बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींचे एकापेक्षा अधिक विवाह झाले आहेत. त्यातही काही अभिनेत्रींचे विवाह हे अगदी वर्षभर टिकले आहेत. मात्र, आज आम्ही बोंबाबोंबच्या प्रेक्षकांना बॉलिवूडमधील अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहेत, ज्यांचे आजवर तीन विवाह झाले. मात्र, तरीही त्या आज एकट्याच आहेत.
अभिनेत्री नीलिमा अझीम याच त्या अभिनेत्री होत. दिनांक २ डिसेंबर १९५८ रोजी त्यांचा जन्म झाला. “नीलिमा या बॉलीवूडमधील हँडसम हंक शाहिद कपूर याच्या आई आहेत.”
नीलिमा यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. सलीम लंगड़े पे मत रो, सड़क, सूर्यवंशम, इश्क विश्क, ब्लैकमेल, यारी मेरे यार की, कलामंदिर आदी त्यांचे विशेष गाजलेले सिनेमे आहेत. नीलिमा स्वतः एका प्रशिक्षित कथक डान्सर आहेत. त्यांनी बिरजू महाराजांकडून कथ्थकचे धडे गिरवले आहेत.
खरेतर नीलिमा यांचे खासगी आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेले होते. नीलिमा यांचे तीन विवाह झाले. मात्र, तरीही आज त्या एकट्या आहेत.
नीलिमा यांनी १९७९ रोजी जेष्ठ अभिनेते पंकज कपूर यांच्याशी लग्न केले, पण १९८४ साली त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनेता शाहिद कपूर हा नीलिमा आणि पंकज यांचा मुलगा आहे. या घटस्फोटाबद्दल नीलिमा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “पंकज कपूर यांच्यासोबत घटस्फोट घ्यायचा माझा कोणताच विचार नव्हता. पंकज कपूर यांनी स्वतः हा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडे मला घटस्फोट देण्यासाठी मजबूत कारण होते. तो काळ आमच्यासाठी खूप कठीण होता”. पंकज कपूर यांनी नीलिमा पासून वेगळे झाल्यावर अभिनेत्री सुप्रिया पथक यांच्यासोबत लग्न केले.
सन १९९० नीलिमा यांनी अभिनेते आणि मिमिक्री कलाकार राजेश खट्टर यांच्यासोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. मात्र, दुर्दैवाने इथेही त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही. नीलिमा आणि राजेश खट्टर यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता ईशान खट्टर. ईशानच्या जन्मानंतर म्हणजे २००१ मध्ये लगेच या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
सन २००४ मध्ये नीलिमा यांनी रजा अली खान यांच्यासोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली, परंतु इथेही त्यांच्या संसाराचा गाडा जास्त चालला नाही. अवघ्या पाच वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला.
सध्या नीलिमा या त्यांचा मुलगा अभिनेता शाहिद सोबत राहतात. त्या नेहमी सांगतात, “या सर्व कठीण काळातून निघून मला जीवन व्यतीत करण्यासाठी एक उद्दिष्ट पाहिजे होते. ते उद्धिष्ट होते शाहिद. शाहिदमुळेच मला जगण्याची प्रेरणा मिळत गेली आणि तोच माझ्या जगण्याचे एकमेव उद्दिष्ट बनला.”