मराठी चित्रपटसृष्टीतील जय वीरू म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे भरत जाधव आणि अंकुश चौधरी. अंकुश आणि भरत यांची मैत्री खूप जुनी. लालबाग-परळमध्ये या दोघांचेही बालपण गेले. तिथल्या गल्लीबोळातल्या छोट्या मोठ्या एकांकिकांपासून ते अगदी सिनेमापर्यंतचा प्रवास या दोघांनी एकत्रच केला. जसा काळ गेला तशी या दोघांमधली मैत्री अधिकच घट्ट होत गेली. त्यांच्या या प्रवासात अनेक चांगल्या वाईट आठवणी आहेत.
नुकताच अंकुशचा ४४वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने भरतने सोशल मीडियावर त्या दोघांचा खूप जुना फोटो पोस्ट करत ‘प्रिय अंकुश वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ लिहीत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांचा हा फोटो अगदी जुना म्हणजे २५/३० वर्षांपूर्वीचा असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये ही जोडी ओळखूसुद्धा येत नाहीये. त्यांच्या या फोटोवरूनच यांच्या मैत्रीचा अंदाज येत आहे. भरतच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
भरतने या फोटोसोबतच त्याचा आणि अंकुशच एक मस्त व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आली लहर केला कहर या कार्यक्रमाचा असून, या कार्यक्रमात अंकुश आणि भरत हे दोघं भरतच्या ‘गोड गोजिरी लाज लाजिरी’ या श्रीमंत दामोदर पंत नाटकातील गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओला हजारो व्युज आलं आहेत.
भरत आणि अंकुश या दोघांनी मराठीमध्ये दमदार काम करत प्रेक्षकांच्या मनावर नाव कोरले आहे. नाटकं, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये यांनी यशस्वी काम केले आहे.
या दोघांव्यतिरिक्त केदार शिंदे देखील या मैत्रीचा एक महत्वाचा भाग आहे. या तिघांची तिकडी मराठी मनोरंजनात खूप प्रसिद्ध आहे. यांच्या मैत्रीचा अनेकांना नेहमी हेवा सुद्धा वाटत असतो.










