Saturday, July 6, 2024

नवव्या वर्षी पहिला सिनेमा करुन ३००हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या अरुणा इराणींना प्रेरणादायी सिनेप्रवास

बॉलिवूडमध्ये अश्या बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी नायिका म्हणून नाव कमावले. याशिवाय अश्याही अनेक अभिनेत्री आहेत, ज्या खलनायिका म्हणून गाजल्या. मात्र चित्रपटसृष्टीत असे क्वचितच काही कलाकार असतील, ज्यांनी नायिका व खलनायिका असे दोन्ही प्रकारच्या भुमिका साकारून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. यातीलच एक नाव म्हणजे, सुप्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री अरुणा इराणी यांचे.

अभिनेत्री अरुणा इराणी यांचा जन्म ३ मे १९४६ रोजी झाला होता. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत खलनायिका, नायिका आणि अनेक वेगवेगळे पात्र साकारून उत्तम कामगिरी बजावली आहे. त्या त्यांच्या चित्रपटातील खास आणि निराळ्या अभिनयासाठी ओळखल्या जातात.

अरुणा इराणी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९६१ साली ‘गंगा जमुना’ या चित्रपटाद्वारे, बालकलाकार म्हणून केली होती. त्यावेळी त्या अवघ्या ९ वर्षांच्या होत्या. ‘गंगा जमुना’चे नायक दिलीप कुमार अरुणा यांच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले होते आणि त्यांनी लहानग्या अरुणाचे खूप कौतुकही केले होते. त्यानंतर अरुणा यांनी आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकली.

अरुणा मुख्य अभिनेत्री म्हणून, १९७२ साली आलेल्या, ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटात पहिल्यांदा दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट हिट ठरला. नंतर अरुणा इराणी यांनी राज कपूरच्या १९७३ मध्ये आलेल्या ‘बॉबी’ चित्रपटात आपल्या व्यक्तिरेखेने जबरदस्त छाप सोडली. यानंतर, त्या एक मजबूत व्यक्तिरेखा असलेली अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या.

विशेष म्हणजे अरुणा इराणीच्या वडिलांकडे थिएटर कंपनी होती. अशा परिस्थितीत लहानपणापासूनच त्यांचा कलेकडे कल आणि समर्पण होते. कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी ‘जहांआरा’, ‘फर्ज’ आणि ‘उपकार’ यासह अनेक चित्रपटांमध्ये किरकोळ भूमिका केल्या. मग विनोदी किंग महमूदशी त्यांची जोडी बनली, जिला ‘औलाद’, ‘हमजोली’, ‘नया जमाना’ सारख्या चित्रपटांमध्ये खूप पसंत केले गेले.

अरुणा इराणी यांनी त्यांच्या कारकीर्दीत ‘गुनाहों का देवता’, ‘बड़ी दीदी’, ‘आन मिलो सजना’, ‘पाप और पुण्य’, ‘नागिन’, ‘चरस’, ‘कुर्बानी’, ‘बेटी नम्बर वन’ आणि ‘ये दिल आशिकाना’ यासारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांमध्ये त्यांना मुख्य अभिनेत्रीपेक्षा, सह-कलाकार म्हणून जास्त मान्यता मिळाली.

अरुणा इराणी यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या चमकदार कामगिरीने प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे. सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांनी फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

मोठ्या पडद्यानंतर अरुणा इराणी यांनी छोट्या पडदाही गाजवला आहे. ‘देश में निकला होगा चांद’, ‘कहानी घर घर की’, ‘मायका’, ‘झांसी की रानी’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘दिल तो हैप्पी है जी’ आणि ‘ये उन दिनों की बात’ यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्या दिसल्या आहेत.

हे देखील वाचा