बॉलिवूड इंडस्ट्रीचा ‘किंग’ शाहरुख खान (Shahrukh Khan) चार वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि शाहरुख खानलाही टीकेचा सामना करावा लागला. पण आता शाहरुख खान ग्रँड कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये तो काम करताना दिसणार आहे. इतकेच नाही तर शाहरुख खान अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिका साकारणार आहे. त्यामुळे २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्याच चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. कोणते आहेत ते शाहरुख खानचे आगामी चित्रपट चला जाणून घेऊ.
रॉकेट्री द नंबी इफेक्ट- आर माधवन दिग्दर्शित रॉकेट्री द नंबी इफेक्ट १ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट इस्रोचे माजी वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्यांच्या भूमिकेत आहे. याशिवाय सिमरन, रजित कपूर, रवी राघवेंद्र, मीशा घोषाल, गुलशन ग्रोवर, कार्तिक कुमार आणि दिनेश प्रभाकर यांचाही चित्रपटात समावेश आहे.
ब्रह्मास्त्र – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला असून, या चित्रपटात शाहरुख खान देखील दिसणार असल्याचा दावा केला जात आहे. इतकेच नाही तर गुगलवर ‘ब्रह्मास्त्र’च्या कलाकारांच्या यादीतही शाहरुख खानचे नाव लिहिले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, या यादीत शाहरुख खान एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
पठाण- ‘पठाण’ हा एक एक्शन-स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, ज्याद्वारे अभिनेता थिएटरमध्ये धमाकेदार एंट्री करणार आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत.
जवान – शाहरुख खानचा एक्शन थ्रिलर चित्रपट ‘जवान’ पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, त्याचा टीझर समोर आला आहे. या चित्रपटातील अभिनेत्याचा लूक खूपच विचित्र असणार आहे, जो चाहत्यांनी टीझरमध्ये पाहिला आहे. तमिळ दिग्दर्शक एटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी सोबतच कन्नड, तमिळ, तेलुगु तसेच मल्याळम भाषांमध्ये 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
डंकी- शाहरुख खानच्या चित्रपटाने 2023 वर्ष संपणार आहे. ‘डंकी’ हा चित्रपट पुढील वर्षी 22 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्ये तापसी पन्नू शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात विकी कौशलचीही भूमिका आहे, जो शाहरुखच्या खास मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे.
टायगर ३ – मनीष शर्मा दिग्दर्शित सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर३’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सलमान आणि कॅटरिनाची जबरदस्त अॅक्शन दिसणार आहे. तसेच या चित्रपटात शाहरुख खान देखील दिसणार आहे. या चित्रपटात किंग खानचा कॅमिओ आहे. हा चित्रपट 2023 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.