तशृंगी देवीचे रुप हे अर्धे पीठ आहे. निसर्गाच्या रौद्र रुपाची जाणीव करुन देनाऱ्या या देवीच्या मंदिरात जाताना एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे छातीत धडकी भरवणारे कडे पाहायला मिळतात. महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवी होमाद्वारे प्रकट झाली होती. सप्तशृंगीदेवीला ब्रम्हास्वरुपिणी असेही म्हणतात. देवीची मूर्ती ही तब्बल आठ फुटांची आहे. तसेच देवीला अठरा भूजा असून शेंदूर अर्चित आणि रक्तवर्ण देखील आहे. महिषासुराशी लढण्यासाठी देवीचे सर्व हात एकमेकांना जोडलेले असून त्यामध्ये सर्वांनी शस्त्र दिलेली आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकेकाळी अडखळत बोलणाऱ्या शरद केळकरने, आपल्या दमदार आवाजाने ‘बाहुबली’ला केले संपूर्ण भारतात प्रसिद्ध
-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष










