Tuesday, April 23, 2024

“हातातून निसटलेल्या गोष्टी गोळा करत…” बिग बॉस फेम ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केले घटस्फोटाचे दुःख

अभिनेत्री, मॉडेल आणि सूत्रसंचालिका शोनाली नागरानी ‘तांडव’ या सिरीजमुळे खूपच गाजली. मात्र आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कमालीची चर्चेत आली आहे. शोनाली तिचा नवरा असलेल्या शिराज भट्टाचार्यपासून विभक्त झाली आहे. शिराज एक फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर आहे. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान शोनालीने तिच्या या दुःखावर तिच्या भावना व्यक्त केल्या.

‘बिग बॉस सीझन ५’ मध्ये सहभागी झालेल्या मॉडेल शोनाली नागराणीने २०१३ मध्ये शिराजशी लग्न केले होते. पण दुर्दैवाने त्यांचे नाते हे केवळ सहा वर्ष टिकले आणि २०१९मध्ये ते वेगळे झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शोनालीने तिच्या वैवाहिक जीवनाचा अनुभव सगळ्यांना सांगितला. सोबतच तसेच तिच्यासाठी घटस्फोटाचा निर्णय घेणे किती अवघड होते आणि या काळातील त्रासाबद्दलही तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.

या मुलाखतीमध्ये शोनाली म्हणाली, “मी आणि माझा नवरा फेब्रुवारी २०१९ मध्ये वेगळे झालो. सध्या आमच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. मधल्या काळात मी भावनिकदृष्ट्या कोलमडले होते. माझ्याकडे अजिबातच ऊर्जा नव्हती की मी माझ्या कामासाठी, कुटुंबासाठी स्वतःला समर्पित करेल. त्यानंतर मला स्वतःचाच राग येऊ लागला. कालांतराने माझा स्वाभिमान आणि आत्मविश्वास पूर्णपणे संपला. सतत हसणारी शोनाली अचानक गायब झाली.”

पुढे शोनाली म्हणाली, “मला नंतर जाणवले की माझ्याकडे एक पर्याय आहे. पीडितेसारखे वाईट आठवणींसोबत जगणे किंवा आयुष्यात हातातून निसटलेल्या गोष्टी जमा करण्यावर लक्ष केंद्रित करणे. यातला मी स्वतःला सावरण्याचा आणि वाईट गोष्टींना पुन्हा चांगले करण्याचा पर्याय निवडला. मी वैयक्तिक यशासाठी आणि स्वतःच्या शोधासाठी या अनुभवाचा वापर केला.”

लग्नानंतर शोनालीने ५ वर्षे काम केले नाही. पतीपासून वेगळे झाल्यानंतर तिच्यासाठी पुन्हा कामावर परतणे अवघड होते. एक अशी वेळ आली शोनाली इतकी तुटली होती की तिने थेट मुंबई सोडून गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला. पुढे काही काळाने तिला कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला आणि ‘तांडव’ ही वेबसीरिज मिळाली. ही सीरिज तिला ऑडिशनशिवाय मिळाली होती. या सीरिजमध्ये तिच्या दमदार अभिनयाने तिला यशस्वीरित्या मनोरंजनविश्वात पुनरागमन करता आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“ती चित्रपटात येते नाचते, मार खाऊन…” कंगना रणौतबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ‘या’ अभिनेत्याचे उत्तर आले चर्चेत

उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून ओळख मिळवणारी श्रिया पिळगावकर आहे ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री

हे देखील वाचा