या वर्षी भारतातून ऑस्करमध्ये दाखल झालेला गुजराती चित्रपट ‘छेलो शो‘(Chello Show) चा बालकलाकार राहुल कोळी याचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. तो फक्त 10 वर्षांचा होता. ल्युकेमिया आजाराने या बालकलाकाराचा मृत्यू झाला आहे. 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्याचे निधन झाले आहे. त्याच्या कुटुंबियांनी सोमवारी जामनगरजवळील त्यांच्या मूळ गावी हापा येथे प्रार्थना सभा घेतली. राहुलचे वडील रामू हे एक रिक्षाचालक आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तीन दिवस आधी या बालकलाकराच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मुलाच्या जाण्याचे दु:ख व्यक्त करताना रामू कोळी म्हणाले की, ‘तो खूप आनंदी होता आणि १४ ऑक्टोबरनंतर आपलं आयुष्य बदलेल असं मला अनेकदा सांगत होता. पण त्याआधीच तो आम्हाला सोडून गेला.’ १४ ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. याच दिवशी राहुलचा तेरवा असणार आहे. गुजरातीमध्ये याला ‘टर्मू’ म्हणतात. यामध्ये मृत्यूनंतरच्या विधी केल्या जातात.
राहुलला ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमिया या आजाराने ग्रासलं होतं. या बालकलाकारावर गेल्या चार महिन्यांपासून अहमदाबाद येथील गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू होते. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर 4 महिन्यांनी राहुलला आजार झाल्याचं समजलं होतं. सुरुवातीला त्याला किंचितसा ताप होता पण औषधोपचारानंतरही तो बरा होत नव्हता. रविवारी त्याने नाष्टा केल्यानंतर त्याला सतत ताप येत होता. त्याला 3 वेळा रक्ताच्या उलट्याही झाल्या होत्या.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने 12 दिवसांपूर्वी 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून या गुजराती चित्रपटाची निवड केली. ‘छेलो शो’चे दिग्दर्शन अमेरिकास्थित दिग्दर्शक पान नलिन यांनी केले आहे. चित्रपटाची कथा त्यांच्याच जीवनावरुन प्रेरित आहे. ते सौराष्ट्रात लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी फिल्मी दुनियेची जादू शोधून काढली. चित्रपटाची कथाही काहीशी अशीच आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खास किस्सा: अफगाणिस्तानात ‘खुदा गवाह’च्या शुटिंगवेळी अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी अर्धी एयरफोर्स होती
न ऐकलेला किस्सा : ….म्हणून अमिताभ बच्चन यांनी डावा हात खिशात टाकून केली होती ‘शराबी’ चित्रपटाची शूटिंग










