Wednesday, April 9, 2025
Home कॅलेंडर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या बिपाशाचा मार्ग नव्हता सोपा, पैशांची बचत म्हणून करायची 10 रुपयांत जेवण

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या बिपाशाचा मार्ग नव्हता सोपा, पैशांची बचत म्हणून करायची 10 रुपयांत जेवण

बॉलिवूडची ‘बिल्लो राणी’ म्हणजेच बिपाशा बासूला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. आतापर्यंत आपण बिपाशाला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पाहिलंय. तिचे बहुतेक चित्रपट हे भयपट आहेत. परंतु या यशस्वी बॉलिवूड करकिर्दीपर्यंत पोहोचण्याचा बिपाशाचा प्रवास हा काही सोपा नव्हता. शनिवारी (7 जानेवारी) बिपाशा आपला 44वा वाढदिवस साजरा करत आहे. तर या लेखातून आपण काय काय घडलं बिपाशाच्या संघर्षाच्या काळात ते जाणून घेऊयात.

बिपाशा बासूचं नेहमीच तिच्या स्टाईल आणि फिगरबद्दल कौतुक झालं. एके दिवशी बिपाशा हॉटेलवर पोहोचली आणि सुपरमॉडेल मेहर जेसियाची (अर्जुन रामपालची पहिली पत्नी) तिच्याशी भेट झाली. फिटनेस आणि तिची वैशिष्ट्ये जाणून घेऊन मॉडेलिंग करण्याचा सल्ला तिने बिपाशाला दिला. मेहेरच्या सांगण्यावरून बिपाशाने 1996 मध्ये सुपर मॉडल स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकली. यानंतर, बिपाशाने मियामी येथे आयोजित जागतिक स्पर्धेच्या फोर्ड सुपर मॉडेलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यानंतर बिपाशाला अभिनेता डिनो मोरियाबरोबर कमर्शियल जाहिरात करण्याची ऑफर आली होती. दोघांनीही आपल्या मॉडेलिंग कारकिर्दीची सुरुवात जवळपास एकाच वेळी केली होती.

बिपाशा आणि डिनो यांनी बर्‍याच मॉडेलिंग प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं होतं, यामुळे दोघांची मैत्री आणखीनच घट्ट झाली आणि दोघेही नात्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री झाल्यानंतर एका मुलाखतीत बिपाशाने तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं की ती आणि डिनो मोरया पैसे वाचवण्यासाठी 10 रुपयांत जेवण करत. त्यावेळी चपाती आणि भात दहा रुपयांच्या प्लेटमध्ये मिळत असे, जे अन्न दोघेही पैशांची बचत करण्यासाठी वाटून घेत होते.

सन 2001 मध्ये रिलीज झालेल्या मल्टिस्टारर फिल्म ‘अजनबी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर बिपाशा २००२ मध्ये पहिल्यांदाच राज चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. विक्रम भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात डिनो मोरियादेखील मुख्य भूमिकेत होता. चित्रपटात एकत्र दिसण्यापूर्वीच त्यांच्या अफेअरची बातमी चर्चेत होती. पण त्याचवर्षी दोघेही वेगळे झाले. ब्रेकअपनंतरही बिपाशा आणि डिनो चांगले मित्र राहिले आहेत. यानंतर अभिनेता जॉन अब्राहमबरोबर बिपाशाचं नाव जोडलं गेलं.

बिपाशाने फोर्ड सुपरमॉडल कॉन्टेस्ट जिंकताना स्पर्धेचे परीक्षक असलेले विनोद खन्ना यांची नजर बिपाशा बासूवर पडली. विनोद यांना आपला मुलगा अक्षय खन्ना याच्यासमवेत बिपाशाला ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटामधून लाँच करण्याची इच्छा होती पण अभिनेत्रीने पदार्पणाची ही सुवर्णसंधी नाकारली. या भूमिकेसाठी ती खूपच लहान असल्याचं बिपाशाचं मत होतं.

विनोद खन्ना यांच्या व्यतिरिक्त जया बच्चन यांनी जे.पी. दत्ताचा ‘आखरी मोगल’ या चित्रपटामधून मुलगा अभिषेकसोबत लॉन्च करण्याची ऑफर दिली होती, जी बिपाशाने मान्यदेखील केली होती. मात्र, कारणास्तव हा चित्रपट होऊ शकला नाही. नंतर, जेपी दत्ता यांनी पटकथा बदलली आणि करीना कपूरबरोबर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातही बिपाशाला सुनील शेट्टी सोबत काम करण्याची ऑफर मिळाली पण पुन्हा तिने नकार दिला. यानंतर तिने 2001 मध्ये आलेल्या अजनबी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

‘अजनबी’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करीना कपूर खान आणि बिपाशा यांच्यातील भांडण हे इंडस्ट्रीमधील सर्वात वादग्रस्त भांडणांपैकी एक आहे. काही डिझायनर कपडे आणि सीन्सवरून दोघींमध्ये जोरदार वाद झाले ज्यात करीनाने तिला काळी मांजर देखील म्हटलं होतं. रंगभेदाची टिप्पणी ऐकून बिपाशा खूप दुःखी झाली. वादादरम्यान करीनाने बिपाशाचा तत्कालीन प्रियकर डिनो मोरियालाही एक्सप्रेसेशन लेस म्हणून संबोधलं होतं. संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघींमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून वाद होतच राहायचे.

अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिने  2016 साली अभिनेता आणि मॉडेल करण सिंग ग्रोव्हर याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे, बिपाशाचे हे पहिलेच लग्न होते, तर करण सिंग ग्रोव्हरचे हे तिसरे लग्न होते. त्याने यापूर्वी श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट या अभिनेत्रींशी संसार थाटला होता.(bipasha basu used to eat food with dino morea for 10 rupees to save money turned down vinod khannas movie offer know about her)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा मध्यरात्री गुंडांनी केला होता पाठलाग, अभिनेत्री बिपाशा बसूने सांगितला जिवावर बेतलेला प्रसंग

जॉनने दिला होता धोका, यामुळे होऊ शकले नाही बिपाशा-जॉन अब्राहमचे लग्न

हे देखील वाचा