Friday, April 19, 2024

बोलता बोलता सहज कवितेच्या गावी जाणारा जितू जोशी, आहे मराठी इंडस्ट्रीमधील बहुआयामी व्यक्तिमत्व

मराठी सिनेसृष्टीमधे आज बहुसंख्य कलाकार आहेत. मात्र आजच्या पिढीतले अनेक कलाकार असे आहेत जे फक्त आपले अभिनयाचे काम करतात आणि बाजूला होतात. मात्र असे मोजकेच असे कलाकार आहेत, जे कलाकार असण्यासोबतच प्रचंड अभ्यास करतात. असे खूपच कमी अभ्यासू अभिनेते आपल्याकडे आहेत ज्यांना ऐकताना, पाहताना, वाचताना आनंदासोबतच समाधान देखील मिळते. अशा कलाकारांपुढे बसल्यावर आपल्याला आपणच कमी वाटायला लागतो. असाच एक कलाकार सुदैवाने मराठी इंडस्ट्रीला लाभला आहे, आणि तो म्हणजे जितेंद्र जोशी अर्थात आपल्या सर्वांचा जितू. जितेंद्र जोशीने त्याच्या प्रभावी अभिनयासोबतच त्याच्या उत्तम वक्तृत्वामुळे, लेखनामुळे आणि लक्षवेधी व्यक्तिमत्वामुळे त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज गुरुवारी (२७ जानेवारी) जितेंद्र जोशी त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. जितेंद्रने त्याच्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये रोमँटिक, खलनायक, कॉमेडी, ड्रामा सर्वच प्रकारच्या भूमिका साकारत त्याच्यातील तगड्या अभिनेत्याचे दर्शन सर्वांना घडवले आहे. जितू आज त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या अर्थपूर्ण कवितांसाठी देखील ओळखला जातो. आज जितूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल रंजक माहिती.

जितेंद्र जोशींचा जन्म २७ जानेवारी १९७८ रोजी पुण्यात झाला. त्याचे संपूर्ण पालनपोषण त्याच्या आईनेच केले. मूळचा मारवाडी असलेल्या जितूच्या आईचे खूपच कमी वयात लग्न झाले होते. त्याचे वडील खूप दारू प्यायचे आणि त्यामुळे त्याच्या आईने तो खूप लहान असतानाच त्यांना सोडून दिले. जितू आणि त्याची आई त्याच्या मामासोबत राहू लागले. वडील नसल्याने त्याला शाळेत खूपच चिडवले जायचे. त्यामुळे त्याने त्याची शाळा बदलली. याच शाळेत त्याला दशरथसिंग गुलाबसिंग परदेशी नावाचे सर त्याला मिळाले आणि त्यांनी त्याला खूप चांगले संस्कार देते त्याला हिंदीमधील अनेक लेखकांची ओळख करून दिली. त्यांनीच जितूला नाटकाची गोडी लावली आणि सोबतच त्याला फुल पँट घालण्याची देखील सवय लावली. या सरांमुळेच त्याला हिंदी भाषेची गोडी लावली. जितूची मराठीसोबतच हिंदीवर देखील खूप मोठा प्रभाव आहे.

सुरुवातीच्या काळात मामाच्या इलेक्ट्रिकच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. मात्र तिथे त्याचे मन रमत नव्हते, म्हणून तो दुकान बराच वेळ बंद ठेवायचा आणि तो बालगंधर्वला जायचा तिथे त्याने तिकीट तपासणाऱ्या लोकांशी मैत्री केली होती, त्यामुळे ते त्याला नाटक बघण्यासाठी असेच आत सोडायचे. त्यातून त्याला नाटकांबद्दल गोडी निर्माण झाली. इकडे त्याने मामला सांगितले की, त्याला या दुकानात रस नाही, नाटकांमध्ये रस आहे. मग त्याने दुकान सोडले पण पैसे कसे मिळणार मग त्याने सतीश तारे सुनील तारे यांच्यासोबत नाटकांमध्ये टेप चालवण्याचे अर्थात टपऱ्याचे काम सुरु केले. त्याचे त्याला एका नाटकाचे ५० रुपये मिळायचे. पुढे एका नाटकात छोटी भूमिका करणारा कलाकार न आल्याने ती भूमिका जितूला मिळाली. तिथूनच त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याच्या कामाची सुरुवात झाली. अभिनेते अशोक शिंदेने त्याला खूप मार्गदर्शन केले आणि तो पुढे तो मुंबईला आला.

सुरुवातीला काही नाटकात काम केले, काही मोठ्या लोकांना सहायक म्हणून काम केले. ७ ते ७ असे काम त्याला कधीच आवडले आंही, म्हणून त्याने नाटकांमध्येच काम करण्याचे ठरवले. मोहन वाघांसोबत त्याने खूप काम केले. सुरुवातीला ‘कमी तिथे आम्ही’ याच युक्तींवर त्याने काम केले आणि त्याला यश आणि कामही मिळत गेले. त्याला विक्रम गोखले, संजय मोने, चंद्रकांत काळे, श्रीरंग गोडबोले, निलेश मयेकर, महेंद्र कदम आदी अनेक लोकांनी त्याला खूपच मदत केली. त्याला खरी ओळख दिली ती झी मराठीवरील घडलंय-बिघडलंय या मालिकेने. या शोने त्याला घराघरात पोहचवले आणि त्याला लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली. नाटक करताना त्याला ‘गोलमाल’ हा सिनेमा ऑफर झाला आणि याच सिनेमाच्या निमित्ताने त्याने चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

पुढे त्याने ‘प्राण जाये पर शान ना जाये, ‘कुटुंब’, ‘कांकण’, ‘हाय काय नाय काय’, ‘पंगा ना लो’, ‘शाळा’, ‘गुलदस्ता’, ‘झक्कास’, ‘द अटॅक ऑफ २६/११’, ‘तुकाराम’, ‘दुनियादारी’, ‘बाजी’, ‘नटसम्राट’, ‘व्हेंटिलेटर’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘पोस्टर गर्ल’, ‘माऊली’ आदी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहेत. यासोबतच त्याने ‘सिक्रेड गेम्स’, ‘बेताल’, ‘कार्टेल’ आदी अनेक उत्तम वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. जितू जितका उत्तम अभिनेता, कवी आहे तितकाच उत्तम तो सूत्रसंचालक देखील आहे. त्याने ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘हास्यसम्राट’, ‘होममिनिस्टर’, ‘दोन स्पेशल’ आदी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. त्याने पाणी फाऊंडेशनसाठी देखील आमिर खानसोबत काम केले आहे. सामाजिक गोष्टींचा देखील अतिशय आपुलकीने विचार करणारा आणि त्यावर मत मांडवणारा अभिनेता म्हणून देखील तो ओळखला जातो. यासोबतच तो खरा संवेदनशील अभिनेता आहे.

भरत जाधव आणि क्रांती रेडकर यांच्या ‘जत्रा’ सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ हे गाणे तुफान गाजले मात्र तुम्हाला ऐकून नवल वाटेल हे गाणे जितेंद्र जोशींच्या लेखणीतून आले होते. जितूच्या कवितांबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या कविता हलक्या फुलक्या असण्यासोबतच त्यातून तो समाजातील भीषण सत्य आणि आजची परिस्थिती अतिशय उत्तम पद्धतीने मांडतो. लवकरच जितुचा ‘गोदावरी’ नावाचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेला आधीच ५२ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा