कधी कधी अशा घटना घडतात की, विश्वास बसत नाहीत पण ते सत्य असते. आपल्या उत्तमोत्तम चित्रपटांतून लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपली वेगळी छाप निश्चितच उमटवली आहे. ‘शिवराज अष्टक’ नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोमवारी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आदित्यनाथांनी अतिशय आस्थेने त्यांची चौकशी केली. तर आपल्या आगामी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे खास निमंत्रण दिग्पाल लांजेकर यांनी योगी आदित्यनाथ यांना दिले. या भेटीत इतिहास, कला, संस्कृती अशा विषयांवर दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या; यावेळी अभिनेता अजय पूरकर, आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ देखील उपस्थित होते.
‘योगी आदित्यनाथ हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची भेट हा आनंददायी क्षण होता. हा आनंद शब्दांपलीकडचा, असल्याचं दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नमूद केलं आहे. ‘योगीजींना भेटणे आणि त्यांच्यासोबत काही वेळ घालवणे खूपच आनंददायी आणि सन्मानजनक होते’. नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा अलौकिक संबध या सगळ्या क्रांतीत या चारही भावंडांचं योगदान यावर ते भरभरून बोलले. एकंदरीत त्यांचा संत साहित्य आणि धर्म-संस्कृती याविषयीचा गाढा अभ्यास आम्हाला थक्क आणि प्रभावित करणारा होता असं सांगत, दिग्पाल लांजेकर यांनी या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलीं प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाविषयी जाणून घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. येत्या १८ एप्रिलला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘वारी’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त; या कलाकारांनी लावली हजेरी
बॉक्स ऑफिसवर चालेना सलमान खानची जादू; सिकंदरने दुसऱ्या दिवशी केली फक्त एवढीच कमाई