गरोदरपणाचं मार्केटींग! प्रेग्नन्सी शुटमधूनही कलाकार कमवतात करोडो रुपये, वाचा कसे?


आई होणे ही जगातील सर्वात सुंदर अशी गोष्ट आहे. लवकरच आई होणार ही भावना प्रत्येक स्त्रीसाठीच स्वर्ग सुख देणारी आहे. देवाने प्रत्येक स्त्रीला ही एक दैवी देणगीच दिली आहे, ज्यामुळे ती एका जीवाला जन्म देऊ शकते. आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि अविस्मरणीय असा टप्पा आहे. या फेजमधून सर्व स्त्रियांना कधीना कधी जावेच लागते. मग ती सामान्य स्त्री असो नाहीतर कोणी मोठी कलाकार, खेळाडू, उद्योजिका आदी सर्व महिला या गोष्टीला अपवाद नाही. मनोरंजन क्षेत्रात देखील अनेक अभिनेत्री यांनी हा सुखद अनुभव अनुभवला आहे.

बॉलीवूड आणि प्रेक्षक यांचे नाते खूप जवळचे आहे. अनेक प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कलाकारांना सोशल मीडियावर फॉलो करतात, त्यांच्या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. अशा वेळी सोशल मीडिया प्रेक्षकांना खूप उपयोगी ठरते. आजच्या २१ व्या शतकात, अन्न, वस्त्र , निवारा या तीन मूलभूत गरजांसोबतच सोशल मीडिया हि चौथी गरज जोडल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे अनेक वैयक्तिक गोष्टी ह्या वैयक्तिक न राहता सार्वजनिक होत आहे. याचा सर्वात जास्त तोटा हा कलाकारांना बसतो.

एखाद्या अभिनेत्रीची प्रेग्नन्सी ही त्यांची खूप खाजगी गोष्ट आहे, मात्र या २१ व्या शतकाने स्त्रीला मिळालेल्या या वरदानाचे मार्केटिंग करून ठेवले. अभिनेत्रीची प्रेग्नन्सी ही पैसे कमवायचा एक मार्ग बनला आहे. कसा ते जाणण्यासाठी वाचा ही बातमी.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ख्यातनाम कंपन्या प्रेग्नन्सी शुटच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची जाहिरात आणि ब्रँडिंग करत असतात. अरे कलाकार तर ते प्रेग्नेंट असल्याची घोषणा करण्यासाठीही पैसे घेतात. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय उत्पादने तयार करणाऱ्या एका कंपनीने २०१३ पासून ७० हून अधिक सेलिब्रिटींच्या माध्यमातून प्रमोशन केले आहे.

ब्रिटिश मॉडेल इस्करा लॉरेन्स हिने २०१९ मध्ये तिच्या प्रियकरासोबत इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले होते. हे छायाचित्र सोशल मीडियावर टाकण्यासाठी आणि प्रेग्नन्सीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रेग्नन्सी टेस्ट तयार करणाऱ्या एका कंपनीने इस्करा लॉरेन्सला तब्बल १५ लाख रुपये इतके मानधन दिले होते. यातुन गर्भधारणेतील अडचणी दूर करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करण्यात आली होती.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. सध्या करिना आठ महिन्यांची प्रेग्नेंट असून ती तिचे प्रेग्नन्सीमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. लोकंही करीनाच्या या फोटोना पसंतीची पोचपावती देतच असतात. करिना याकाळातही स्वतःच्या फिटनेकडे कटाक्षाने लक्ष देत असते.

प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती. ‘प्रेगा न्यूज’ ही कंपनी होम प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. नुकतेच अनुष्काने तिच्या मुलीला जन्म दिला आहे तर करीना लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. अशा प्रकारे जाहीरातीत काम करत कलाकार पैसे कमावतात. विशेष म्हणजे या जाहीरातींचा कालावधी हा अतिशय कमी असतो.


Leave A Reply

Your email address will not be published.