‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील ओमकारचा असा केला टीमने सेटवर वाढदिवस साजरा


दूरदर्शनवर विविध चॅनेलवर येणाऱ्या अनेक दैनंदिन मालिका या भारतातील अनेक घराघरात लोकप्रिय आहेत. साधारण संध्याकाळी जवळपास प्रत्येक घरात या मालिका पाहिल्या जातात. सध्या महाराष्ट्रात अशीच एक मालिका गाजत आहे, ती म्हणजे झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. याच मालिकेतील सध्या चर्चेत असलेली भूमीका म्हणजे ‘ओमकार खानविलकर’. त्याच ओमचा म्हणजेच ही भूमीका साकारत असलेल्या शाल्व किंजवडेकरचा रविवारी २५ वा वाढदिवस होता. त्याचा हा वाढदिवस मालिकेच्या सेटवर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

मालिकांचे शूटींग महाराष्ट्राबाहेर
सध्या अनेक मराठी मालिकांचे शूटींग महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने परराज्यात सुरु आहेत. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचे शूटींगही सध्या दमण येथे हलवण्यात आले आहे. तसेच सध्या कोरोना व्हायरसची गंभीर परिस्थिती पाहाता त्यांचे शूटींग एका रिसॉर्टमध्ये होत असून तिथून त्यांच्या टीममधील कोणालाही बाहेर जाण्याची किंवा बाहेरच्या लोकांना आत येण्याची परवानगी नाही. याबद्दल स्वत: शाल्वनेच झी मराठीच्या फेसबुक पेजवर वाढदिवसानिमित्त चाहत्यांबरोबर मारलेल्या लाईव्ह गप्पांदरम्यान माहिती दिली.

त्याचपरिस्थितीमुळे शाल्वचा वाढदिवसही साधेपणाने पण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मालिकेच्या टीमला तिथे केक करता न आल्याने त्यांनी शाल्वला रात्री १२ नंतर दूधी हलवा खायला घातला. यावेळी मालिकेतील अनेक कलाकार उपस्थित होते. शाल्वनेही हा दूधी हलवा सर्वांना भरवत वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे.

सर्वोत्तम अभिनेत्याचा मिळवला पुरस्कार
काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर २०२०-२१ सालचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात शाल्वचा त्याने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत साकारलेल्या भूमीकेसाठी ‘सर्वोत्तम पुरुष अभिनेता’ म्हणून गौरव करण्यात आले होते.

मुळचा पुण्याचा आहे शाल्व
शाल्व हा मुळचा पुण्यातील असून त्याने फर्ग्यूसन कॉलेजमधून मास कम्यूनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. तसेच त्याने ‘येऊ कधी तशी मी नांदायला’ ही मालिका करण्यापूर्वी ‘बकेट लिस्ट’ आणि ‘एक सांगायचंय’ अशा चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने ‘मेड इन हेवन’ अशा वेबसिरिजमध्येही काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.