Monday, June 17, 2024

जेव्हा डॉक्टरांनी दिला होता नर्गिस यांना जीवे मारण्याचा सल्ला; ‘अशी’ होती सुनील दत्त यांची प्रतिक्रिया

भारतीय सिनेसृष्टीच्या 100 वर्षाच्या इतिहास एक से बढकर एक कलाकारांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आज जरी ते कलाकार आपल्यात नसतील, तरी त्यांच्या अभिनयाने त्यांना आजही आदराने आठवले जाते. काही कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वासाठी देखील आठवले जाते. असेच एक अभिनेते म्हणजे सुनील दत्त. सुनील दत्त हे अभिनयासोबतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी ओळखले जातात. अशात मंगळवारी (दि. 23 मे)त्यांची पुण्यतिथी आहे. चला, तर यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्से…

सुनील दत्त यांचा जन्म 6 जून, 1929 ला झेलममध्ये (आताच्या पाकिस्तानमध्ये) झाला. त्यांचे खरे नाव बलराज दत्त होते. मात्र, अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव बदलून सुनील ठेवले. ते 5 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ केला. भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेस सुनील दत्त 17/18 वर्षांचे होते. त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम दंगली झाल्या होत्या. त्यात सुनील दत्त आणि त्यांच्या परिवाराच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, सुनील दत्त यांच्या शेजाऱ्यांनी सुनील दत्त आणि त्यांच्या परिवाराला एक महिन्यापर्यंत घरात ठेवले आणि त्यांचा जीव वाचवला. पुढे सर्व ठीक झाल्यानंतर दत्त परिवाराला त्यांनी सुखरूप हरियाणापर्यंत पोहोचवले. या घटनेचा सुनील दत्त यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. ते अनेक महिने या धक्क्यातून सावरले नव्हते. मात्र, जेव्हा ते यातून बाहेर आले. तेव्हा त्यांनी सांप्रदायिक सद्भावनेसाठी काम केले.

शिक्षणासाठी पुढे सुनील दत्त मुंबईमध्ये आले. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना शिक्षणासोबतच बस कंडक्टर म्हणून नोकरी करावी लागली. दुपारी 2 ते रात्री 11 अशा शिफ्टमध्ये ते काम करायचे. त्यावेळी त्यांना 100 रुपये महिना पगार मिळायचा. सुनील दत्त कॉलेजमध्ये असतांना नेहमी नाटकांमध्ये सहभाग घ्यायचे. एकदा त्यांचे नाटक बघायला रेडिओचे प्रोग्रामिंग हेड आले होते. त्यांनी सुनील दत्त यांचा आवाज ऐकला आणि ते खूप प्रभावित झाले. सुनील दत्त यांचा दमदार आवाज आणि अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट उच्चर असल्याने त्यांना सिलोन रेडिओमध्ये नोकरी मिळाली. या दरम्यान त्यांनी अनेक लहान मोठ्या कलाकारांची मुलाखत घेतली.

एका मुलाखतीदरम्यान सुनील दत्त यांनी सांगितले होते की, ते रेडिओमध्ये काम करत असतांना एकदा दिलीप कुमार यांची मुलाखत घ्यायला ‘शहीद’ सिनेमाच्या सेटवर गेले होते. तिथे त्यांना सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सहगल यांनी अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यावर सुनील दत्त यांनी लगेच सहगल यांना सांगितले की, जर तुम्ही मला अभिनयाची संधी देणार असाल, तर मी नक्कीच काम करेल. पण मी लहान लहान भूमिका करणार नाही. त्यानंतरच सुनील दत्त यांनी सिनेमांमध्ये पदार्पण केले.

सुनील दत्त यांनी ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘मदर इंडिया’ सिनेमातून. या सिनेमात त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची ‘बिरजू’ची भूमिका साकारली होती. या सिनेमातील सुनील दत्त यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून त्यांनी खूप वाहवा मिळवली. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक भूमिका साकारल्या. मात्र, त्यांनी दरोडे खोरांच्या भूमिका खूप केल्या.

सुनील दत्त यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनात देखील नशीब आजमावले. त्यांनी 1964 साली ‘यादे’ नावाचा सिनेमा तयार केला होता. या सिनेमाचे नाव सर्वात कमी कलाकार असलेला सिनेमा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. या सिनेमात नर्गिस यांनी पाहुण्या कलाकारांची भूमिका निभावली होती.

जेव्हा नर्गिस या कॅन्सरसोबत लढत होत्या. त्यावेळी डॉक्टरांनी सुनील दत्त यांना नर्गिस यांना लावलेले लाईफ सपोर्टिंग सिस्टिम काढायला सांगितले आणि त्यांना कायमचं झोपू द्यायला सांगितले होते. मात्र, त्यावर सुनील दत्त खूप चिडले आणि त्यांनी असे करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

त्यानंतर काही काळ नर्गिस राहिल्या आणि 3 मे, 1981 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसानंतर मुलगा आणि अभिनेता संजय दत्तचा पहिला चित्रपट ‘हिरो’ प्रदर्शित झाला होता. ज्याने बजेटच्या दुप्पट नव्हे, तर त्यापेक्षाही अधिक कमाई केली होती. हा चित्रपट स्वत: सुनील दत्त यांनी दिग्दर्शित केला होता.

सुनील दत्त यांनी अनेक सुपरहिट सिनेमात काम केले. यामध्ये ‘मदर इंडिया’ व्यतिरिक्त ‘खानदान’, ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘मेरा साया’, ‘मिलन’, ‘हमराज’, ‘भाई भाई’, ‘हीरा’, ‘नागिन’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.(sunil dutt know intresting facts about)

हे देखील वाचा