Saturday, April 20, 2024

राकेश रोशनपासून ते सोनाली बेंद्रेपर्यंत कँसरचा सामना करणारे सेलिब्रिटी; ‘या’ कलाकारांना गमवावा लागला जीव

‘कँसर’ या रोगाचं नाव जरी ऐकलं, तरी काळजाचा थरकाप उठतो. मग विचार करा जर हा रोग कोणाला झाला, तर त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल. बॉलिवूडमध्येही असे अनेक दिग्गज कलाकार आहेत आणि होते ज्यांना कँसर हा रोग झाला होता. त्यातून काही बरे झाले, तर काही जणांना आपला प्राण गमवावा लागला. या रोगापासून सुपरस्टार ऋतिक रोशनचे वडील म्हणजेच राकेश रोशन यांची सुटका झाली. त्यांनी आपली कहाणी एका मुलाखतीत सांगितली.

राकेश रोशन यांनी सांगितले की, २०१९मध्ये जेव्हा त्यांना जीभेच्या खाली एक फोड आला होता, तेव्हा त्यांना जाणवले होते की त्यांना कँसर झाला आहे. ज्यावेळी ते तपासणी करायला डॉक्टरांकडे गेले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना कँसर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु ‘देव तारी त्याला कोण मारी!’ असे म्हणतात ना, तसेच रोशन यांच्यासोबत झाले. त्यांनी हिंमत सोडली नाही आणि यावर उपचार केला. त्यामुळे ते बरे झाले. तरीही कँसरमुळे त्यांचे वजन तब्बल १२ किलो कमी झाले होते.

जानेवारी २०१९ मध्ये ७१ वर्षीय राकेश रोशन यांना स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (Squamous Cell Carcinoma) हा कँसर झाल्याचे वृत्त आले होते. हा घशाच्या कँसर होता. कँसर पहिल्या स्टेजमध्ये असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवता आले. शस्त्रक्रिया करून तो कँसर काढून टाकण्यात आला. त्यानंतर आता राकेश रोशन कँसरमुक्त जीवन जगत आहेत.

कँसरच्या बाबतीत राकेश रोशन भाग्यवान ठरले आणि त्यांनी कँसरवर विजय मिळवला. परंतु असे अनेक दिग्गज कलाकार आहेत, ज्यांना या भयानक कँसर रोगामुळे आपला जीव गमवावा लागला. आज या लेखात आम्ही अशाच काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी कँसरविरुद्ध खूप लढा दिला. काही जण याविरुद्ध विजयी झाले, तर काहींना अपयश स्वीकारावे लागले.

१. ऋषी कपूर
आपल्या अभिनयाने संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या ऋषी कपूर यांना कँसर झाल्याची पहिली बातमी ३ ऑक्टोबर २०१८ साली आली होती. त्यांचा भाऊ रणधीर कपूर यांनी सांगितले होते की, ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये उपचार घेण्यासाठी अमेरिकेला गेले. ते ल्यूकेमियाशी लढत होते, जो एक रक्ताचा कँसर होता. अमेरिकेत त्यांच्यावर मॅरो उपचार घेतला जात होता. न्यूयॉर्कमधून ११ महिन्यांनंतर उपचार घेऊन परतल्यावर त्यांनी ट्वीट करत ‘घरी परतलो आहे’, असे म्हटले. परंतु एप्रिल २०२०मध्ये त्यांची तब्येत खूपच बिघडली आणि त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेवटी ३० एप्रिल रोजी ६७ व्या वयात ऋषी कपूर यांनी आपल्या चाहत्यांना धक्का देत जगाचा निरोप घेतला.

त्यांनी ‘बॉबी’, ‘अग्नीपथ’, ‘प्रेम रोग’, ‘दीवाना’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले.

२. विनोद खन्ना
आपल्या काळात चाहत्यांच्या मनावर छाप सोडणारे अनुभवी अभिनेता विनोद खन्ना यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दीर्घ आजाराने सन २०१७ मध्ये निधन झाले होते. त्यांनाही ऋषी कपूर यांच्याप्रमाणेच रक्ताचा कँसर होता. आजारामुळे त्यांची तब्येत खूप बिघडली झाली होती आणि निधनाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते खूपच बारीक दिसत होते. विनोद खन्ना यांनी जवळपास १४४ चित्रपटांमध्ये काम केले होते.

