Monday, July 1, 2024

‘…अशा चेहर्‍याविरहित हल्ल्यांचा ‘, मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना नेहा मांडलेकरने दिले परखड उत्तर

विविध गोष्टींवरून कलाकारांना ट्रोल करणे खूपच सामान्य बाब झाली आहे. कलाकार म्हटले की ट्रोलिंग आपसूकच सोबत येते. पूर्वी फक्त कलाकार, त्याचा अभिनय, त्याचा सिनेमा ट्रोल व्हायचा. मात्र आता ट्रोलर्स कलाकाराच्या कुटुंबाला देखील ट्रोल करतात. कलाकारांच्या लहान मुलांना देखील ते सोडत नाही. याचा अनुभव अनेकदा कलाकारांना येतो. मात्र यावर सगळेच प्रतिक्रिया देतात असे नाही, मात्र मराठी सिनेसृष्टीतील या कलाकाराच्या पत्नीने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

चिन्मय मांडलेकर मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रतिभावान अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आहे. आता तर हिंदीमधील देखील एक उत्तम अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होत आहे. लवकरच चिन्मय राजकुमार संतोषी यांच्या ‘गांधी गोडसे :एक युद्ध’ या सिनेमात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर चिन्मयला आता त्याच्या मुलाच्या नावावरून ट्रोल केले जात आहे. चिन्मयच्या मुलाचे नाव जहांगीर असल्यामुळे त्याला अनेकांनी आता ट्रोल केले आहे. यासर्वांवर उत्तर देताना चिन्मयची पत्नी असलेल्या नेहाने सर्वांना परखड उत्तर देताना एक पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha M Joshi (@nehamadanjoshi)

नेहाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रिय ट्रोलर्स, याचा आता कंटाळा आला आहे. अजून किती काळ तुम्ही नऊ वर्षांच्या मुलाला तुमचे लक्ष्य बनवणार आहात? प्रत्येकवेळी त्याच्या वडिलांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी? जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे देशद्रोही नव्हते. या देशासाठी या महापुरुषाने जे काही केले आहे, त्याचा अनेकांना फायदा झाला आहे. आमच्या मुलाचे नाव आम्ही त्यांच्या नावावरुन ठेवले आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. पण मी हे सर्व कोणाला सांगतेय? त्यांना हे अगोदरपासून माहित नाही का? हे लोक द्वेषाने आंधळे झाले आहेत. ही लोक काहीतरी निमित्त शोधत असतात. संस्कार, संस्कृती नेमके काय असतात? अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख ‘कार्ट’ म्हणून करणारे संस्कार असतात! त्याच्या आईबद्दल वाट्टेल ते असभ्य बोलणे म्हणजे संस्कृती जपणे???? आम्ही माणुसकी, प्रेम जपणारी माणसे आहोत. माझे संगोपन आणि मूल्ये अशा चेहर्‍याविरहित हल्ल्यांचा निषेध करतात, हे सहन करण्यास मनाई करतात.”

नेहाने अतिशय कमी आणि कठोर शब्दांमध्ये ट्रॉलर्सला उत्तर दिले असून, सोबतच तिने काही कमेंट्सचा स्क्रिनशॉट देखील पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या मुलावरून कशा कमेंट्स येत आहे, ते दिसेल. सध्या तिची पोस्ट तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. चिन्मयबद्दल सांगायचे झाले तर काही दिवसांपूर्वी चिन्मय मांडलेकर ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने अतिरेक्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनेत्याच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सतत ड्रेस सावरताना दिसली भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे
हसरा चेहरा इतिहास गेहरा! गौरी नलावडेचा शाइनी लूक

 

हे देखील वाचा