आज आपल्या सर्वांच्या लाडक्या जग्गू दादाचा म्हणजेच जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस. आपल्या अभिनयाने, बोलक्या आणि प्रभावी डोळ्यांनी बोलणाऱ्या या जग्गू दादाने केवळ मेहनतीच्या जोरावर या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये अढळ स्थान निर्माण केले. कोणत्याही पाठिंब्याशिवाय त्यांनी शून्यातून सुरुवात करत विश्व निर्माण केले. एक साधा चाळीत राहणार मुलगा नशिबाने बॉलीवूडमध्ये येऊन पुढे कष्टाने ऐंशी, नव्वदच्या दशकामधील सुपरहीट अभिनेत्यांच्या यादीमध्ये गणला गेला.
१ फेब्रुवारी १९५७ मध्ये एका गुजराती परिवारात जॅकी यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईमधील वाळकेश्वर परिसरातील एका चाळीत गेले. जॅकी यांचे संपूर्ण आणि खरे नाव म्हणजे जयकिशन कटुभाई श्रॉफ. जॅकी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले. याच गरिबीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण देखील सोडावे लागले.
जॅकी हे अगदीच कर्मधर्म सहयोगाने या क्षेत्रात आले. जॅकी यांचा संपूर्ण प्रवास त्यांचे सिनेमे सर्वानाच ठाऊक आहे. मात्र आज लेखातून आपण जॅकी चित्रपटांमध्ये कसे आले आणि या क्षेत्रात येण्याआधी त्यांनी काय काय केले ते जाणून घेणार आहोत.
खूप कमी चाहत्यांना हे माहित असेल की, जॅकी श्रॉफ हे उत्तम स्वयंपाक बनवतात. आजही बॉलीवूडमध्ये त्यांच्या हातचे वांग्याचे भरीत अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का, इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी जॅकी यांनी त्यांचे पाककौशल्य जाणले आणि ते हॉटेल ताजमध्ये शेफ या जॉबसाठी मुलाखत द्यायला देखील पोहचले होते. पण त्यांना अपुऱ्या शिक्षणामुळे हा जॉब नाकारला गेला. घरखर्च भागवण्यासाठी जग्गू दादा यांना काम करणे खूपच आवश्यक होते. त्यामुळे ते सतत वेगवगेळ्या ठिकाणी नोकरी शोधत होते.
ताज मधली नोकरी नाकारल्यानंतर त्यांनी एअर इंडियामध्ये फ्लाईट अटेंडंटच्या नोकरीसाठी देखील अर्ज केला होता. पण तिथेही त्यांना नोकरी मिळाली नाही.
काम मिळवण्यासाठी जग्गू दादा मुंबईमध्ये खूप फिरायचे. अनेक ठिकाणी त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले होते. एकदा एका बस स्टॉप उभे होते, अचननक त्यांच्या जवळ एक माणूस आला आणि त्याने त्यांना विचारले मॉडेलिंग करणार का? यावर जग्गू दादांनी त्या माणसाला विचारले पैसे मिळणार का? समोरून हो उत्तर आले आणि जग्गू दादा मॉडेलिंग करू लागले.
एकदा त्यांच्यावर दिग्दर्शक सुभाष घई यांची नजर पडली आणि त्यांनी जॅकी यांना ‘हिरो’ सिनेमाची ऑफर दिली. जॅकी यांनी या सिनेमाआधी देव आनंद यांच्या चित्रपटामध्ये अगदीच छोटी भूमिका साकारली होती. १९८३ साली आलेल्या ‘हिरो’ सिनेमाने जग्गू दादांना एक धमाकेदार सुरुवात करून दिली, आणि त्यांच्या अभिनयाची गाडी सुसाट पळू लागली. याच सिनेमानंतर सुभाष घई यांनी त्यांना जॅकी नाव दिले, आणि तेच नाव आजही त्यांची ओळख बनून आहे.
जॅकी यांनी ‘कर्मा’, ‘जवाब हम देंगे’, ‘काश’, ‘राम लखन’, ‘परिंदा’, ‘मैं तेरा दुश्मन’, ‘त्रिदेव’, ‘वर्दी’, ‘दूध का कर्ज’, ‘सौदागर’, ‘किंग अंकल’, ‘खलनायक’, ‘गर्दिश’, ‘त्रिमूर्ति’, ‘रंगीला’, ‘यादे’, ‘देवदास’ यांसारख्या सुमारे २०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
आज एवढे यश मिळूनही जॅकी यांनी कधीच त्यांचे मूळ सोडले नाही. त्यांनी नेहमी गरीब आणि गरजू लोकांसाठी काम केले किंबहुना आजही ते काम करत आहे. मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये गरीब लोकांसाठी ते एक खातं चालवतात, ज्यातून गरजू लोकांचा उपचार केला जातो. शिवाय पाली हिल्सच्या आसपासच्या सर्व गरीब लोकांकडे जॅकी यांचा पर्सनल नंबर आहे. ही लोक जेव्हा कधी गरज आणि मदत या लोकांना पाहिजे असते, तेव्हा ते जॅकी यांना संपर्क साधतात.
जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक नावाजलेल्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना ‘परिंदा’, ‘१९४२ ‘ए लव स्टोरी’ आदी चित्रपटासाठी फिल्मफेयरने गौरवित केले आहे.










