महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी वनिता खरातने तिच्या प्रतिभेवर मनोरंजन क्षेत्रात नाव कमावत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. हीच वनिता सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. वनिताने नुकतेच एक बोल्ड फोटोशुट केले असून त्यातील एक फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे.
वनिताने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक न्यूड फोटो शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. २०१९ मध्ये आलेल्या कबीर सिंग या सिनेमात मोलकरीण पुष्पाची छोटीशी मात्र लक्षवेधी भूमिका साकारणारी वनिता त्या सिनेमानंतर सगळ्यांच्याच लक्षात राहिली. ह्याच वनिताने तिचा एक न्यूड फोटो तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
वनिताने हे फोटोशूट रावण फ्युचर प्रॉडक्शन्ससाठी केले आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे, ऍडगुरू आणि अभिनेता भरत दाभोळकर, छायाचित्रकार तेजस नेरूरकर यांनी मिळून ह्या फोटोशूटची कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
या पोस्ट मधून वनिताने आपण आपल्याला जसे आहोत तसे आनंदाने स्वीकारायला पाहिजे. आपल्या शरीराचा, आपल्या वजनाचा कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता स्वछंदी जीवन जगा असा लाख मोलाचा संदेश तिने दिला आहे.
वनिताने या न्यूड फोटोत केवळ एका निळ्या रंगाच्या पतंगाचा आडोसा घेत पोज दिली आहे. वनिताने हा फोटो शेयर करताना एक संदेशही लिहला आहे. ती लिहिते, “मला अभिमान आहे माझ्या गुणवत्तेचा. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे. कारण मी मी आहे…!!!,” वनिताने पुढे ”चला, आपण सगळेच या बॉडी पॉझिटिव्हिटी चळवळीत सहभागी होऊ यात’ असं आवाहनही केले आहे.
वनिताच्या बॉडी पॉझिटिव्हीटीच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत होताना दिसत आहे. वनिताच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय वनिताच्या फॅन्सकडूनही तिला तिच्या विचारासाठी शुभेच्छा मिळत आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या इन्स्टा अकाउंटवर वनिताचा हा फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सई लिहिते, ‘यंदाचं हे वर्ष तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारण्याचं वर्ष आहे. स्वतःला अगदी मनापासून आणि निडरतेने स्वीकारा!’