Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड Brahmastra | मंदिरात रणबीर कपूरला बूटात पाहून भडकले लोक, अयान मुखर्जीने मौन तोडत सांगितले सत्य

Brahmastra | मंदिरात रणबीर कपूरला बूटात पाहून भडकले लोक, अयान मुखर्जीने मौन तोडत सांगितले सत्य

‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर रिलीझ झाल्यापासून, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. विशेषत: रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. खरं तर गेल्या चार वर्षांपासून त्याचा एकही चित्रपट चित्रपटगृहात आला नव्हता. अशा स्थितीत चाहते या चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र हा चित्रपट एका सीनवरून वादात सापडला आहे.

चित्रपटाच्या एका सीनमध्ये रणबीर कपूर मंदिरात बूट घातलेला दिसत आहे. यावरून गोंधळ उडाला आहे. नाराजी व्यक्त करत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही लोक करत आहेत. (brahmastra ayan mukerji clarifies why ranbir kapoor wore shoes in the temple scene)

दिग्दर्शकाने लांबलचक नोट लिहून दिले स्पष्टीकरण
या संपूर्ण वादावर ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीचे स्पष्टीकरण समोर आले आहे. या सीनबद्दल तो मनमोकळेपणाने बोलला आणि सांगितले की ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर 4K मध्येही रिलीझ होणार आहे.

अयान मुखर्जी म्हणाला, “आपल्या समुदायातील काही लोक आहेत, जे ट्रेलरमधील एका सीनमुळे चिडलेले दिसले. ज्यामध्ये रणबीरचे पात्र बूट घालून घंटा वाजवत आहे. या चित्रपटाचा निर्माता आणि एक भक्त म्हणून मी नम्रपणे सांगू इच्छितो की, असे का झाले? आमच्या चित्रपटात रणबीर मंदिरात प्रवेश करत नसून, दुर्गा पूजा पंडालमध्ये प्रवेश करत आहे. माझे स्वतःचे कुटुंब ७५ वर्षांपासून अशाच दुर्गापूजेचे आयोजन करत आहे, ज्याचा मी लहानपणापासूनच एक भाग आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे, आम्ही देव जिथे असते तिथेच बूट काढतो आणि पंडालमध्ये प्रवेश करतो तेव्हा नाही.”

अयान पुढे म्हणाला, “यामुळे नाराज झालेल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचणे वैयक्तिकरित्या माझ्यासाठी महत्वाचे आहे. कारण ब्रह्मास्त्र भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा सन्मान आणि उत्सव साजरा करतो. म्हणूनच मी हा चित्रपट बनवला आहे, त्यामुळे ब्रह्मास्त्र पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयापर्यंत ही भावना पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.”

‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट (Alia Bhatt), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna), मौनी रॉय (Mouni Roy) हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होत आहे. विशेष म्हणजे रणबीर आणि आलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा