बॉलिवूडच्या मोठ मोठ्या कलाकारांना आपण नेहमीच आनंदात आणि मजेत पाहत असतो. म्हणजे टीव्ही, सिनेमा या सारख्या माध्यमांमधून तरी ते आपल्याला आनंदातच दिसतात. पण आपल्याला दूर दूरपर्यंत याची माहिती नसते की ते किती मोठ्या आजाराशी झुंज देत असतात आणि हे सगळं दुखणं सहन करून ते त्यांचं काम करून आपलं मनोरंजन करत असतात. कोण कोण आहेत असे सेलिब्रिटी पाहुयात.
श्रुती सेठ
‘राजनीती’सह अनेक चित्रपटात काम करणारी श्रुती सेठ यापूर्वी एका गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्यावर आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु तिला कोणत्या आजाराने ग्रासले आहे हे अद्यापही उघड झालेलं नाही. श्रुतीची प्रकृती आता ठीक आहे पण तिने गंभीर आजाराशी झुंज देण्याचा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आणि आयुष्याला हलक्यात घेऊ नका असं सांगितलं.
मुमताज
मुमताज या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर सारखा गंभीर आजार आहे. साल २००० मध्ये तिला या आजाराचं निदान झालं. तिने त्यावर उपचार केले. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, “मला कर्करोगाची भीती नाही. मी माझ्या मृत्यूपर्यंत या रोगाचा लढा देईन.” मुमताजशिवाय सोनाली बेंद्रे, लिसा रे, मनीषा कोईराला या अभिनेत्रींनीही कर्करोगाशी झुंज दिली आहे आणि त्या यातून पुन्हा सावरल्या आहेत.
सलमान खान
सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूरोलॉजीया नावाच्या आजाराने ग्रासले आहे, ज्यावर त्याने बराच काळ उपचार घेतला. तो अजूनही बर्याचदा त्याच्या उपचारासाठी अमेरिकेत जातो. हा एक न्यूरोपैथिक डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये मानवी चेहऱ्याच्या (डोके, जबडा इ.) बर्याच भागात खूप वेदना होत असतात. सलमान गेल्या ९-१० वर्षांपासून या आजाराने त्रस्त आहे.
अमिताभ बच्चन
७७ वर्षांचे अमिताभ बच्चन हे ३७ वर्षांपासून यकृताच्या गंभीर समस्येशी झगडत आहेत. ३७ वर्षांपूर्वी पहिल्यांदा ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांचं यकृत खूपच खराब झाले आहे. ज्याचा परिणाम आजही दिसत आहेत ज्यामुळे बहुतेकदा ते पोटदुखीची तक्रार करतात. त्यांना मध्यंतरीच्या काळात हेपॅटायटीस-बी झाला होता, ज्यामुळे त्यांचं यकृत ७५% खराब झालंय. या व्यतिरिक्त त्यांना दमा, लिव्हर सिरॉसिस, टीबी, लहान आतड्यांमधील डायव्हर्टिकुलायटिससारखे आजार देखील आहेत.
सोनम कपूर
सोनम कपूर यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की तिला मधुमेहासारख्या गंभीर आजाराने ग्रासलं होतं. वास्तविक सोनमला लहानपणापासूनच मधुमेह होता. दररोज इन्सुलिन डोस व्यतिरिक्त आहारात खास पथ्य पाळल्यानंतरच सोनमने या आजारावर मात केली आहे. या आजारामुळे तिचं वजन ८५ किलोपेक्षा अधिक असायचं. मात्र, आता सोनमला या आजारापासून मुक्तता मिळाली आहे आणि वाढलेल्या वजनापासून तिला आराम देखील मिळाला आहे. म्हणून तर आपण सोनमला तिच्या प्रत्येक सिनेमात इतकी स्लिम आणि ट्रिम पाहतोय.
दिलीप कुमार
९८ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती आता ठीक आहे. पण बर्याच दिवसांपासून ते किडनीच्या समस्येने झगडत आहेत. या व्यतिरिक्त त्यांना फुफ्फुसात देखील संक्रमण आहे. यामुळे, त्यांना दर काही दिवसांनी रुग्णालयात दाखल करावं लागतं.
धर्मेंद्र
धर्मेंद्रही तब्बल १५ वर्षांपासून नैराश्यात होते. यावेळी त्यांना दारूचं व्यसन लागलं. धर्मेंद्र एक मद्यपी आहेत, हे कुणापासूनही लपलेलं नाही. याशिवाय ते अधूनमधून धूम्रपानही करायचे, जी सवय आता त्यांनी कायमची सोडली आहे.
मिथुन चक्रवर्ती
मिथुन चक्रवर्ती यांना पाठदुखीची तीव्र समस्या आहे. गेल्या वर्षी ही समस्या जेव्हा वाढत गेली तेव्हा त्यांना अमेरिकेत नेण्यात आलं. जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना थोडा आराम मिळाला परंतु समस्या संपलेली नाही. तीव्र पाठदुखीमुळे माने पासून टेलबोनपर्यंत तीव्र वेदना होते.