Saturday, April 20, 2024

ज्याच्या स्टाईलवर आख्खं जग होतं फिदा, तोच मायकल जॅक्सन गायचा बप्पी दांचे गोडवे; म्हणालेला…

मूनवॉक म्हणलं की, लोकांच्या डोळ्यांपुढं सर्वात आधी येतो तो म्हणजे ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन. अमेरिकन सिंगर, डान्सर आणि सॉन्ग रायटर असलेल्या मायकल जॅक्सनची फॅनफॉलोविंग फक्त अमेरिकतच नाही, तर अवघ्या जगात होती. जिथं-तिथं फक्त मायकल जॅक्सनची स्टाईल मारली जायची. लोकं रस्त्यावर चालतानापण त्याच्यासारखं मूनवॉक करू पाहायचे, पण ज्याच्या फॅन्सची संख्या कोटींमध्ये होती, ज्याच्या स्टाईलवर आख्खं जग फिदा होतं, तोच मायकल जॅक्सन ‘डिस्को किंग ऑफ इंडिया’ म्हणजेच बप्पी लहिरींच्या स्टाईलवर फिदा होता. एका भेटीदरम्यान मायकल जॅक्सन बप्पी दांचा फॅनच झाला होता. का मायकल जॅक्शन बप्पीदांवर फिदा झाला होता, आणि भेट झाल्यावर तो बप्पीदांना काय म्हणाला होता? चला जाणून घेऊया…

जगभरात फेमस असलेला मायकल जॅक्सन एकदा स्वप्ननगरी मुंबईला आला होता. इथं त्याची भेट बप्पी लहिरी यांच्यासोबत झाली. या किस्साची माहिती स्वतः बप्पी लहरी यांनी कपिल शर्मा शोमध्ये दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, “जेव्हा मायकल जॅक्सन मुंबईला आला होता, तेव्हा मी एका जागी बसून राहिलो होतो. त्यावेळी मायकल जॅक्सन माझ्याजवळ आला आणि त्याची मी घातलेल्या गणपतीच्या चैनवर पडली आणि तो हरवून गेला. त्यावेळी तो म्हणाला की, ‘ओह माय गॉड, फॅन्टॅस्टिक. तुमचं नाव काय आहे? तुमची चैन कमाल आहे.”

याच शोमध्ये बप्पी लहिरी यांनी पुढं सांगितलं की, त्यावेळी त्यानं माझं नाव विचारलं. यानंतर त्यानं मला दुसरा प्रश्न विचारला की, तुम्ही कंपोजर आहात का? यावर बप्पी यांनी “हो‌ मी कंपोजर आहे,” असं उत्तर दिलं. “मी डिस्को डान्सर हे गाणे बनवलंय.” त्यावेळी तो म्हणाला, “मला तुमचं जिम्मी जिम्मी वालं गाणं खूप आवडलंय.”

अशाप्रकारे मायकल जॅक्सन बप्पी दांचा फॅन झाला होता, पण मंडळी ज्याप्रकारे मायकल जॅक्सन बप्पी दांचा फॅन झाला होता, त्याचप्रकारे बप्पीदाही एका अमेरिकन सिंगरचे फॅन होते. त्यांचा बप्पीदांवर प्रभाव होता. तो अमेरिकन सिंगर म्हणजेच एल्विस प्रेस्ली. प्रेस्ली म्हणजे 50 ते 70 च्या दशकातला प्रसिद्ध सिंगर. त्याला ‘किंग ऑफ रॉक अँड रोल’ म्हणूनही ओळखलं जायचं. प्रेस्लीही गळ्यात सोन्याची चैन घालायचा. त्याच्याकडे पाहूनच बप्पी दांनाही गळ्यात सोन्याची चैन घालण्याची इच्छा निर्माण झाली होती.

एकदा मीडियाशी बोलताना बप्पी दांनी सांगितलं होतं की, “एल्विस प्रेस्ली सोन्याची चैन परिधान करत होते आणि ते मला खूप आवडायचे. त्यावेळी मी विचार करायचो की, जेव्हा मी यशस्वी व्यक्ती बनेल, तेव्हा स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करेल. जेव्हा माझ्याकडे पैसे आले, तेव्हा कुठे मी इतके सोने परिधान करू शकलो. सोने माझ्यासाठी लकी आहे.”

बप्पी लहिरींना बॉलिवूडचे गोल्डमॅन म्हटलं जायचं. आता विषय निघालाच आहे, तर बप्पी दांकडे किती सोनं होतं हेही सांगूनच टाकू, तर बप्पी लहिरींकडे 40लाख रुपयांचं सोनं होतं. ते जिथं कुठं जायचे, तिथं लाखो रुपयांचं सोनं घालूनच जायचे. त्यांच्याकडं 752 ग्रॅम सोनं आणि 4.62 किलो चांदी आहे. आता आजच्या बाजारभावाप्रमाणे तुम्हीच या सगळ्याच्या किमतीची कल्पना करा. पण हे सगळं सोनं घालण्यासाठी आज आपल्यात बप्पी दाच नाहीयेत. 15 फेब्रुवारी, 2022 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.

बप्पी दांनी संगीत क्षेत्राला अनेक गाणी दिली आहेत. त्यांच्या गाण्यांना एक वेस्टर्न टच देखील असायचा, ज्यामुळं सगळे त्यांच्या संगीताकडं खूप आकर्षित व्हायचे. त्यांची ‘डिस्को डान्सर’ आणि ‘जिम्मी जिम्मी’ ही गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहेत. यामुळे बॉलिवूडमधील अनेक गायक आणि कलाकार त्यांच्या गाण्यांवर फिदा असायचे.

एकाच वर्षात 33सिनेमात 180गाणी रेकॉर्ड केल्यामुळं त्यांचं नाव ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स’मध्ये देखील नोंदवण्यात आलंय.

अधिक वाचा:
साडीतही तितकीच हॉट दिसते उर्मिला, फोटो पाहून व्हाल घायाळ
तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत

हे देखील वाचा