कॉन्फिडेंट ग्रुपचे चेअरमन सीजे रॉय यांनी शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी बेंगळुरूमध्ये कथितरित्या स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना आयकर विभागाने त्यांच्या कार्यालयात झडती घेतल्यानंतर काही तासांतच घडली. गोळी लागल्यानंतर रॉय यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास अधिकारी करत आहेत.
सीजे रॉय हे एक नामांकित रिअल इस्टेट व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते. मात्र मालमत्ता आणि पायाभूत सुविधांपुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांनी आतापर्यंत आठ कन्नड आणि मल्याळम चित्रपटांची निर्मिती केली होती तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक भव्य प्रकल्पांना पाठबळ दिले होते.
सीजे रॉय यांनी २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहनलाल यांच्या उच्च बजेट अॅक्शन-थ्रिलर चित्रपट कॅसानोव्हाची निर्मिती केली होती. त्या काळात हा चित्रपट सर्वाधिक बजेटचा मल्याळम सिनेमा म्हणून चर्चेत होता. याशिवाय त्यांनी मोहनलाल आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या बहुभाषिक चित्रपट मरक्करचा सहनिर्मिताही केली होती. या चित्रपटाचा बजेट सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी रॉय यांनी मरक्करचे पोस्टर शेअर करताना, “उत्साहित आहे. मोहनलाल जी आणि संपूर्ण टीमसोबत माझ्या मेगा चित्रपट मरक्करची पहिली स्क्रीनिंग पाहण्यासाठी चेन्नईला जात आहे,” असे लिहिले होते.
कॉन्फिडेंट ग्रुपने अनेक वर्षे विविध चित्रपट आणि मनोरंजन प्रकल्पांना प्रायोजकत्व दिले. मोहनलाल होस्ट करत असलेल्या लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मल्याळमच्या अनेक सिझनचे टायटल स्पॉन्सरही हा ग्रुप होता. चित्रपट निर्मितीपुरतेच रॉय यांचे योगदान मर्यादित नव्हते. कन्नड आणि मल्याळम सिनेमावरच लक्ष केंद्रित करण्यामागील कारण सांगताना त्यांनी एकदा मुलाखतीत म्हटले होते, “चित्रपटाच्या बजेटपैकी जवळपास निम्मा खर्च लोकेशन आणि कलाकार व तंत्रज्ञांच्या निवासावर होतो. माझ्या स्वतःच्या मालमत्ता लोकेशन किंवा निवासासाठी वापरल्यामुळे हा खर्च वाचतो. त्यामुळे ज्या चित्रपटांत माझा व्यावसायिक हितसंबंध असतो, त्यांच्यातच मी काम करतो.”
सीजे रॉय (CJ Roy)हे केरळमधील कोची येथील प्रसिद्ध बिल्डर आणि रिअल इस्टेट डेव्हलपर होते. ते कॉन्फिडेंट ग्रुपचे संस्थापक होते. व्यवसायासोबतच त्यांनी चित्रपटसृष्टीतही सक्रिय सहभाग घेतला आणि मल्याळम सिनेमांची निर्मिती केली. कॅसानोव्हा आणि मरक्करसारख्या भव्य चित्रपटांमधील त्यांचे योगदान त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायापलीकडे असलेल्या सिनेमावरील आवडीचे स्पष्ट दर्शन घडवते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘धुरंधर’ पाहिल्यानंतर रडले सारा अर्जुनचे आई-वडील; अभिनेत्रीने सांगितले कारण










