नैराश्यात गेलेल्या अर्जुनचे वजन झाले होते १५० किलो; तर मेहनतीच्या जोरावर अर्जुन आज दिसतोय ‘रफ ऍंड टफ’ लूकमध्ये


बॉलिवूडसारख्या ग्लॅमर जगात येऊन नशीब आजमण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. इंडस्ट्रीबाहेरील लोकांना नेहमीच असे वाटते की, इंडस्ट्रीमधील किंवा इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना या क्षेत्रात काम मिळणे खूपच सोपे जाते. मात्र या गोष्टीला अनेक कलाकार अपवाद आहेत. ज्यांना इंडस्ट्रीमध्ये राहूनही इथे टिकण्यासाठी किंवा काम मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि संघर्ष करावा लागला. आजच्या पिढीतील असाच एक अभिनेता म्हणजे अर्जुन कपूर. सिनेसृष्टीतील कपूर घराण्यातून आलेला अर्जुन कपूर खूप मेहनत घेऊन एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर आला आहे. तो नेहमीच त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत राहतो. आज अर्जुन त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या बद्दल काही महत्वाच्या गोष्टी.

मोना कपूर आणि बोनी कपूर या दाम्पत्याच्या पोटी २५ जून १९८५ साली अर्जुन कपूरचा जन्म झाला. त्याने मुंबईतूनच त्याचे शालेली शिक्षण पूर्ण केले. चित्रपटांमध्ये करियर करण्यासाठी अर्जुनने मधेच त्याचे शिक्षण थांबवले आणि तो सिनेमांकडे वळला. अर्जुनचा सिनेसृष्टीमधे प्रसिद्ध असणाऱ्या कपूर घराण्यात जरी जन्म झाला असला, तरी त्याला या क्षेत्रात स्वतःचे नाव तयार करण्यासाठी तुफान मेहनत घ्यावी लागली.

बॉलिवूडचा हँडसम आणि चार्मिंग अभिनेता म्हणून ओळखला जाणाऱ्या अर्जुनने २०१२ साली ‘इशकजादे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला अभिनेता होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीच्या काळात त्याने दिग्दर्शक निखिल आडवाणी यांच्याकडे ‘कल हो ना हो’ आणि ‘सलाम ए इश्क’ या सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर त्याने ‘वॉन्टेड’ आणि ‘नो एन्ट्री’ या चित्रपटांसाठी सहायक निर्माता म्हणून भूमिका बजावली.

जेव्हा बोनी कपूर आणि त्याच्या आईचा घटस्फोट झाला आणि बोनी यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केले, तो काळ अर्जुनसाठी खूपच कठीण होता. या काळात तो काही काळासाठी डिप्रेशनचा शिकारही झाला होता. त्यामुळे अतिशय फिट आणि हँडसम असणारा अर्जुन वयाच्या केवळ १६ व्या वर्षी वजन वाढीच्या आजाराला बळी पडला. त्याचे वजन वाढत जाऊन १५० किलो झाले आणि त्याला अस्थमा झाला.

जेव्हा अर्जुन ‘वॉन्टेड’ आणि ‘नो एंट्री’ चित्रपटांसाठी काम करत होता, तेव्हा सलमानने त्याला सांगितले की वजन कमी कर आणि अभिनयात ये. सलमानचे ऐकून अर्जुनने वजन कमी करण्यास सुरुवात केली. जिममध्ये स्वतः सलमान अर्जुनकडून सर्व व्यायाम करून घ्यायचा. अर्जुनने देखील अनेकदा सलमानमुळेच तो वजन कमी करू शकला आणि अभिनयात आला हे सांगितले आहे.

एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, ” माझ्या वजनवाढीमुळे मी माझा आत्मविश्वास गमावला होता. मी कधीच माझे वजन कमी करू इच्छित नव्हतो. शिवाय अस्थमा असल्याने मी १० सेकंदापेक्षा अधिक पळू पण शकत नव्हतो. मात्र सलमानने माझ्यावर विश्वास ठेवला. त्याने माझ्यावर खूप कष्ट घेतले, रोजचा व्यायाम, डाएट तो न चुकता करू घेत होता. म्हणूनच मी माझे वजन कमी करू शकलो.”

वजन कमी झाल्यानंतर अर्जुनने यशराजच्या ‘इशकजादे’ सिनेमातून परिणीती चोप्रासोबत पदार्पण केले. हा सिनेमा तुफान गाजला. सोबतच सिनेमाची गाणी, अर्जुनचा अभिनय याचे सर्वांनीच कौतुक केले. वजन कमी झाल्यामुळे अर्जुनाचा लूक एकदम रफ आणि टफ झाला. त्याच्या या लूकवर अनेक मुली घायाळ झाल्या. अर्जुनला त्याच्या पहिल्याच सिनेमासाठी काही पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले.

या सिनेमानंतर अर्जुनने ‘औरंगजेब’, ‘गुंडे’, ‘२ स्टेट्स’, ‘तेवर’, ‘फाइंडिंग फेनी’, ‘की ऍंड का’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २०१९ साली अर्जुन आशुतोष गोवारीकरच्या ‘पानिपत’ सिनेमात झळकला. या चित्रपटाने जरी सरासरी व्यवसाय केला असला, तरी अर्जुनच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप कौतुक झाले.

अर्जुन नेहमीच त्याचा अफेअर्समुळे देखील ओळखला जातो. अर्जुन सलमानची बहीण अर्पिता खानसोबत २ वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. या नात्याबद्दल त्याने स्वतः मुलाखतीमध्ये सांगितले होते. पहिल्या ब्रेकअपनंतर तो परिणीती चोप्रासोबत नात्यात होता. मात्र त्यांनी त्यांचे नाते कधीच मान्य केले नाही. अर्जुन आणि दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा देखील नात्यात असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर २०१६ पासून आजतागायत अर्जुन आणि मलायका अरोरा हे दोघे नात्यात आहे. या नात्यामुळे अर्जुन आणि मलायका अनेकदा ट्रोल देखील झाले. मात्र त्यांनी कधीच लोकांकडे लक्ष दिले नाही. सुरुवातील आपले नाते लपवणारे हे दोघे आता खुलेआम फिरताना, सुट्यांवर जाताना दिसतात. शिवाय एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो देखील शेअर करतात.

अर्जुनने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये श्रीदेवीबद्दल बोलताना सांगितले होते की, “माझ्या आईवडिलांच्या घटस्फोटानंतरही मी माझ्या वडिलांच्या संपर्कात आहे. मात्र माझा श्रीदेवी आणि त्यांच्या मुलींशी कोणताही संबंध नाही. माझे श्रीदेवींसोबत नाते कधीच सामान्य होऊ शकत नाही. त्या फक्त माझ्या वडिलांच्या पत्नी आहे, माझ्या आई नाही.”

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच तो ‘सरदार का ग्रँडसन’ सिनेमात दिसला होता आगामी काळात तो ‘एक व्हिलन रिटर्न’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’

-सुरेश रैनाला बॉलिवूड कलाकार आवडत नाहीत? आपल्या बायोपिकसाठी या दोन साऊथ कलाकारांची सुचवली त्याने नावे


Leave A Reply

Your email address will not be published.