Sunday, April 20, 2025
Home बॉलीवूड पंधराव्या वर्षी गायले बॉलीवूडमधील सर्वात हिट गाणे, घटस्फोटानंतर १० दिवसांतच ‘या’ गायिकेने सोडले होते प्राण

पंधराव्या वर्षी गायले बॉलीवूडमधील सर्वात हिट गाणे, घटस्फोटानंतर १० दिवसांतच ‘या’ गायिकेने सोडले होते प्राण

‘आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये तो’ हे गाणे आज ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. 1980 मध्ये जेव्हा दिग्दर्शक फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील हे गाणे हिट ठरले, तेव्हा संपूर्ण भारतभर याची चर्चा सुरू झाली. पाकिस्तानी पॉपस्टार नाझिया हसन यांनी हे गाणे गायले आहे, हे कळाल्यावर सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. फक्त नाझियाचा आवाजच नाही तर त्यांचे वय ऐकूनही लोक स्तब्ध झाले. नाझिया फक्त 15 वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांनी हे हिट गाणे दिले. आज 3 एप्रिल रोजी नाझियाच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने, आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

नाझिया एक पॉपसिंगर होत्या. फिरोज खाननेच नाझियाला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. त्यांनी लंडनमधील पार्टी दरम्यान नाझियाला पहिल्यांदाच ऐकले होते. त्यांना नाझियाचा आवाज इतका आवडला, की त्यांनी नाझियाला त्यांच्या ‘कुर्बानी’ चित्रपटात गाण्याची संधी दिली. यावेळी नाझिया फक्त 15 वर्षांच्या होत्या.

‘कुर्बानी’ चित्रपटामध्ये फिरोज खान, विनोद खन्ना, झीनत अमान, अमजद खान, अमरीश पुरी आणि शक्ती कपूर यांसारखे कलाकार होते. पण या चित्रपटाच्या यशाचे मोठे श्रेय पाकिस्तानी गायिका नाझियाला जाते. खरं तर, हे गाणे वर्षानुवर्षे डिस्को आणि त्यानंतर लोकांच्या पार्ट्यांमध्ये वाजू लागले. त्यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. इतकेच नाही, तर यानंतर नाझियाला अनेक चित्रपटही ऑफर केले गेले. परंतु त्यांनी सर्वांना नकार दिला. त्यांना चित्रपट करण्यात काही रस नव्हता.

नाझियाने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अवघ्या 10 व्या वर्षी केली. त्यांचा पहिला अल्बम ‘डिस्को दिवाने’ होता, जो सुपरहिट ठरला. नाझियाने त्यांच्या छोट्या गायन कारकीर्दीत ‘बूम-बूम’, ‘यंग तरंग’, ‘हॉटलाइन’, ‘कॅमेरा कॅमेरा’ नावाची अनेक गाणी गायली. याशिवाय नाझिया स्वत: गाणीही लिहीत असत.

नाझियाचा चित्रपट प्रवास उत्कृष्ट होता आणि त्यांनी अगदी लहान वयातच नाव कमावले होते. पण नाझियाचे वैयक्तिक आयुष्य काही खास नव्हते. 1995 मध्ये नाझियाने इश्तियाक बेगशी लग्न केले. इश्तियाक हा एक व्यावसायिक होता. लग्नाच्या दोन वर्षानंतर नाझियाने एका मुलाला जन्म दिला.

या दोघांमध्ये काहीच व्यवस्थित चालत नव्हते, म्हणून नाझियाने इश्तियाकला घटस्फोट दिला. आश्चर्य म्हणजे, नाझियाच्या मृत्यूच्या अवघ्या 10 दिवस आधीच त्यांचा घटस्फोट झाला होता. नाझियाला केवळ वयाच्या 30 व्या वर्षी कर्करोग झाला. त्यानंतर त्यांनी पाच वर्षे या आजाराशी झुंज दिली. शेवटी वयाच्या 35 व्या वर्षी, 13 ऑगस्ट 2000 रोजी लंडनमधील रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

हे देखील वाचा