कोरोनामुळे आणि अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या निधनामुळे २०२० हे वर्ष नक्कीच न विसरता येणारे आहे. इरफान खान पासून ते सरोज खान, ऋषी कपूरपर्यंत अनेक कलाकारांनी यावर्षी आपली साथ सोडली. आज २०२० च्या शेवटाकडे आपण वाटचाल करत असलो तरी या वाईट बातम्यां काही थांबायचे नाव घेत नाही. नुकतेच लोकप्रिय टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री मेघना रॉय यांचे निधन झाले. मागच्या एक वर्षांपासून मेघना ह्या आजारी होत्या.
मेघना रॉय ह्या जास्तकरून गुजराती चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये सक्रिय होत्या. मेघना यांनी हिंदी मध्ये ‘जय जय संतोषी माँ’ या चित्रपटातून खूप नाव आणि कौतुक मिळवले. मेघना यांनी हिंदी चित्रपटांसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. ‘एक महल हो सपनों का, तीन बहूरानियां’ या काही लोकप्रिय मालिकांमध्ये मेघना यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती.
मेघना यांना अभिनयासोबतच, खाण्याचे देखील प्रचंड वेड होते. नेहमी कुठेही बाहेर गेल्यावर त्या आधी तिथल्या वेगवेगळ्या डिश खाऊन बघायच्या. मेघना या खूप हसमुख आणि निर्मळ मनाच्या होत्या. ह्या महिन्यातच ८ तारखेला त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.
मेघना रॉय ह्या मागील काही महिन्यांपासून बेडरेस्ट होत्या. त्यांच्या शरीरातील काही अंगानी काम करणे बंद केले होते. बुधवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला, मात्र वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. १२ व्या गुजराती स्क्रीन अवॉर्ड्स मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.










