चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांच्या जोड्या पडद्यावरच नव्हेतर, खऱ्या आयुष्यातही लोकप्रिय आहेत. त्यांच्या प्रेम कथांची, केमिस्ट्रीची नेहमीच चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत असते. भोजपुरी चित्रपट क्षेत्रातही असे कलाकार आहेत. त्यामधेच अभिनेत्री मोनालिसा आणि अभिनेता विक्रांत सिंग यांचा समावेश होतो. दोघांची प्रेमळ केमिस्ट्री जितकी पडद्यावर झळकली आहे तशी ती त्यांच्या खऱ्या आयुष्यातही आहे. दोघेही आता लवकरच ‘स्मार्ट जोडी’ या रियॅलिटी कार्यक्रमात झळकणार आहेत.
अभिनेत्री मोनालिसा आणि विक्रांत सिंग यांची जोडी भोजपुरी मनोरंजन क्षेत्रात खूपच लोकप्रिय आहे. दोघांनीही अनेक चित्रपटात आणि कार्यक्रमात एकत्र काम केले आहे. त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री सगळ्यांनाच प्रचंड आवडली होती. या दोघांनी बिगबॉसच्या १० व्या पर्वात आपला सहभाग नोंदवला होता. त्याच कार्यक्रमात त्यांनी एकमेकांशी विवाह गाठ बांधली. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली होती.
आता दोघेही ‘स्मार्ट जोडी’ या कार्यक्रमात एकत्र झळकणार आहेत. त्याबद्दल दोघेही खूप उत्साही आहेत. याबद्दल सांगताना मोनालिसा म्हणते की “आम्ही स्मार्ट जोडी कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक आहोत. या कार्यक्रमात भावनिक प्रसंगासोबतच अनेक आव्हानेही असणार आहेत. आम्ही अनेक वर्षापुर्वी लग्नाच्या बंधनात अडकलो आहोत. आमच्या प्रेमाची ताकद दाखवण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे आम्ही एकत्र धमाल करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी उत्सुक आहोत.”
या कार्यक्रमाबद्दल विक्रांत सिंगनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. “आम्ही स्टार प्लसवर भोजपुरी मनोरंजन क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणार आहोत. नच बलिएनंतर आम्ही पून्हा एकदा एकत्र काम करणार असल्याने खूपच आनंद होत असल्याचे त्याने सांगितले.” मनिष पॉल होस्ट असलेल्या या कार्यक्रमात सहभागी जोड्यांना अनेक आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमाचा कस लागणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील अनेक रोमँटिक, सुंदर क्षण आणि आठवणी दाखवल्या जाणार आहेत.
हेही वाचा –
- राणी चॅटर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला पुरस्कार, बांगड्या-बिंदीने बनवला अभिनेत्रीने पारंपारिक लूक
- टेलिव्हिजन रियॅलिटी शो स्मार्ट जोडी मधील ‘या’ सेलिब्रिटी जोडीला मिळते सर्वात जास्त मानधन
- जेव्हा लोक रेमो डिसूझाला ‘कालिया’ म्हणायचे तेव्हा यायचा खूप राग, आईच्या ‘या’ गोष्टीने बदलली विचारसरणी










