बिग बॉसचं सध्या चौदावं पर्व सुरू आहे. या पर्वात आधीच्या पर्वातील काही स्पर्धकांना पुन्हा प्रवेश देण्यात आला होता. यामध्ये राहुल महाजन, कश्मीरा शाह, राखी सावंत व विकास गुप्ता यांसारखे स्पर्धकांना घरात एन्ट्री दिली होती.
मात्र, या सर्वांमध्ये जेव्हापासून राखी सावंत बिग बॉसच्या घरात आलीये, तेव्हापासून तिने या शोला जणू जिवंत केलं आहे. राखीची एन्ट्री झाल्यापासून ती नेहमीच काहीतरी नवं करत राहते, जे प्रेक्षकांनाही खूप आवडतं. कधीकधी ज्युलीचा आत्मा तिच्यात येतो, कधीकधी ती भावनिक होते. आता ती बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाच्या प्रेमातदेखील पडली आहे.
राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. आजकाल राखीचं नवं नाटक बिग बॉसमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतीच राखी सावंत बिग बॉस स्पर्धक अभिनव शुक्लाच्या प्रेमात पडली आहे. आता राखी संपूर्ण वेळ अभिनवच्या नावाचा जप करत असते. नुकतंच तिने अभिनवच्या नावाचं कुंकू कपाळी भरलं, ज्याला रुबीनानेही प्रत्युत्तर दिलं आहे.
कलर्स टीव्हीच्या सोशल मीडिया पेजवरही याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत अभिनव शुक्लाच्या नावाने कुंकू भरते. ती अभिनवला ‘आय लव यू’ असंही म्हणते. ती अभिनव वर्कआउट्स करत आहे तिथे देखील पोहोचते आहे आणि त्याच्या शरीरयष्टीचं कौतुक करतेय.
या व्हिडिओमध्ये राखी ‘मुझको राणाजी माफ करना’ या गाण्यावर नाचतानाही दिसली आहे. अभिनव जेव्हा राखीजवळून जायला निघतो तेव्हा त्याला थांबविण्यासाठी ती त्याचे पाय आपल्या हातांनी पकडते आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न करते.
हे संपूर्ण नाट्य अभिनवची पत्नी रुबीनासुद्धा शांतपणे पाहत असते. अभिनव बेडरूममध्ये जाऊन रुबीनाशी बोलत असतो. यावेळी राखी मागून येते आणि ओम शांती ओम सिनेमातील संवाद म्हणते, ‘एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो अभिनव बाबू?.’
अभिनवही राखीला गमतीशीर उत्तर देतो आणि म्हणतो, “दीड रूपये.” यानंतर राखी जोरजोरात हसताना पाहायला मिळते. या संपूर्ण नाटकादरम्यान, रुबीना दिलाइकचे हाव भाव पाहण्याजोगे होते. राखीच्या सर्व वेडेपणाला रुबिका हसतखेळत सहन करते पण एका बायकोच्या मनातील इर्षेचे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत आहेत.