त्यामध्ये ‘मेरे अपने’, ‘दयावान’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘चांदनी’, ‘कुर्बानी’ या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश होता.

३. इरफान खान
आपल्या डोळ्यांनी समोरच्याला आपल्या प्रेमात पाडणारा अभिनेता म्हणजे इरफान खान. इरफानने मार्च २०१८ मध्ये खुलासा केला होता की, त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर होता. त्यांनी ट्वीट केले होते की, “कधी-कधी तुम्हाला एकाच झटक्यात जाग येते. मी वाईट आजाराने त्रस्त आहे. मी आयुष्यात कधीही तडजोड केलेली नाही. मी नेहमीच माझ्या निवडीसाठी संघर्ष केला आणि भविष्यातही तेच करेल. माझे कुटुंब आणि मित्र माझ्याबरोबर आहेत. आम्ही एक चांगला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

यानंतर लंडनमध्ये इरफानवर दीर्घ उपचार घेण्यात आला होता. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर इरफानने या दोन वर्षांमध्ये ‘इंग्रजी मीडियम’ सिनेमाची शूटिंगही केली, जो मागील वर्षी रिलीझ झाला होता. परंतु यानंतर इरफानच्या तब्येत खालावली आणि २९ एप्रिल २०२० रोजी त्याने जगाचा निरोप घेतला.

त्याने ‘हिंदी मीडियम’, ‘कसूर’, ‘पिकू’, ‘द लंचबॉक्स’, ‘पान सिंग तोमर’ या हिट चित्रपटांमध्ये काम केले.

४. सोनाली बेंद्रे
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला २०१८ मध्ये हायग्रेड मेटास्टेटिक कँसरबद्दल समजले होते. वयाच्या ४४ व्या वर्षी सोनाली कँसरबद्दल समजल्यानंतर ती उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली होती. तब्बल दीड वर्षे तिने उपचार घेतला होता.

सोनालीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जेव्हा ती उपचारासाठी अमेरिकेला गेली होती, तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले होते की, जगण्याची केवळ ३० टक्के शक्यता होती. कारण कँसर चौथ्या स्टेजमध्ये गेला होता. परंतु सोनालीने तरीही हिंमत सोडली नाही आणि शेवटी डिसेंबर २०१९ मध्ये कँसरवर मात करत ती भारतात परतली होती.

सोनालीने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. त्यामध्ये ‘हम साथ साथ है’, ‘दिलजले’, ‘सरफरोश’ यांचा समावेश आहे.

५. ताहिरा कश्यप
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिला सन २०१८ मध्ये कँसरचे निदान झाले होते. तिला झिरो स्टेजचा ‘स्तनाचा कर्करोग’ होता. तिने अनेक कीमोथेरेपी केल्यानंतर या कँसरमधून सुटका केली होती.

ताहिरा ही एक लेखिका, प्रोफेसर आणि थिएटर डायरेक्टर आहे. तिने सन २००८ मध्ये आयुषमानसोबत लग्न केले होते. याव्यतिरिक्त तिने टॉफी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

६. रितू नंदा
दिग्गज अभिनेते राजकपूर यांची मुलगी आणि ऋषी- रणधीर कपूर यांची बहीण रितू नंदा यांनी २० जानेवारी २०२० रोजी कँसरमुळे जगाचा निरोप घेतला होता. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांचे लग्न उद्योजक राजन नंदा यांच्याशी झाले होते. रितू नंदा या महानायक अमिताभ बच्चनच्या नातलग होत्या. रितू यांचा मुलगा निखिलचे लग्न अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनसोबत झाले होते. १९४८ मध्ये जन्मलेल्या रितू जीवन विमा व्यवसायात कार्यरत होत्या.

हेही वाचा-

तुझ्या कामाला सलाम! बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने केली २.५ लाखांपेक्षा अधिक कँसर पीडित मुलांची मदत

हे देखील वाचा