Sunday, July 14, 2024

प्रिया मराठे प्रेमासाठी षडयंत्र रचणार तू भेटशी नव्याने’ मालिकेत साकारणार खलनायिका

सध्या विविध चॅनेल्सवर विविध धाटणीचे विषय पाहायला मिळतात. यातील नायक-नायिका तर चाहत्यांच्या आवडीच्या असतातच पण त्याचबरोबर प्रेक्षकांना खलनायकांच्या भूमिकाही आवडतात. अभिनेत्री प्रिया मराठेने (Priya Marathe) अनेक गाजलेल्या मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. प्रियाने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका तसेच खलनायकी साकारल्या आहेत. लवकरच प्रिया मराठे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.००वा. आपल्या भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत.

या मालिकेत प्रिया मराठे खलनायिका साकारणार आहे. ‘रागिणी अग्निहोत्री’ असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. प्राध्यापिका असणारी रागिणी अभिमन्यू राजेशिर्केच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी रागिणी काय आणि कशाप्रकारे षडयंत्र रचते ? ते मालिकेत पहाता येणार आहे. रागिणीच्या येण्याने अभिमन्यू आणि गौरीच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार? गोड बोलून रागिणी आपला डाव कसा साधणार? हे दाखवताना प्रेमाच्या कसोटीवर कोण कसं खरं उतरणार? याची रंजक कथा मालिकेत पहायला मिळणार आहे.

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम करायला, त्यातही निगेटिव्ह रोल करायला प्रिया मराठे खूपच उत्सुक असून आपल्या या भूमिकेबद्दल प्रिया सांगते कि, जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल. भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्त्वाची आहे याकडे माझं लक्ष असते. मालिकेत मी साकारत असलेली भूमिका खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली.

“नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची..! कारण, जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!” ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी कशी असेल? या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार? हे सर्व अनुभवण्यासाठी येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.०० वा. प्रसारित होणारी ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका नक्की पहा.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनताच पवन कल्याण यांची मोठी घोषणा, चित्रपटातून निवृत्ती घेणार का?
‘कल्की 2898 एडी’च्या सिक्वेलमध्ये हे तिन्ही स्टार्स एकमेकांशी भिडणार, नाग अश्विनने दिला मोठा इशारा

हे देखील वाचा