बॉलिवूडची हॉट अभिनेत्री आणि बंगालची शेरनी म्हणून ओळखली जाणारी बिपाशा बसू आज तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशाचा जन्म दिल्लीतील एका बंगाली कुटुंबात झाला. बिपाशाच्या जन्मानंतर तिचे कुटुंब दिल्लीहून कोलकत्यात राहायला गेले. पुढे बिपाशाचे शिक्षण कोलकात्यातच झाले. शिक्षणासोबतच बिपाशा मॉडेलिंगही करायची. कालांतराने बिपाशाने शिक्षण सोडून मॉडेलिंग आणि अभिनयावरच लक्ष केंद्रीत केले. बिपाशा तिच्या चित्रपटांसोबतच खाजगी आयुष्यासाठीही खूप चर्चेत राहिली आहे.
वयाच्या १७ व्या वर्षांपासून मॉडेलिंगमधून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या बिपाशाने २००१ मध्ये अब्बास मस्तान यांच्या ‘अजनबी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. विक्रम भट्ट यांच्या राज सिनेमाने बिपाशाला ओळख मिळवून दिली. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचं नामांकनही मिळालं होतं.
आज बिपाशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यतील काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
बिपाशाने केला कास्टिंग काउचचा सामना :
मीडिया रिपोर्ट्सनुसार बिपाशाने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला देखील कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. बिपाशा त्यावेळी म्हणाली होती की, ” मला एकदा एका निर्मात्याचा मेसेज आला की, मी तुझी स्माईल खूप मिस करत आहे. तो मेसेज मी वाचून दुर्लक्ष केले. नंतर पुन्हा त्याने मला मेसेज केला. त्यावेळी तो मेसेज मी माझ्या एका मित्राला दाखवला. माझ्या मित्राने त्या मेसेजला उत्तर म्हणून मला एक शब्द पाठवला. मी तोच शब्द त्या निर्मात्याला पाठून दिला. त्यानंतर त्याने मला कधीच त्रास दिला नाही.”
करीना कपूरने मारली बिपाशाच्या गालात :
असं म्हणतात की, ‘अजनबी’ चित्रपटाच्या वेळी या दोघींमध्ये खूप वाद झाले होते. त्यातच करीनाने बिपाशाला कानशिलात लगावली होती. त्यावेळी ह्या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
जॉन अब्राहमच्या आकंठ प्रेमात होती बिपाशा :
बिपाशा अभिनेता जॉन अब्राहमच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, बिपाशाला जॉनशी लग्न करायचे होते. मात्र एकदा जॉनने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, ‘तुम्हाला २०१४ च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. या वर्षात तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद येवो. जॉन आणि प्रिया अब्राहम.’ जॉनने लग्न केले ही गोष्ट बिपाशालाही माहीत नव्हती. जॉनच्या अशा वागण्याचा बिपाशावर वाईट परिणाम झाला होता. यातून बाहेर यायला तिला अनेक महिने लागले होते.
फिटनेस फिक्र बिपाशा :
बिपाशा बॉलिवूडची अतिशय फिट अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ती तिच्या फिटनेसबद्दल खूप सजग असते. अनेकदा ती तिचे व्यायाम आणि योगा करतानाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिवाय तिने तिची एक फिटनेसची डीव्हीडी देखील बाजारात आणली आहे.
बिपाशाने २०१६ मध्ये टीव्ही आणि चित्रपट अभिनेता करण सिंग ग्रोव्हर सोबत लग्न केले आहे. हे दोघे अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. शिवाय त्यांच्या सुट्ट्यांचे फोटो नेहमी ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
बिपाशाला दैनिक बोंबाबोंब कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.